Mon, Apr 06, 2020 10:45होमपेज › Bahar › प्रेम जुळलं, हे कळलं! म्होरं काय?

प्रेम जुळलं, हे कळलं! म्होरं काय?

Last Updated: Feb 22 2020 9:38PM

संग्रहित छायाचित्रनितीन विनायक कुलकर्णी

सरकारी हाफिसात काम होतं म्हणून सकाळचं जेवण करूनच कोल्हापुरात आलो. न्हाई न्हाई म्हणत अर्धा दिवस मोडतोयच ह्यो अनुभव हाय. नुसती चौकशी करायची म्हणलं, तरी पाया पडत तीन-चार टेबलांची फेरी काढाय लागती. एकदा एकदा कागदात बघत्यात, एकदा कामपुटरवर बघत्यात; पण समोरच्या माणसाकडं वर न बघता म्हंत्यात, थांबा जरा डाऊनलोड व्हाय लागलंय. आता काय डाऊन व्हाय लागलंय आनी काय लोड व्हाय लागलंय ते त्यास्नीच दखल. आपल्याकडनं काय कच्च राह्यला नगो म्हणून त्यांनी सांगितल्याली आनी बिन सांगितल्याली बी कागदपत्रं पिशवीतनं संगटच घ्यून आलो होतो. शिपायाला कागदं दाखवली आनी म्हणलं, “मामा, ह्यासाठी आलोय.” त्यानं वरवर नजर टाकली आनी चष्मा पुसत म्हणाला, “बसा पाळीत त्या बाकावर, लई लई ते अर्धा तास लागंल.” माज्यासारख्या माणसाला कामात असल्याव काय न्हाई पर एका जाग्यावर बसल्याव कंबर, गुडगं दुखाय लागत्यात हे त्याला कसं सांगणार? गपवानी बाकाव बसलो. माळावर चरत्यालं ढॉर जसं बेताबेतानं म्होरं जातंय, तसं पाळीतली मान्सं तिथल्या तिथं म्होरं सरकत हुती. फिरून फिरून घाईला आल्याला पंखा कुरकुर करत का असंना खरं फिरत हुता. कामासाठी आलेल्या चार-पाच बायका होत्या. “तुला म्हणून सांगतो” असं म्हणत होत्या; पण ते बसलेल्या सगळ्यास्नी ऐकायला मिळत होतं. वेळ जात नसंल तवा दुसर्‍याचं बोलणं इंटरेस्टिंग वाटाय लागतं. ऐकत ऐकत म्होरं सरकणं चालूच होतं, असा नंबर आला आनी शिपाई म्हणला, “साहेब, अर्जंट मिटिंगसाठी दुसर्‍या ऑफिसला निघालेत. आता राहिलेले तुम्ही सगळे बरोबर चार वाजता या. परत आल्यावर हाय ह्या नंबरप्रमाणं तुमचं तुमी बाकावर बसा.” मधल्या वेळेत कुठं जायचं हे काय त्यानं सांगितलं न्हाई. सगळीजणं बोलवून बुक्क्या मारल्यावानी तोंड करून मनातल्या मनात बोलत तिथनं बाहेर पडली. मी मात्र शिपायाला म्हणलं, “चला मामा, चा घ्यूया की.” बिचारा मोठ्या मनाचा, लगेच म्हणला, “छे, छे, कशाला काय? आता आमी जेवणारच हाय. काही नको चा-पाणी, तुम्ही जाऊन या. संध्याकाळी मस्तपैकी नाष्टा-चहा-पाणी द्या. मी तुम्हाला अजिबात नाराज करणार नाही. मग तर झालं. अहो, नाना वडीलधार्‍यांचा मान ह्यो ठेवलाच पायजे. जातानं सगळं हिथंच सोडून जायचं हाय.”

मानंन व्हय व्हय म्हणत मनात विचार आला. हिथंच सोडून जायचं म्हणून काय नुसतं दुसर्‍यानं दिल्यालंच खायचं? वडील असून बी धारा विचार कराय नगो म्हणून गाड्यावर जाऊन डेर्‍यातलं ताक पिऊन दहा रुपये देऊन मी सोताचा मान राखला. आता ताकाचा बी मान राखायचा म्हंजे बारीकसा डुलका काढायला पाहिजे म्हणून जवळच्या बागेत एका दाट सावलीच्या झाडाखाली जाऊन बसलो. हिकडचा तिकडचा अंदाज घेतला. रुमाल पसरला आनी पिशवी डोस्क्याखाली घेऊन आडवा झालो. झाडावर बसल्याली पाखरं तोंडावर शीटतील या भीतीने तोंडावर टोपी झाकली. डुलका लागाय लागला हुता आनी कानावर शब्द पडलं. “इतके दिवस झाले आपण भेटतो. फोनवर बोलतो. एकमेकांना मेसेज पाठवतो. फोटो काढतो. गाडीवरून फिरायला जातो. आपलं प्रेम आहे; पण हे असं किती दिवस चोरून ठेवायचं.” जागाच हुतो; पण बुजवाय नको म्हणून जागचा हाललो न्हाई. प्रेम जुळलं हे कळलं, म्होरं काय? म्हणून गपगार पडून राह्यलो. पोरगी रडाय लागली म्हणली, “तू तुझ्या घरच्या लोकांना सांग आणि स्थळ बघण्यासाठी म्हणून आमच्या घरी या. जर नकार दिला तर आपण पळून जाऊन लग्‍न करू.” ह्यो प्रेम करणारा बहाद्दर म्हणाला, “मला हे मान्य आहे. मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही; पण पळून जायचं नाही. त्यांनी कोणी परवानगी दिली नाही तर मी आत्महत्या करीन.” झालं दोघं बी रडाय लागली. मला गप बशीवतंय व्हय. त्यास्नी शुद्धीवर आणून धीर द्यावा म्हणून उठलो. त्यांच्या जवळ गेलो आणि म्हणलं, “बाळानू, प्रेम करणं ह्यो काय गुन्हा न्हवं; पण आई-वडिलांचा विश्‍वासघात करणं हे चुकीचं हाय. असा पळपुटेपणा कशापायी. मानानं, विश्‍वासानं वाजतगाजत लगीन करा.” माझं बोलणं ऐकून पोरगं ताडकन उठून माज्या पाया पडलं म्हणालं, “अशा धीर देणार्‍या, प्रेमाला पाठिंबा देणार्‍या, मदत करणार्‍या माणसांची आज गरज आहे. तुमच्यासारखे माझे वडील असते, तर आतापर्यंत मी वडील झालो असतो. ते स्वभावानं फार खडूस आहेत. धक्के देऊन घरातनं बाहेर काढतील. आयडिया, हिच्या घरी स्थळ बघायला जाण्यासाठी तुम्ही आणि तुमची बायको माझे आई-वडील व्हाल? पुढची सगळी जबाबदारी, परफेक्ट प्लॅन माझा. चर्चेतून तोडगा निघतो. लढाई चांगली न्हवं, असं सांगणार्‍याच्याच खांद्यावर त्यानं बंदूक ठेवली. डुलक्यातली लव्ह स्टोरी लग्‍नाआधी जागी झाली...”