Tue, Jun 15, 2021 12:11
शिवरायांची राष्ट्रीय विचारधारा

Last Updated: Jun 05 2021 8:29PM

प्रा. डॉ. वसंतराव मोरे

छत्रपती शिवाजी महाराज मध्ययुगीन काळात होऊन गेले असले तरी त्यांनी लोकशाहीतील अनेक मूल्यांचे पालन केल्याचे दिसून येते. शिवाजी महाराज ही व्यक्ती नसून तो एक राष्ट्रीय विचार आहे. देशातीत, कालातीत व धर्मातीत  प्रेरणा देणारे हे चरित्र आहे. आज शिवराज्याभिषेक दिन. त्यानिमित्ताने...

समाजास चांगल्या कार्याची प्रेरणा देण्यासाठी आपण उत्सव साजरे करतो. नैतिक आदर्शाची प्रेरणा देण्यासाठी आपण ‘रामनवमी’ साजरी करतो. व्यावहारिक चतुरता आणि निष्काम कार्याची प्रेरणा देण्यासाठी आपण ‘गोकुळ अष्टमी’ साजरी करतो. व्हिएतनाम आणि बांगला देशाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने स्वातंत्र्य प्राप्त केले. स्वातंत्र्याची प्रेरणा म्हणून आपण ‘शिवराज्याभिषेक’ साजरा करतो.

छत्रपती शिवाजी महाराज मध्ययुगीन काळात होऊन गेले असले तरी त्यांनी लोकशाहीतील अनेक मूल्यांचे पालन केल्याचे दिसून येते. शिवाजी महाराज एक व्यक्ती नसून तो एक राष्ट्रीय विचार आहे. मध्ययुगाप्रमाणे आज लोकशाहीत ही स्वातंत्र्याची प्रेरणा आवश्यक आहे. भारतीय स्वातंत्र्ययुद्धात लाला लजपतराय, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, बिपीनचंद्र पाल, रवींद्रनाथ टागोर इत्यादी नेत्यांना शिवचरित्राने प्रेरणा दिली. इतिहासकार सर जदुनाथ सरकार लिहितात...

“शिवाजी महाराजांचे राजकीय आदर्श असे होते की, त्यामध्ये कोणताही बदल न करता आजही स्वीकार करू शकतो.” 
म्हणून लोकशाहीतही राष्ट्रीय चरित्र घडविण्यासाठी शिवराज्याभिषेक साजरा करणे आवश्यक आहे.

शिवपूर्वकालीन सामाजिक स्थिती

एकेकाळी भारत संपन्न होता. ते स्वर्णयुग होते. नालंदा, तक्षशिला आपली विद्यापीठे होती. कालांतराने मनुवादी विचारांनी भारताची प्रगती रोखली. त्यांनी अनेक चुका केल्या. त्यांनी समुद्रपार करणे निषिद्ध केले. त्यामुळे व्यापार बुडाला. लोकमान्य टिळकांनाही समुद्रपार केल्यामुळे प्रायश्चित्त घ्यावे लागले होते. पण आपण हे विसरलो होतो की, रामायणात हनुमान समुद्र पार करून लंकेत पोहोचला होता. परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली असे सांगितले गेले. त्यामुळे संरक्षण कमी झाले व परकीय आक्रमणे वाढली. पण आपण हे विसरलो की, एक वेळा निःक्षत्रिय केल्यावर पुन्हा क्षत्रिय कोठून आले? जबरदस्तीने ज्याचे धर्मांतर केले आहे, त्यांना परत हिंदूधर्मात घेण्यास मनाई करणारा ‘शुद्धीबंदी’ नियम केला. त्यामुळे परकीयांची संख्या वाढू लागली. या सर्व अंधश्रद्धा शिवरायांनी नष्ट केल्या. त्यांनी आपले नौदल उभारले व स्वतः ‘बसनूर’वर जलमार्गे आक्रमण केले. नेताजी पालकर व बजाजी निंबाळकर यांना जबरदस्तीने मुसलमान केले होते. त्यांना त्यांनी परत हिंदू धर्मात घेतले व आपले नातेसंबंध जोडले. स्वतःचा सार्वभौम राज्याभिषेक करून त्यांनी क्षत्रिय नष्ट झालेले नाहीत तर आजही आहेत हे सिद्ध केले. त्यामुळे लोकशाहीतही लोक त्यांचा राज्याभिषेक आनंदाने साजरा करतात.

अविस्मरणीय व प्रेरणादायी घटना

शिवकालीन बखरकार कृष्णाजी अनंत सभासद लिहितात...

“या युगी सर्व पृथ्वीवर म्लेच्छ बादशहा, मराठा पादशहा येव्हढा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य झाली नाही...”

काही शतके हा राज्याभिषेक समारंभ लुप्त झाला होता. राजपूत राजांचा मंचकारोहण समारंभ होई. सार्वभौम सत्ता प्राप्त करण्यासाठी राज्याभिषेक आवश्यक होता. धार्मिक दहशतवादाला पायबंद घालण्यासाठी राज्याभिषेक होणे आवश्यक होते. राज्याभिषेकानंतर राजाला अनेक अधिकार प्राप्त होतात. अपराधी ब्राह्मणालाही हा राजा शासन करू शकतो. त्यामुळे ब्राह्मणांनी राजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता. शिवाजी महाराजांनी अत्यंत चतुराईने हा विरोध मोडून काढला. मेवाडचे राजपूत क्षत्रिय सिसोदिया यांचे वंशज असल्याचे सिद्ध झाल्यावर गागा भट्ट यांनी मोठी दक्षिणा घेऊन हा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी संपन्न केला. या समारंभास एक कोटी 42 लाख होन (1 होन बरोबर 4 रुपये) खर्च झाले. ब्राह्मणांची मान्यता मिळाल्यानंतर त्यांनी 24 सप्टेंबर 1674 रोजी शाक्तपंथीय विश्चलपुरीकडूनही तांत्रिक राज्यभिषेक करून घेतला.

राज्याभिषेकाचे ऐतिहासिक महत्त्व

शिवाजी महाराजांच्या सत्तेला धार्मिक व राजकीय मान्यता मिळाल्याने अन्य सत्ताबरोबर समानतेचे नाते निर्माण झाले. त्यामुळे दक्षिण दिग्विजयास जाताना गोवळकोंड्याच्या कुतुबशहाने बरोबरीच्या नात्याने त्यांचे स्वागत केले.
राज्याभिषेकामुळे त्यांनी मराठ्यांमध्ये ‘सिंहायन निष्ठा’ निर्माण केली. या निष्ठेमुळेच मराठ्यांनी 27 वर्षे मोगलांशी संघर्ष केला व मोगल साम्राज्य व औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात खुल्दाबाद येथे बांधली.
 सेनापती हंबीरराव मोहिते यांनी अष्टप्रधानांचा कट उधळून लावला व आपले भाचे राजाराम यांना दूर करून युवराज संभाजीराजे यांना छत्रपती केले.
 संपूर्ण भारतात यावनी सत्तेला आव्हान देणारी सार्वभौम मराठी सत्ता निर्माण झाली.
याच सिंहासन निष्ठेमुळे नंतर मराठ्यांनी अटकेपार जरीपटका फडकावला.
अंधश्रद्धा नष्ट करून वैज्ञानिक दृष्टी भारतास दिली.

असा संपन्न झाला राज्याभिषेक समारंभ

16 मे रोजी महाराज भवानी देवीच्या दर्शनासाठी प्रतापगडावर गेले व सव्वा मण सोन्याची छत्री भवानीस अर्पण केली.
29 मे रोजी गागा भट्टाने महाराजांचे मौजी बंधन केले. तुलादान विधी व प्रायश्चित विधी पार पाडले.
हयात राण्यांशी पुन्हा वैदिक पद्धतीने विवाह केले.

6 जून 1674 इ. ज्येष्ठ शुद्ध 13 शनिवार या दिवशी राज्याभिषेक समारंभ संपन्न झाला. 32 मण सोन्याचे हिरे माणके जडविलेल्या सिंहासनावर महाराज आरूढ झाले. मागे तराजू, मासा व घोड्याची शेपूट या वस्तू प्रतीकरूपाने लावलेल्या होत्या. तराजू = न्यायीराजा, मासा = सागरावर सत्ता गाजवणारा राजा व घोड्याची शेपूट = घोडदळाचा शक्तिशाली राजा, आठ दिशांना आठ प्रधान, पट्टराणी सोयरा, युवराज संभाजी व राजमाता पायरीवर विराजमान होते.

सर्व गडावर तोफा गरजल्या व मराठ्यांचा राजा छत्रपती झाल्याची घोषणा केली. शस्त्रपूजा करून अश्वारूढ व हत्तीवर बसून गडावरील देवतांचे दर्शन केले. हत्तीवर माहूत म्हणून सेनापती हंबीरराव मोहिते होते व अंबारीमध्ये मोर्चेल धरून मोरोपंत बसले होते. त्या काळी गडावर हत्ती कसे नेले हे एक कोडे आहे.

हा समारंभ तिथीनुसार केल्यास दरवर्षी तारीख बदलते. संपूर्ण भारतातही एकाच वेळी समारंभ होऊ शकत नाही. कारण नर्मदा नदीच्या दक्षिणेस आमचा मराठी महिना अमावास्येनंतर सुरू होतो व नर्मदेच्या उत्तरेस पौर्णिमेनंतर भारतीय महिना सुरू होतो. यामुळे तारखेनुसार 6 जूनला समारंभ केल्यास सर्व भारतभर व जगभर एकाच दिवशी समारंभ होईल. कोल्हापूरचे शिवप्रेमी तारखेनुसार समारंभ करत असताना तिथी वाद्यांनी त्यांना मारहाण केली. दुसरे वर्षी खा. संभाजीराजे छत्रपती यांनी मुलांना मोफत जेवण व अल्पदरात प्रवास या सोयी दिल्या. हजारो कोल्हापुरी पैलवान रायगडावर दाखल झाले. तिथीवाल्यांशी संघर्ष झाला व ते पळून गेले. त्यानंतर ते अडथळा करत नाहीत. कारण आता देशभरातून लाखो शिवप्रेमी रायगडावर या समारंभासाठी येतात. आता हा लोकोत्सव केला आहे.
देशातीत, कालातीत व धर्मातीत प्रेरणा देणारे हे चरित्र आहे. यांचे विस्मरण झाल्यास संकट ओढवेल. उज्ज्वल भवितव्यासाठी हा उत्सव होणे आवश्यक आहे.