होमपेज › Bahar › वांदेकर

वांदेकर

Last Updated: Jan 12 2020 1:20AM
सुदबा चिपळोणकर

सेवक : महाराज, नमस्कार, गुडमॉर्निंग, जय महाराष्ट्र, सलाम आलेकुम, सत्श्रियाकाळ, प्रणाम, सलाम-नमस्ते!
महाराज : बास-बास, अरे, मी तुझा बॉस असलो, तरी हे काय नवीन काढलंस? किती वेळा नमस्कार, काय ते एकदाच बोल आणि मोकळा हो. नमनालाच घडाभर तेल लावलंस, तर तुझ्या मनात मला जे काही सांगायचंय ते राहूनच जाईल ना? काय खबरबात?
सेवक : त्याचं काय आहे महाराज, जसा वारा येईल तशी पाठ फिरवावी लागते आम्हाला. ‘दक्ष’ होऊन छातीवर हात ठेवून ‘प्रणाम’ करत जायला लागायच्या आत तुमचं सरकार आलं आता उगाच कुणाला राग यायला नको म्हणून सगळ्या भाषेत सगळ्याच पद्धतींप्रमाणं नमस्कार करायचा झालं. उगीच तुमची खफामर्जी झाली, तर हा सेवक हद्दपार होईल ना.
महाराज : ठीकाय-ठीकाय, आता कामाचं बोल. काही बातमी वगैरे असेल तर सांग. म्हणूनच इतर कुणी भेटायला येण्याआधी मी शंख फुंकून तुला भेटायला बोलावतो-
सेवक : शंख फुंकून?
महाराज : म्हणजे बेल दाबून रे.
सेवक : महाराज, त्या विनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांची मुदत संपुष्टात येतीय, असं काल काहीजण म्हणत होते.
महाराज : मग, तुला काय त्याचं?
सेवक : काही नाही, काही चर्चा, चौकशी होत असतील, तर नजर ठेव आणि मला कळव, असं तुम्हीच मला सांगितलंय ना?
महाराज : होय! पण ते मंदिराच्या ट्रस्टीबाबत छोटे राजे आणि ते नॉर्वेकर निर्णय घेतील ना? ते सक्षम आहेत निर्णय घ्यायला.
सेवक :  सक्षम होते म्हणा; पण परवा ते मोठे साहेब आलेत ना, त्यांनी म्हणे सुचवलं की, आपलं सरकार जाती-धर्म निरपेक्षपणे काम करतंय हे जनतेला दिसायला हवं असेल, तर माणसांच्या नेमणुकापण जरा दिलदार मनानं करा. इतरानांही चान्स द्या.
महाराज : ते इतर ठिकाणी... हा आमचा खासगी मामला आहे म्हणावं.
सेवक : पण, ते म्हणतात लोकांना निदान दाखवण्यासाठी का होईना, या नेमणुका सर्वसमावेशक कराव्यात.
महाराज : आमचे वांदेकर सक्षम आहेत म्हणावे. तेही आमच्यावर जीवापाड प्रेम करणार्‍या कोकणाकडचेच आहेत, त्यांना कशाला उचलायचं?
सेवक : पण, मग ते म्हणतात इतरांना कधी चान्स मिळणार? त्यांनाही कळायला हवं ट्रस्ट म्हणजे काय ते. 
महाराज : त्याना म्हणावं तुम्ही क्रिकेटचे बादशहा झाला होतात? तुम्हाला काय कळत होतं त्यातलं? कधी हातात बॅट धरली होतीत? तुमचा डोळा कशावर असतो ते आम्हाला ठाऊकायं म्हणावं.
सेवक : म्हणजे आता त्यांचा डोळा देवावर आहे. आता उतारवयामुळं देवाची आस त्यांना लागली आहे, असं वाटतंय का तुम्हाला?
महाराज : जाऊ दे ते. तुला कळायचं नाही; पण एवढंच सांग, त्यांचं म्हणणं तरी काय आहे? अध्यक्ष बदलावा आणि कुणाला आणावं तिथे?
सेवक : त्यांनी सुचवलंय म्हणे एक नाव.
महाराज : कोणतं? कुणाचं? जरा नीट सांग.
सेवक : तेही बांदेकरच आहेत आणि तेही कोकणातलेच म्हणजे थेट सिंधुदुर्गातलेच आहेत.
महाराज : असं? तसं असेल तर जरूर विचार करू. 
सेवक : अहं... महाराज नका तसा विचार करू.
महाराज : कारे? काय हरकत आहे आम्ही तसा विचार केला तर?
सेवक : साहेब, अहो तो बांदेकरच असला, तरी त्याचं नाव ‘रफीक’ आहे ना..?