Tue, Jul 14, 2020 00:21होमपेज › Bahar › अपरिपक्वतेचा परिपाक; तुल्यबळ लढाईत विजय अनुभवाचा

अपरिपक्वतेचा परिपाक; तुल्यबळ लढाईत विजय अनुभवाचा

Last Updated: Dec 01 2019 1:30AM
हेमचंद्र फडके

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या महिन्या-दोन महिन्यांतील घडामोडी या बुद्धिबळाच्या डावाप्रमाणे घडत गेल्या आहेत. सत्ताकारणाच्या या पटावर एकीकडे होते सत्ताधीश असणारे अमित शहा, फडणवीस आणि दुसरीकडे होते मुत्सद्दी, कसलेले, निष्णात राजकारणी शरद पवार. अमित शहांची ओळख भाजपचे आधुनिक चाणक्य, तर पवार हे तेल लावलेल्या पैलवानांच्या कुस्तीगीर संघटनेचे माजी अध्यक्ष. सत्तेच्या जोरावर काहीही करता येतं, या भ्रमात असणार्‍या शहांचे डावपेच राजकारणात अर्धशतक घालवलेल्या 80 वर्षांच्या पवारांनी ज्या पद्धतीने पलटवून टाकले त्याची नोंद इतिहासात ठळकपणाने झाल्याशिवाय राहणार नाही...

सत्तेपुढं शहाणपण चालत नाही, सत्ता हेच सर्वस्व असतं, सत्तेच्या बळावर काहीही करता येतं, असं मानलं जातं; पण बुद्धिबळाच्या खेळात एखादे प्यादेही वजिरावर वरचढ ठरू शकते. राजकारणाच्या क्षेत्रातही तसे अनेकदा घडते. विशेषतः, दोन वजीर जेव्हा आमने-सामने येतात, तेव्हा त्यांच्यातील लढत रंगतदार असते. अशी लढत महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळाली. यातील एक वजीर थेटपणानं पडद्यावर किंवा रणांगणात नसला, तरी तो सूत्रधार होता हे लपून राहिलेले नाही. दुसरा वजीर मात्र थेट शड्डू ठोकून रणांगणात उतरलेला. राजकारणातला मुरब्बी. किंबहुना, राजाच. तोही जाणता. राजकारणातले उन्हाळे-पावसाळे, कोरडे दुष्काळ-ओले दुष्काळ अनुभवलेला. बाजी पलटवण्यात माहिर असलेला आणि अनप्रेडिक्टेबल म्हणजेच ज्याच्या खेळींचा अंदाज कुणालाही न येणारा. दुसरीकडे पडद्यामागचा मुख्य सूत्रधार असणारा वजीरही तसा निष्णात. अशक्य ते शक्य करून दाखवलेला. सत्तेचा सोपान चढलेला. इतिहास घडवलेला. थोडक्यात, दोघेही तसे तुल्यबळच. मुत्सद्देगिरीतही दोघांची ख्याती; पण या तुल्यबळ लढाईमध्ये शेवटी विजय झाला तो अनुभवाचा, संयमाचा. हे सारं वर्णन आहे अमित शहा आणि शरद पवार यांचे आणि लढाई आहे महाराष्ट्रातील. 

तसे पाहता अमित शहांना ज्यांनी राजकारणात आणलं त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा आदर करणार्‍यांच्या यादीत मीही एक असून, त्यांनीच मला राजकारणात बोट धरून चालायला शिकवले, अशी जाहीर कबुली दिली होती. यावरून पवारांच्या राजकीय कौशल्याचा अंदाज अमित शहा यांना आल्याचे दिसले नाही. त्यामुळेच असेल कदाचित; पण लोकसभा निवडणुकांपाठोपाठ विधानसभा निवडणुकांमध्येही त्यांनी महाराष्ट्रात पवार कुटुंबाला टार्गेट करण्याचे धोरण अवलंबले. लोकसभेला विजय मिळाल्यानंतर विधानसभेलाही तोच धागा पुढे नेला. धार वाढवली. सोलापूरच्या सभेमध्ये गेल्या 50 वर्षांमध्ये शरद पवारांनी महाराष्ट्राला काय दिलं? असा रोकडा सवाल आपल्या आक्रमक शैलीत शहा यांनी विचारला. टाळ्या पडल्या; पण या प्रश्नानं पवारांना बळ दिलं. लोकसभेलाही ते सर्वशक्तीनीशीच रिंगणात उतरले होते; पण फारसं यश न मिळाल्यामुळं काहीसा धक्का बसला होता. थेट आपल्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीवरच आणि योगदानावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे आणि तेही काल-परवा राष्ट्रीय राजकारणात उदयास आलेली व्यक्ती हे आव्हान आपल्या महाराष्ट्राच्या मातीत येऊन देत आहे हे लक्षात आल्यावर पवारांनी शड्डू ठोकला. कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्षच ते. त्यामुळं कुस्तीतील अनेक खाचाखोचा आणि युक्त्या याची त्यांना पुरेपूर जाणीव.

त्याचबरोबर क्रिकेट हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणं कोणत्या चेंडूवर षटकार मारायचा आणि मॅच फिरवायची हे फलंदाजाला माहीत असावं लागतं, तसंच राजकारणाचंही आहे. विरोधकांचा कोणता मुद्दा अचूकपणानं उचलत रान उठवायचं हे राजकारण्यांना माहीत असावं लागतं. पवार तर राजकारण कोळून प्यायलेले. त्यामुळं आधीच शड्डू ठोकून मैदानात उतरलेले असतानाच राज्य सहकारी बँकेच्या गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या म्हणजेच ‘ईडी’च्या आरोपपत्रात आपलं नाव आल्याचा चेंडू त्यांनी अचूकपणानं हेरला. भाजपच्या द़ृष्टीनं तो यॉर्कर होता; पण पवारांनी त्यावर षटकार मारला. राज्यात सहानुभूतीची लाट निर्माण केली आणि त्याला दिल्ली विरुद्ध मराठी माणूस असं रूप दिलं. दिल्लीच्या गादीपुढं झुकण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही, अशी गर्जना करत वयाच्या 80 व्या वर्षी पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पिंजून काढत आपल्या पक्षाला ऊर्जितावस्था दिली. 

वास्तविक, विधानसभा निवडणुकांपूर्वीचं चित्र राष्ट्रवादीसाठी धक्कादायक होतं. जुने सहकारी, आप्तेष्ट सोडून चालले होते; पण त्यामुळं खचून न जाता पवार मैदानात उतरले. आपण लढा देऊनही सत्ता मिळवण्याइतकं संख्याबळ नाही हे लक्षात आल्यावर शांत राहिले; पण पवारांच्या राजकारणाचा अभ्यास असणार्‍यांना त्यांची शांतता सूचक वाटत होती. आम्हाला जनतेनं विरोधात बसण्याचा कौल दिला आहे, असं सातत्यानं सांगणारे पवार त्रिशंकू स्थितीत गप्प राहतील, असं मानायला जाणकार तयार नव्हते. अखेर ते खरं ठरलं. भाजप आणि शिवसेना यांच्यातील हेवेदावे शिगेला पोहोचले असून, सत्तास्थापनेसाठी भाजपने असमर्थता दर्शवली आहे, हे लक्षात आल्यावर पवारांनी शिवसेनेला सोबत घेऊन सत्तेची समीकरणं मांडायला सुरुवात केली. या दोन पक्षांचं संख्याबळ पुरेसं नसल्यानं काँग्रेसची सोबत गरजेची होती. त्यासाठी मनधरणी केली. चर्चांच्या अनेक फेर्‍या केल्या आणि अखेर महाविकास आघाडीची उभारणी केली. 

हे सरकार सत्ता स्थापन करणार असं वाटत असतानाच पवारांचे पुतणे आणि राष्ट्रवादीतील दुसर्‍या क्रमांचे नेते अजित पवार यांनी थेट भाजपशी हातमिळवणी केली. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर शपथविधीही उरकून घेतला. अजित पवार विधिमंडळ गटनेते. त्यामुळं व्हिप काढण्याचा अधिकार त्यांचा. सर्व सदस्यांच्या स्वाक्षरीचे पत्रही त्यांनी राज्यपालांना दिलेले. प्रसंग मोठा बाका होता; पण पुन्हा एकदा न डगमगता पवार मैदानात उतरले. सर्वप्रथम काँग्रेस-शिवसेनेला विश्वास दिला की, अजित पवारांच्या मताशी मी सहमत नाही. तशी जाहीर भूमिका मांडली. अजित पवारांचे जवळचे सहकारी असणार्‍या धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्यासह अन्य आमदारांना परत आणले. त्यांना माध्यमांसमोर भूमिका मांडायला लावली. यातून अजित पवारांना आपण एकटे पडत आहोत हे जाणवून दिले.

यानंतर आमच्याकडे 162 जण आहेत, हे फोटोसेशन करून सर्वांना दाखवून दिले. हे करत असताना दुसर्‍या बाजूने राष्ट्रवादीतील नेत्यांना सातत्यानं अजित पवारांच्या भेटीसाठी पाठवण्यात येत होते. तरीही अजित पवार ऐकायला तयार नाहीत, हे लक्षात आल्यानंतर कौटुंबिक सदस्यांना पाठवले. भावनिक आवाहने केली. त्यांना पक्षातून काढून टाकलेले नाही, पक्षाची दारं त्यांच्यासाठी आजही खुली आहेत हे दाखवून दिलं. तितक्यात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला. गुप्तपणानं बहुमत चाचणी न घेता लाईव्ह टेलिकास्टिंग करण्याचे आदेश आले आणि दादांनी राजीनामा दिला. पाठोपाठ फडणवीसांनीही राजीनामा दिला आणि पवारांनी सुटकेचा निःश्वास सोडला. विधानसभा निवडणुकांमध्ये पैलवान, तेल लावलेला पैलवान, असे उल्लेख अनेकदा झाले होते. सर्वात अल्पकाळचे मुख्यमंत्री बनवून पवारांनी फडणवीसांना चितपट करत कुस्तीगीर संघटनेचा मी अध्यक्ष होतो, याची प्रचिती दिली आहे. 

राजीनामा देताना फडणवीसांनी या निर्णयाची जबाबदारी राज्य पातळीवरच आहे, असे सांगितले असले तरी अमित शहांच्या मर्जीशिवाय भाजपमध्ये पानही हलत नाही. त्यामुळं पवारांनी दिलेला हा शह शहांनाही आहे. भाजपमधील चाणक्य म्हणून शहांची ख्याती आहे. तथापि, महाराष्ट्रात ही चाणक्यनीती फोल ठरली आहे. नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असले, तरी या सरकारचे खरे किंगमेकर शरद पवारच आहेत. उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री व्हावं, यासाठीचा आग्रहही पवारांचाच. हादेखील पवारांनी शहांना दिलेला शहच.

कारण, ज्या मुख्यमंत्रिपदाच्या समसमान वाटणीवरून भाजप-सेना युती तुटली, त्यासंदर्भातील बैठक-बोलणी ही उद्धव आणि अमित शहा यांच्यातच झाली होती. तसेच उद्धव ठाकरेंनी आजवर अनेकदा अमित शहांच्या राजकारणावर टीका केलेली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकांवेळी अमित शहांसह भाजपचे देशभरातील नेते प्रचारासाठी आले होते तेव्हा उद्धव यांनी त्यांचा उल्लेेख अफजलखानाच्या फौजा असा केला होता. पवारांमागे ‘ईडी’ची पीडा लावण्याचा प्रयत्न झाला तेव्हाही असले सुडाचे राजकारण आमच्या रक्तात नाही, असे सांगत उद्धव यांनी अमित शहांवरच निशाणा साधला होता. आता त्याच उद्धव यांना पवारांनी मुख्यमंत्री बनवलं आहे. पवारांना आजच्यापेक्षा उद्याचं राजकारण अधिक कळतं, असं त्यांचे निकटवर्तीय सांगतात. त्यामुळं उद्याच्या राजकारणात हा 80 वर्षांचा निष्णात खेळाडू कोणता गेम टाकतो आणि त्यावर कोणाकोणाची विकेट निघते हे पाहायचे.

रातोरात चक्रे फिरणे, भल्या सकाळी शपथविधी उरकला जाणे आणि अवघ्या 80 तासांत राजीनामे देणे, हा घटनाक्रम केवळ धक्कादायक नसून त्रासदायक आहे. हे कोणामुळे घडले, राजकीय नीतिमत्ता कोणी सोडली, असे प्रश्न विचारून कोणताही पक्ष इतरांकडे बोट दाखवू शकणार नाही. विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष या नात्याने भाजपची जबाबदारी सर्वात मोठी होती आणि सर्वात कमी राजकीय परिपक्वता याच पक्षाने दाखविली. इतर लोक ‘सत्तेसाठी’ जे करतात तेच आम्ही ‘राज्याच्या हितासाठी’ करतो आणि म्हणून ते नैतिक आहे, हे मतदारांनी कसे आणि का स्वीकारावे?

ज्या एकमेव कारणावरून तीस वर्षांच्या या मित्रांमध्ये दुरावा निर्माण झाला, ते म्हणजे मुख्यमंत्रिपद. तेही अडीच वर्षांचे. हिंदुत्व हा दोन्ही पक्षांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असताना हा एकमेव प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित होते. परंतु, शिवसेना नेत्यांना बोलत राहण्यास भाग पाडून भाजप नेते शांत राहिले. विधानसभेचा कार्यकाळ संपण्याच्या वेळेपर्यंत ही शांतता कायम होती आणि अगदी शेवटी-शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन पत्रकार परिषद घेतली. त्यातही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खोटे बोलत आहेत, असा आरोप केला. शिवसेना नेते खोटे बोलत होते, तर ते विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी का सांगितले नाही, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो.