होमपेज › Bahar › ताजा पैसा, ताजा खर्च

ताजा पैसा, ताजा खर्च

Last Updated: Jul 04 2020 8:39PM
नितीन विनायक कुलकर्णी

‘हौसेला मोल नाही. भाऊ हाय मोठा, खर्चाला नाही तोटा. विषय हार्ड, होऊ दे खर्च. विषय मोठा नाही, खरं चर्चा ही होणारच. सुट्टी द्यायची नाही’ हे वाक्य सुट्टीत बी बोललं जातंय. नुसतं भ्यायचं म्हणलं तर जगायचं कधी आणि कसं? झळ सोसाय लागली तर चालंल, खरं बळ कमी पडता कामा नये. आपल्या आख्ख्या कोल्हापूर जिल्ह्याचा ह्यो स्वभाव हाय.

हजरजबाबीपणाला तर तोडच नाही. प्रश्नाचा रोख, विचारणारी व्यक्ती बघून एकाच ठोक्यात भिंतीत खिळा ठोकल्यासारखं उत्तर, मग प्रसंग कुठला, जागा कुठली हेचा संबंध नाही. आता जेवण झालं का? हेचं उत्तर जेवण झालंय कवाच, खरं अजून जेवायचा हाय. एखाद्यानं विचारलं जेवला काय? व्हय, तर, स्वतःच्या घरात,हे उत्तर. विचारणारा काय मग दुसर्‍याच्या घरात जेवतोय काय? ह्यो झाला रेग्युलर प्रकार. संध्याकाळी सातच्या पुढं तर काही मंडळींची कळ काढायचीच नाही हे ज्या त्या भागात पक्कं माहिती असतंय. गुरुत्वाकर्षण कमी झाल्याली, रेंज कमी-जास्त हुत्याली, सीट दिसली की त्याला साईड देऊन बगलंनं जात्यात; पण त्याची मुद्दाम कळ काढणारी पोरं अशा सीटची वाट बघत असत्यात. त्याला कसं बोलतं करायचं आणि त्या चालू झालेल्या गाडीची मूठ किती वाढवायची, कधी कमी करायची हेचं त्या पोरास्नी लई भारी जेजमेंट असतंय. ऐकायच्या टप्प्यात त्यो गडी आला की नुसतं एवढंच म्हंत्यात, आपल्या भागातला, या पंचक्रोशीतला ह्यो गरीब बिचारा साधा माणूस. दिवसभरात त्याला कुणी जर हे म्हणलं तर सहन होतंय खरं, सातच्या पुढं साधा माणूस ही त्याला शिवी वाटती. टेंपो वाढला की मग नुसत्या ठिणग्याच. ‘मी काय साधा वाटलो काय? पुढनं आल्यालं बघून भली भली माणसं साईड देत्यात. आपली चाल बघून कुत्रंसुद्धा पायात शेपूट घालून केकाटतंय, चावायचं लांबच, भुकायचं त्याचं धाडस होत नाही. हे ज्याला साधलंय त्याला बिचारा, साधा माणूस म्हंताय? हातचं सगळं गेलं तरी चालंल; पण वैभव टिकलं पायजे या तत्त्वानं जिंदगी जगतो आपण. ताजा पैसा, ताजा खर्च. बँकेतल्या शिलकीवर कोण पण जगंल. बँकेत साधं खातं बी नसतानं जगायला धाडस लागतंय.’

‘आपल्याकडं काही नसू दे खरं, त्याचा गर्व कधी करायचा नाही. मी ज्या तत्त्वानं र्‍हातोय ते कुणाला झेपणार बी नाही आणि कुणाचा घास नाही. तरी बी मला साधा म्हंताय? बोलताना काय तरी वाटाय पायजे.’ पोरांनी लिव्हर कमी करायसाठी म्हणून विचारलं, वहिनीस्नी हे सगळं पटतंय? त्या काय बोलत नाहीत? प्रश्न घरापर्यंत आल्यावर ह्यो बापय फिसकाटला. ‘बायकू? तिला जर माझं काय पटलं नाही तर दार बंद करून मला दणाणा दोन-चार तडाकं दील खरं तोंडानं एक चक्कार शब्द बोलणार नाही.’

‘आपल्याला कोण शिस्त लावत असंल तर त्याची भिस्त राखणं हे कर्ता पुरुष म्हणून आपलं कर्तव्य हाय. त्यात कसूर न्हाय.लेकाच्याओ अजून तुमी बालवाडीत हायसा, मी कॉलेजात न जाता डिग्री मिळीवली आणि मला साधा म्हंताय? येड्या टक्कुर्‍याची कवा सुधारायची नाहीत,’ ही पदवी पोरास्नी देऊन सीट निघून गेली. आता तुम्ही म्हणणार हे काय शुद्धीतल्या माणसाचं बोलणं न्हवं. ते बी खरंच हाय. पण शुद्धीत असल्याली बी असं बोलत्यात तवा हे बरं, खरं ते नको, म्हणायची वेळ येती. एखाद्या पेशंटला दवाखान्यात भेटायला, बघायला म्हणून जात्यात तर तिथं त्याला बोलायचं कसं... ‘आता काय तुमी काय जास्त बोलू नका. सगळं माहित हाय. काळजी अजिबात करू नका. हुणार ते चुकणार न्हाई. औषधाची गोळी घेतानं घशात अडकून माणसाचा जीव जातोय. आत्ता हाय तर मागनं न्हाय. आपल्या हातात हाय काय. जन्म तिथं मरण ठरल्यालं हाय. भ्यायचं न्हाई. जगलो तेवढं आपलं म्हणायचं. टेंशन घ्यून बसलासा तर आणि दोन दिवस हाय, त्यातलं बी कमी हुतील. बिनधास्त र्‍हायचं.’ आता सांगा, ह्याला धीर देणं म्हणावं का हवा काढून घेणं म्हणावं. ही असली माणसं चांगली शुद्धीत असून दुसर्‍याला भुलीच्या इंजेक्शनशिवाय बेशुद्ध पाडत्यात. टेन्शनचं मार्केटिंग करून ह्यास्नी काय कमिशन मिळतंय का? सगळीच माणसं एकाच स्वभावाची असतील तर अशी क्वालिटी आणि व्हरायटी मिळणार नाही.