Fri, Apr 23, 2021 13:51
तमिळनाडू रणधुमाळी : नेतृत्वाच्या पोकळीतील निवडणूक

Last Updated: Apr 04 2021 6:52AM

हर्षद विखे-पाटील

द्रमुक आणि अण्णाद्रमुक हे पक्ष तामिळनाडूच्या सत्तावर्तुळाचं केंद्र आहेत. करुणानिधी, जयललिता यांच्या निधनानंतर राज्यातल्या राजकारणात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. अण्णाद्रमुकमधे दोन गट पडले. तामिळनाडूचं व्यक्तिकेंद्री राजकारण सध्या मुद्द्यांकडे वळलं आहे. जयललिता आणि करुणानिधी यांच्या हयातीत हे शक्य नव्हतं. या नेतृत्वाच्या पोकळीचा फायदा स्टॅलिन यांना होताना दिसतो आहे. 

तामिळनाडूचं राजकारण व्यक्तिकेंद्री राहिलंय. पेरियार, अण्णादुराई, एमजी रामचंद्रन, करुणानिधी, जयललिता यांची छाप तिथल्या राजकारणावर आजही कायम आहे. द्रमुक आणि अण्णाद्रमुक हे पक्ष तिथल्या सत्तावर्तुळाचं केंद्र आहेत. या दोन पक्षांभोवती तिथलं राजकारण आजपर्यंत फिरत आलंय. एमजीआर हे अण्णाद्रमुकचे, तर करुणानिधी हे द्रमुक पक्षाचे शिल्पकार होते. साधारणत:, 1970 ते 1975 नंतर या दोन व्यक्तींच्या भोवती तामिळनाडूचा राजकीय सत्तासंघर्ष फिरत राहिला. पुढं एमजीआर यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा जयललिता यांच्याकडे आली. त्यानंतरचं तामिळनाडूचं राजकारण जयललिता आणि करुणानिधी यांच्याभोवती फिरत राहिलं. 

कधी करुणानिधी, तर कधी जयललिता हे आलटून-पालटून मुख्यमंत्रिपदावर राहिले. पुढे या दोघांच्याही निधनानंतर तामिळनाडूच्या राजकारणात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. मात्र, व्यक्तिकेंद्री राजकारण आता मुद्द्यांकडे वळायला सुरुवात झाली आहे. इतर राजकीय पैलूंकडेही राजकारण फिरू लागलं आहे. हे राजकारण जयललिता आणि करुणानिधी यांच्या हयातीत शक्य नव्हतं. जयललिता या कन्नड ब्राह्मण होत्या. तर तामिळनाडूच्या राजकारणात अण्णाद्रमुकचं राजकारण द्रविडी विचारधारेचं राहिलेलं आहे आणि ही विचारधारा ब्राह्मण्यवादाला कट्टरपणे विरोध करत आलीय. मात्र, जयललिता या ब्राह्मण असूनही त्यांची प्रतिमा ही जातीपातीपलीकडे जाणारी अशीच तयार झाली. त्यांच्या विविध लोककल्याणकारी योजनांमुळे तामिळनाडूच्या जनमानसात त्या लोकप्रिय झाल्या. कष्टकरी, कामगार आणि महिला सक्षमीकरणाच्या योजनांची अंमलबजावणी यावर जयललिता यांच्या पक्षाचा भर राहिला. त्यामुळे लोकांनी त्यांना मनापासून स्वीकारलं. तामिळनाडूच्या राजकारणाचं एक वैशिष्ट्यं म्हणजे, ते नेहमीच लोककल्याणकारी योजनांभोवती फिरताना दिसतं. उदा., निवडणुकीत घरगुती गॅस सिलिंडर किंवा अम्मा कँटिनची योजना असेल. 

जयललिता यांच्या लोककल्याणकारी द़ृष्टिकोनामुळे त्यांना जातीचा टॅग कधी लागलाच नाही. विविध योजनांच्या माध्यमातून कष्टकरी, शेतकरी आणि महिलावर्ग यांना आकर्षित करण्यात त्या यशस्वी ठरल्या. त्यामुळेच त्या सहावेळा मुख्यमंत्रिपदावर विराजमान होऊ शकल्या. एक महिला एखाद्या राज्याचं मुख्यमंत्रिपद इतका काळ टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरते, त्याला काही कारणंही आहेत. पहिलं म्हणजे, जयललिता यांनी जातीपातीच्या राजकारणापेक्षा गुड गव्हर्नन्स आणि लोककल्याणकारी राज्यावर भर दिला. दुसरं म्हणजे, राजकीय परिघाबाहेरच्या छोट्या छोट्या जाती-जमातींचं राजकीय महत्त्व वाढायला लागलं. या जाती आपल्यामागे आणण्यात जयललिता यांना यश आलं.

करुणानिधी यांचा द्रमुक पक्ष आक्रमक, गुंडागर्दी टाईपचा पक्ष म्हणून ओळखला जायचा. तर दुसरीकडे जयललिता यांची मोठी इमेज तयार झाली होती. यामुळे झालं असं की, जयललिता या तामिळनाडूत निवडणुका जिंकत राहिल्या. करुणानिधींचा पक्षही अस्तित्वात होता; पण त्यांच्यावर नेहमीच भ्रष्टाचाराचे आरोप होत राहिले. त्यात दिवसेंदिवस खालावत चाललेल्या प्रकृतीमुळे करुणानिधी मागे पडले. सध्याच्या घडीला दोघांच्या निधनानंतर त्यांच्या तोडीचा एकही नेता तामिळनाडूच्या राजकारणात राहिलेला नाहीय. सध्या करुणानिधी यांचा मुलगा स्टॅलिन हेच प्रमुख नेते म्हणून उभे राहताना दिसतात. कारण, स्टॅलिन यांची उपमुख्यमंत्री आणि महापौर म्हणून राजकीय कारकीर्द राहिलीय. त्यामुळे जयललिता आणि करुणानिधी यांच्यानंतर जे तामिळनाडूत नेतृत्व उभं राहिलंय ते स्टॅलिन यांचं आहे.

जयललिता यांच्या मृत्यूनंतर अण्णाद्रमुकचे दोन गट पडले. एका गटाचं नेतृत्व ओ. पनीरसेल्वम यांनी केलं. सुरुवातीच्या काळात ते मुख्यमंत्री राहिले. तर शशिकला यांच्या नेतृत्वातल्या गटानं पलानीस्वामी यांना मुख्यमंत्रिपदावर बसवलं. पनीरसेल्वम, पलानीस्वामी यांच्यात अंतर्गत वाद आहेत. त्याचा फटका निवडणुकीत भाजप आणि अण्णाद्रमुकला बसू शकतो. शिवाय, मुस्लिम, दलित, ख्रिश्चन अशी मोट बांधण्यात हे सगळे कमी पडताहेत. त्याचं कारण जयललिता यांच्यासारखी त्यांच्याकडे इमेज नाहीय. पलनास्वामी शशिकला यांच्यामुळे मुख्यमंत्री होऊ शकले; पण त्यांच्यातला एक गट शशिकला यांच्या विरोधात आहे. शशिकला यांच्या बाजूनं सामाजिक समीकरणाची गणितं होती. ती जुळवणं या दोन गटांना शक्य नाही. शशिकला यांनी राजकारणातून निवृत्ती घेतलीय. त्यामुळे सोशल इंजिनिअरिंगचं राजकारण उभं करण्यात त्यांच्यासमोर समस्या उभी राहतेय.

स्टॅलिन यांच्या बाजूने सकारात्मक राजकीय वातावरणनिर्मिती झालीय. त्यांचं वय झालेलं असलं, तरी 10 वर्षांच्या सत्तेमुळे अण्णाद्रमुकच्या विरोधात वातावरण आहे. त्यातून स्टॅलिन यांची लोकांमध्ये एक प्रतिमा तयार होताना दिसते आहे. स्टॅलिन ताकदवान नेते म्हणून नावारूपाला येताना दिसतात. करुणानिधी आणि जयललिता यांच्यानंतर तामिळनाडूतलं राजकारण वेगळं वळण घेतंय. पूर्वीपेक्षा सध्या तामिळनाडूच्या राजकारणात जातीय समीकरणाची मोट बांधण्यात पक्ष गुंतलेले दिसतात. यापूर्वी हे होत होतं; पण इतकं उघडपणे होत नव्हतं. सध्या स्थानिक पातळीवरचं काम पाहून निवडणुकीत उमेदवार उभे करावे लागत आहेत. जयललिता किंवा करुणानिधी यांच्या प्रतिमेमुळे कोणताही उमेदवार जिंकून यायचा. आता ते शक्य नाही. 

अण्णाद्रमुककडे शशिकला यांच्यानंतर कोण? या संभ्रमातच हा अण्णाद्रमुक पक्ष गुंतून पडल्याचं चित्र दिसून येते. पक्षांंतर्गत गटबाजी आणि संघर्षाचा फायदा स्टॅलिन यांना होण्याची शक्यता आहे. मात्र, अण्णाद्रमुक जयललिता यांच्या प्रतिमेचा पुरेपूर राजकीय उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे. म्हणजे भलेही जयललिता जिवंत नसतीलही; पण त्यांच्या लोकप्रिय प्रतिमेचा पक्षाकडून फायदा घेण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अजूनही जयललिता यांच्या लोककल्याणकारी योजनांचा, सामाजिक कामाचा प्रभाव लोकांच्या मनात आहे. त्यामुळं निवडणुकीत जयललिता यांचं नाव घेऊन मतं मागण्याशिवाय पक्षापुढं दुसरा पर्याय नाही.   

स्टॅलिन अगोदरपासूनच करुणानिधी यांच्यासोबत होते. त्याचबरोबर करुणानिधी यांनीही त्यांना थोडाफार पाठिंबा देऊन प्रोजेक्टही करण्याचा प्रयत्न केला आहे. तसं स्टॅलिन यांना  स्वतःचं राजकीय, सांस्कृतिक कर्तृत्व काहीच नाही. तामिळनाडूच्या चित्रपट क्षेत्रात, साहित्यिक वर्तुळात आणि राजकारणात करुणानिधी यांचा मोठा दबदबा होता. तसा स्टॅलिन यांचा नाही. कलाकार म्हणून फ्लॉप झाल्यानंतर स्टॅलिन यांनी राजकारणाकडे मोर्चा वळवला. मात्र, करुणानिधींसारखी इमेज ते बनवू शकले नाहीत. त्यांची राजकीय धडपड तशी दिसून येते; पण ते करुणानिधी होऊ शकत नाहीत. मोठ्या वटवृक्षाच्या सावलीखाली दुसरं झाड वाढू शकत नाही. तसं स्टॅलिन यांच्या व्यक्तिमत्त्वाबाबत झालं आहे. 

तामिळनाडूतली पेरियार यांची द्राविडी आणि आंबेडकरी चळवळ ही ब्राह्मण्यवादी विचारधारेच्या कट्टर विरोधात राहिलीय. तरीही भाजप तामिळनाडूच्या राजकारणात पाय रोवण्याचा प्रयत्न करते आहे. सुपरस्टार रजनीकांत यांनी आपल्या नव्या पक्षाचं नाव घोषित केलं होतं; पण रजनीकांत ‘थलैवा’ ठरतील का? हा प्रश्न उभा राहण्याआधीच त्यांनी माघार घेतली. कमल हसन यांनी ‘मक्कलं निधी मय्यम’ या पक्षाची स्थापना करत नवीन पर्याय देण्याचा प्रयत्न केलाय. त्याला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीय. अण्णाद्रमुकबरोबर आघाडी केलेल्या भाजपने 25 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर द्रमुकशी आघाडी करून काँग्रेसने तितकेच म्हणजे 25 उमेदवार उभे केले आहेत. 38 जिल्ह्यांमध्ये विभागलेल्या 234 विधानसभा मतदारसंघांत ही निवडणूक होत आहे. सहा एप्रिलला मतदान झाल्यानंतर दोन मे रोजी निकाल जाहीर होईल. त्यानंतर तमिळनाडूच्या राजकारणाची दिशा स्पष्ट होईल. 

(लेखक पोलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट म्हणून तामिळनाडूत कार्यरत आहेत.)