Sun, Sep 20, 2020 04:01होमपेज › Bahar › आत्महत्या सुशांतची, धुरळा राजकारणाचा  

आत्महत्या सुशांतची, धुरळा राजकारणाचा  

Last Updated: Sep 12 2020 8:56PM
भाऊसाहेब आजबे

सुशांतसिंहने आत्महत्या केलेली नव्हती तर त्याची हत्या झाली होती, याला पुष्टी देईल, असा एकही पुरावा सीबीआयला अद्याप सापडलेला नाही. एनसीबीने सुशांतसिंहसाठी रिया चक्रवर्ती अमली पदार्थ विकत घेत असे, असा आरोप ठेवत तिला अटक केली आहे. या प्रकरणाच्या निमित्ताने राजकीय धुरळा मात्र खूप उडाला आहे. 

सुशांतसिंह राजपूत या गुणी अभिनेत्याने 14 जून 2020 ला मुंबईमध्ये राहत्या घरी आत्महत्या केली. तो मानसिक तणावाखाली होता, त्याच्यावर डिप्रेशनसारख्या आजारावर काही महिने उपचारही चालू होते, अशी माहिती सुरुवातीला पुढे आली आणि सर्वत्र त्याच्याविषयी हळहळ देखील व्यक्त केली गेली. एक-दोन आठवडे गेल्यानंतर पहिल्यांदा चर्चा सुरू झाली ती बॉलीवूड जगतातील ‘नेपोटिझम’ म्हणजेच नात्यातील, मित्रपरिवारातील लोकांनाच चित्रपटांमध्ये काम देण्याच्या कंपूशाही वृत्तीविषयी. चांगला कलाकार असूनही सुशांतसिंहला कसे डावलले जात होते, त्याला उत्तम सिनेमे करूनही पुरस्कार कसे दिले जात नव्हते याविषयी चित्रपट जगतातील कलाकार, पत्रकार, नेटिझन्स बोलायला लागले. त्याची मानसिक स्थिती बिघडली, त्यामागे हे तर कारण नाही ना, असे चर्चेला वळण मिळायला लागले. तरीही इथंपर्यंत गोष्टी ठीक होत्या.

काही काळासाठी सुशांतसिंहची व्यवस्थापक म्हणून काम केलेल्या दिशा सॅलियनने सुशांतच्या आत्महत्येच्या काही दिवस आधीच आत्महत्या केली होती. त्यामुळे या दोन्ही आत्महत्यांचे एकमेकांशी काय ‘कनेक्शन’ आहे? त्यांची हत्या तर झाली नाही ना, अशा संशय काही घटकांकडून व्यक्त केला जाऊ लागला व त्याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी होऊ लागली. यातही वावगं वाटण्यासारखं काही नव्हतं. पण मुंबई पोलिस तपास करत असतानाही सीबीआय चौकशीची मागणी केली जाऊ लागली तेव्हा या आत्महत्या प्रकरणाने राजकीय वळण घेतले. यामध्ये एकीकडे मुंबई पोलिसांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा प्रयत्न झाला तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंचा या प्रकरणाशी काहीएक संबंध आहे का अशी कुजबुज मोहीम सुरू झाली. आदित्य ठाकरे यांचे बॉलीवूडमधील अनेक कलाकारांशी मैत्रीचे संबंध आहेत. तोच धागा पकडून दिशा सॅलियनचा जी पार्टी सुरू असताना मृत्यू झाला, त्या पार्टीमध्ये आदित्य ठाकरे सहभागी होते, अशी तथ्यहीन माहिती काही वृत्तवाहिन्या व सामाजिक माध्यमांवरील लोकांकडून प्रसारित केली जाऊ लागली. दिशा सॅलियन हिची हत्या केली गेली, त्याची माहिती सुशांतसिंहला होती. त्यामुळे त्याची हत्या केली गेली अशी ‘कॉन्स्पिरसी थिअरी’ मांडली गेली. वृत्तवाहिन्यांसाठी तर तो अखंड चर्चेचा विषय झाला.

मुंबईमध्ये आत्महत्येची घटना घडली. त्याची चौकशीही मुंबई पोलिसांकडून चालू होती. तरीही सुशांतसिंहच्या बिहारमध्ये राहणार्‍या कुटुंबीयांनी पाटणामध्ये एफआयआर दाखल केला. बिहारमध्ये जेडीयू आणि भाजपचे सरकार आहे. बिहार पोलिसांनी ती तक्रार ठरलेल्या प्रक्रियेनुसार मुंबई पोलिसांकडे वर्ग करायला हवी होती. तसे न करता त्यांनी बिहार पोलिसांचे एक पथकच मुंबईला पाठवले. महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यक्षेत्राचा केलेला अधिक्षेप पाहून महाराष्ट्र पोलिसांनी बिहार पोलिसांना योग्य म्हणावा असा विरोध केला. याचा अर्थ महाराष्ट्र पोलिस काही गोष्टी दडवण्याचा प्रयत्न करत आहे, असा लावण्यास काही पक्षपाती वृत्तवाहिन्या व समाजमाध्यमांवरील राजकीय पक्षाच्या फौजेने सुरुवात केली. प्रकरण अपेक्षेप्रमाणे सर्वोच न्यायालयात पोचले. ज्या ठिकाणी घटना घडली, त्या राज्याच्या विनंतीशिवाय सीबीआयकडे प्रकरण वर्ग करता येत नाही. तरीही सर्वोच्च न्यायालायने ‘लोकभावनेचा’ हवाला देत घटनेच्या कलम 142 अंतर्गत न्यायालयाला जे विशेष अधिकार प्राप्त आहेत, त्याअंतर्गत हे प्रकरण सीबीआयकडे दिले.

हे घडत असताना रिया चक्रवर्तीला आरोपी करण्याची प्रक्रियाही सुरू झाली होती. रिया ही सुशांतसिंहची प्रेयसी. ती बराच काळ त्याच्याबरोबर राहात होती. त्याने आत्महत्या केली त्या दिवशी ती तिथे नव्हती. काही दिवस आधीच ती दुसरीकडे राहण्यास गेली होती. रियाने सुशांतसिंहला फसवले, त्याचे पैसे घेतले, असा आरोप करण्यात आला. सक्त वसुली संचलनालयाने (ईडी) तिच्यावर ‘मनी लाँडरिंग’अंतर्गत गुन्हाही दाखल केला. तिचा कथित हत्येत सहभाग आहे अशा वावड्याही उठवल्या गेल्या. सीबीआयने चौकशी सुरू करून तीन आठवडे झाले आहेत; पण सुशांतसिंहने आत्महत्या केलेली नव्हती तर त्याची हत्या झाली होती, याला पुष्टी देईल असा एकही पुरावा सीबीआयला अद्याप सापडलेला नाही.

सुशांतसिंह अमली पदार्थांच्या आहारी गेलेला होता ही आतापर्यंत प्रकाशात नसलेली माहिती मात्र पुढे आली आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) या आणखी एका तपासयंत्रणेचा प्रवेश झाला. यातून अमली पदार्थ विक्रेत्यांचा शोध घेतला गेला. मात्र यात ज्या संदीप सिंग याचे नाव पुढे आले तो भाजपशी संबंधित निघाला. नरेंद्र मोदींवरील सिनेमाची निर्मिती त्यानेच केलेली आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांशीही त्याचे सलोख्याचे संबंध असल्याचे निदर्शनास आले. गुजरात सरकारने त्याला 177 कोटी रुपयांचे कंत्राट दिल्याचेही पुढे आले. शेवटी एनसीबीने सुशांतसिंहसाठी रिया अमली पदार्थ विकत घेत असे, असा आरोप ठेवत तिला अटक केली आहे. रिया चक्रवर्तीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी झाली आहे. यातून सिद्ध झाले तरी एवढेच होईल की सुशांतसिंह अमली पदार्थांचे सेवन करत असे. त्यातून त्याची हत्या झाली हे मात्र सिद्ध होत नाही. सुरुवातीच्या टप्प्यात जेव्हा नेपोटिझमविषयी चर्चा सुरू झाली तेव्हा अभिनेत्री कंगना राणावतने सुशांतसिंहच्या निमित्ताने बॉलीवूडमधील बड्या मंडळींना लक्ष्य केले. सुशांतसिंहसंदर्भात भाजपला पूरक अजेंडा कंगना पुढे रेटत होती. शेवटी तिने जेव्हा मुंबईलाच पाकव्याप्त काश्मीर अशी उपमा दिली, तेव्हा मात्र चर्चेला शिवसेना विरुद्ध कंगना असे एक उपवळण मिळाले. तिला केंद्र सरकारने वाय सिक्युरिटी देणं हा सुरक्षेचा कमी आणि राजकारणाचा अधिक भाग आहे. शेवटी त्याची परिणती कंगनाच्या ऑफिसचे अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेने पाडण्यात झाली.

या सर्व घडामोडींना राजकीय संदर्भ आहे. बिहार विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होणे अपेक्षित आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या, बेरोजगारी यामुळे मतदार नेमका काय विचार करतील याची खात्री नाही. त्यामुळेच सुशांतसिंहची हत्या झाली, ती काँग्रेसचा सहभाग असलेले महाराष्ट्र सरकार दडवत आहे. त्यामुळे सीबीआयच्या माध्यमातून त्याला आपण न्याय देत आहोत, अशी प्रतिमा भाजप तयार करू इच्छित आहे. संपूर्ण बिहारमधील मतदारांवर त्याचा सकारात्मक परिणाम नाही झाला तरी राजपूत व्होट बँकेवर होईल अशी भाजपला आशा आहे. त्यामुळेच सुशांतसिंहच्या मृत्यूचे भांडवल करणारे पोस्टर्सही भाजपने फिरवण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर आगामी मुंबईमधील महापालिका निवडणुकीत उत्तर भारतातील मुंबईस्थित मतदारांनी शिवसेनेला नाकारत आपल्या पारड्यात सत्ता द्यावी, असेही समीकरण भाजपच्या डोक्यात असू शकते.वृत्तवाहिन्या गेले अडीच-तीन महिने अहोरात्र सुशांतसिंह याच विषयावर बोलत आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण संख्येत भारत जगामध्ये दुसर्‍या स्थानी येणे, अर्थव्यवस्था 23.9 टक्केने ढासळणे, 2 कोटी पगारदार बेरोजगार होणे आणि चीनने सीमेवर भारतावर अरेरावी करणे हे विषय जवळपास लुप्त झाले आहेत. आणि ते तसे लुप्त होणे हे भाजपच्याच फायद्याचे आहे. हेडलाईन मॅनेजमेंट हे भाजपसाठी महत्त्वाचे साधन आहे. शिवाय महाविकास आघाडीला या निमित्ताने अडचणीत आणणे, मतदारांच्या मनात या सरकारविषयी संशय निर्माण करणे हा हेतूही आहेच. म्हणूनच सुशांतसिंहच्या प्रकरणात आत्महत्या सोडून इतर तथ्य जरी नसले तरी बिहार निवडणुकीपर्यंत हे प्रकरण पेटते ठेवणे भाजपच्या हिताचे आहे. भाजपसाठी तो राजकीय मास्टरस्ट्रोकही ठरेल कदाचित. जेव्हा ती आत्महत्याच होती हे सिद्ध होईल तेव्हा या प्रकरणामागील राजकारणावर शिक्कामोर्तब होईल.

 "