Fri, Jul 03, 2020 17:00होमपेज › Bahar › सत्तानाट्याचा शेवट

सत्तानाट्याचा शेवट

Last Updated: Nov 30 2019 8:23PM
प्रा. सुहास द. बारटक्के

‘काय अण्णासाहेब, कुठं निघालात? आणि हे काय दोन्ही पायांना दुखापत कशानं झाली?’ मी घराबाहेर भेटलेल्या अण्णांना विचारलं.
‘काही नाही, बाथरुमात पडलो. दोन्ही पायांना मार बसला...’
‘अच्छा, मला वाटलं दोन्ही डगरींवर पाय ठेवल्यामुळं असं झालं की काय.’
‘दोन्ही डगरींवर म्हणजे?’ अण्णांनी आश्चर्यचकित होत ‘आ’ वासून विचारलं.
‘दोन्ही म्हणजे ‘धर्मनिरपेक्षता’ आणि ‘हिंदुत्व’... दोन्ही डगरींवर पाय ठेवला की केव्हा तरी कुठे तरी फ्रॅक्चर व्हायचंच.’
‘सर, शुभ बोला हो... आताच कुठे आम्ही एकत्र आलोय... तुमचं बांलणं आलं माझ्या लक्षात. शुभेच्छा देता येत नसतील तर निदान गप्प तरी बसा...’
‘माझ्या शुभेच्छा नाहीत असं कोण म्हणतं? आम्हाला शेवटी स्थिर सरकार हवंयच ना?’
‘मग काळजी करू नका, राहणार आम्ही एकत्र... सगळे पाच वर्षे पाहत राहा.’

‘खरं तर हीच मोठी परीक्षा आहे आणि त्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. खरं सांगू का अण्णा, महाराष्ट्रात गेल्या महिनाभरात डोकेदुखी आणि चक्कर यावरच्या औषधी गोळ्यांची वारेमाप विक्री झाली. कारण ठाऊकाय? रोज सकाळ-संध्याकाळ ‘सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज.’ अहो, महिनाभरात जनतेचं डोकं फिरायची वेळ आली. एखाद्या बुद्धिबळाचा सामना रंगावा ना तसा सत्तेचा सामना रंगला होता. कधी यांचं पारडं जड, तर कधी त्यांचं. ‘न भूतो न भविष्यती’ असं झालं सगळं प्रकरण.’ 
‘हो, पण जनतेनं सर्वात मोठा पक्ष म्हणून कौल कुणाला दिला होता?’
‘ते बरोबर आहे; पण ‘क्लिअर मेजॉरिटी’ नाही ना मिळवून दिली, तिथंच सगळा घोटाळा झाला.’
‘पण, एकत्र लढल्यावर त्या लढाईनंतर तुम्ही एकत्र यायला हवं होतं ना? नाही तर मतदारांचा विश्वासघात केल्यासारखं होतं ना?’

‘आपापसात एकमेकांवर विश्वास नसेल तर असं होणारंच; पण त्यामुळे जनता दुखावली जाते हे लक्षात कोण घेतो. आम्ही आपले दररोज ‘आ’ वासून हे सत्तानाट्य पाहतोय. मला तर किळसच वाटते सार्‍या प्रकाराची. किती त्या रहस्यमय घडामोडी. रोज पाहावं तर काही वेगळंच नाट्य. नीतिमत्ता म्हणून काही उरलंच नाही. रोज पाहावं तर आज यांचे लोक अमुक हॉटेलात, तर त्यांचे तमुक हॉटेलात. खायचं, प्यायचं, आराम करायचा, मस्त पोहायचं, टी.व्ही. बघायचा, सगळं मजेत, अरे अशा नेत्यांना म्हणावं तरी कायं?’
‘परिस्थितीच तशी आली त्याला ते तरी काय करणार? सर, तुम्ही ना, पुस्तक लिहा किंवा नाटकंच लिहा या सगळ्या राजकारणावर. खूप मजा येईल.’
‘म्हणजे ते नाटक सपशेल पडेल असं म्हणा ना, आधीच लोकांना कंटाळा आलाय हे सगळं पाहून.’
‘मग तुम्ही त्याला एखादा ट्विस्ट द्या ना.’
‘कसला ट्विस्ट?’
‘म्हणजे या सगळ्या राजकारण्यांना कंटाळून गेलेली जनता उठाव करते, जनतेतूनच एखादा नेता निर्माण होतो वगैरे वगैरे...’
‘कल्पना चांगलीय अण्णा; पण हे सगळे नेते जनतेतूनच नाही का निर्माण झालेत? आपणच त्यांना मोठं केलंय ना?’
‘तेही बरोबर आहे म्हणा... म्हणजे या सगळ्या राजकीय नाट्याला खरे जबाबदार आपणच म्हणायचे.’
‘बरोब्बर! आता कसं बोललात अण्णा... शेवटी कितीही डोकं दुखलं, कितीही गोळ्या खाव्या लागल्या, तरी या सत्तानाट्याला कारणीभूत तुम्ही-आम्हीच. म्हणतात ना... पीपल चूज द गव्हर्न्मेंट दे डिझर्व्ह...’ हे वाक्य ऐकताच अण्णांनी खिशातून एक डोकेदुखीवरची गोळी काढली आणि मान हलवत ते पुढे चालू लागले...