Mon, Nov 30, 2020 12:50होमपेज › Bahar › ‘रिस्किलिंग’ला पर्याय नाही!

‘रिस्किलिंग’ला पर्याय नाही!

Last Updated: Nov 21 2020 11:21PM
डॉ. योगेश जाधव,  
(व्यवस्थापकीय संपादक दै.‘पुढारी’)

‘कोविड -19’ च्या  महामारीने अनेक संकटांच्या मालिकांना सामोरे जावे लागले आहे. मात्र नोकरी, करिअर आणि उद्योग व्यवसाय करणार्‍यांसाठी ही इष्टापत्ती ठरली आहे. रिस्किलिंग आणि अपस्किलिंगचे महत्त्व त्यामुळे अधोरेखित झाले. शिकण्याची प्रक्रिया आयुष्यभराची आहे, हे आता ओळखून आपल्या सर्वांना बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यावे लागेल.

कोविड- 19 नंतरच्या ‘न्यू नॉर्मल’ शी जुळवून घेणे, हे तितकेसे सोपे नसले तरी ते टाळता येणारे नाही. हा बदल नोकरी, रोजगार आणि उद्योगाच्या क्षेत्रात ठळक पणे जाणवत आहे. वस्तुत: कोविड संकटाच्या आधीपासूनच बदलत्या तंत्रज्ञानामुळे आणि काम करण्याच्या नव्या पद्धतीमुळे नोकर्‍यांच्या आणि कौशल्य विकसनाच्या आघाडीवर मोठी उलथापालथ म्हणजेच ‘डिसरप्शन’ होत असल्याचे लक्षात आले होते. वाढते  ऑटोमेशन  आणि अर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे जगातील वर्कफोर्सपैकी सुमारे 14 टक्क्यांना म्हणजे 37 कोटी 50 लाख कर्मचारी, कामगार आणि अधिकार्‍यांना 2030 पर्यंत आपला व्यवसाय बदलावा लागेल किंवा नवीन कौशल्ये शिकून घ्यावी लागतील, असा अंदाज  मॅकेन्झी ग्लोबल इन्स्टिट्यूटने 2017 मध्ये व्यक्त केला होता. याच सल्लागार कंपनीच्या अलीकडच्या जागतिक  पाहणी अहवालानुसार 87 टक्के एक्झिक्युटिव्हजने कर्मचार्‍यांचे सध्याचे आणि अपेक्षित कौशल्य यात मोठी तफावत (स्कील गॅप) असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. कोविडमुळे ही तफावत दूर करण्याचे काम तातडीने करावे लागेल, हेही आता कॉर्पोरेट जगाच्या लक्षात आले आहे.

त्यामुळे कंपन्यांना आपली ‘टॅलेंट स्टॅट्रेजी’ ठरवावी लागणार आहे. कर्मचारी नव्या बदलाला जुळवून घेण्यासाठी सक्षम होतील, त्यासाठी त्यांच्या क्रिटिकल, डिजिटल आणि  कॉग्निटिव्ह (आकलनविषयक) क्षमता विकसित करणे, भावनात्मक, संवेदनशील आणि सामाजिक कौशल्य  वृद्धिंगत करणे आणि नव्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्यांच्यातील रेझिलिअन्स (लवचिकता) वाढविणे, हे अग्रक्रमाने करावे लागेल. शिकण्याची प्रक्रिया शाळा, कॉलेजपुरती मर्यादित न राहता ती आयुष्यभर चालणारी आहे, हे आता कोविडने आपल्या सर्वांना शिकविले आहे. आपल्याकडे 35 च्या आतील युवकांची संख्या लोकसंख्येच्या 65 टक्के आहे. हा डेमोग्रॅफिक डिव्हिडंट आहे, हे नि:संशय. पण, या तरुणांनी नवीन कौशल्ये आत्मसात केली नाहीत तर हा डेमोग्रॅफिक डिव्हिडंट ‘डेमोग्रॅफिक डिझास्टर’मध्येही बदलण्याचा धोका आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकसनाला प्राधान्य देऊन त्यासाठी वेळीच काही पावले उचलली आहेत, हे स्वागतार्ह म्हटले पाहिजे. 

देशातील एकूण लोकसंख्येपैकी 68 टक्के तरुण ग्रामीण भागातील आहेत. पण, नव्या व्यावसायिक प्रशिक्षणाची संधी या युवा वर्गापर्यंत फारशी झिरपलेली नाही. त्यामुळे दर्जेदार प्रशिक्षकांची वानवा, पुरेशा प्रशिक्षण सुविधेचा अभाव आणि मोठ्या प्रमाणावरील ड्रॉप आऊट्स हे या मार्गातील प्रमुख अडसर आधी दूर करावे लागतील. 2020 चे नवीन शैक्षणिक धोरण या पार्श्वभूमीवर आशेचा किरण म्हणावा लागेल. कारण यात ‘स्कील गॅप’ भरून काढण्यासाठी शालेय पातळीपासून ते उच्च शिक्षण पातळीपर्यंत टप्प्याटप्प्याने मुख्य शिक्षणाला व्यावसायिक प्रशिक्षणाची जोड देण्यात आली आहे. आपल्याकडील एकूण वर्कफोर्सपैकी मोठा वर्ग (सुमारे 70 टक्के) ग्रामीण भागातून येत असल्याने त्याला या धोरणाचा मोठा लाभ होईल, यात शंका नाही.  कोविडचा आणखी एक सकारात्मक परिणाम म्हणजे ई लर्निंगकडील वाढता कल. त्याद्वारे ग्रामीण भागापर्यंत व्यावसायिक शिक्षणाचे अभ्यासक्रमही पोहोचू शकतात. महिलांना त्याचा अधिक फायदा होईल. कारण घरबसल्या त्या नवी कौशल्ये शिकू शकतील. अलीकडील काळात इंटरनेट वापराचे प्रमाण ग्रामीण भागातही स्मार्ट फोनमुळे वाढले आहे. तथापि  खेडोपाडी ई लर्निंगची व्याप्ती वाढवायची असेल तर ब्रॉडबँड क्रांतीची आणि टॅबलेटस् आणि पीसी अशा हार्डवेअर उपलब्धतेची गरज आहे. त्याच्या किमतीही परवडणार्‍या हव्यात. शेतीखेरीज इतरही काही क्षेत्रे रोजगारासाठी निर्माण होत असल्याचे पहायला मिळते. विशेषत: हेल्थ केअरमध्ये मोठी संधी दिसते. ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी आणखी एक रोजगाराचे आकर्षक क्षेत्र विकसित होऊ शकते. ते म्हणजे शेतीशी निगडित कृषी विस्तार सेवेचे. यात फूड प्रोसेसिंग, कृषी आधारित ई कॉमर्स, सोलर टेक्निशिअन्स हे सारे येऊ शकते.  

कोविडमुळे आपल्यापैकी अनेकांना रिमोट वर्किंग आणि टेलिकम्युटिंग याला सामोरे जाणे भाग पडले आहे. हा बदल काही प्रमाणात कायमस्वरूपी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातूनही ग्रामीण युवकांना, विशेषत: युवतींना नोकरीच्या नव्या संधीची दालने खुली होत आहेत. ग्रामीण किंवा निम ग्रामीण भागात बीपीओ (बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग) उभारून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होऊ शकेल. त्या दिशेने पावले पडत आहेत, ही समाधानाची बाब आहे. हे प्रत्यक्षात आले तर कदाचित एखादी भूमिहीन मजुराची मुलगी घरी बसून प्रोग्रॅमर किंवा कंटेंट डेव्हलपर झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. ग्रामीण भागात कौशल्य प्रशिक्षण आणि कामाच्या नव्या संधी निर्माण होण्याचे नवे दालन खुले करण्यास  जसा कोविड कॅटॅलिस्ट म्हणजे सहायक झाला आहे, तसाच बदल त्याने शहरी भागातही घडवून आणलेला पाहता येतो. नोकर्‍यांच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर अनिश्चितता असल्याने रिस्किलिंगचा व्यवसाय सध्या जोमात आहे. आपण जे कौशल्य शिकलो तेच कायम वापरले जाईल, याची शाश्वती देणे तूर्त अवघड वाटते. त्यात वारंवार सुधारणा करणे, अवगत असलेल्या कौशल्यात नव्या बाबींची भर घालून त्याला पूरक आणि पोषक गोष्टी शिकत राहणे, बदलत्या काळात आपण ‘रेलेव्हंट’ राहणे हे करिअरसाठी गरजेचे झाले आहे. आपण जे कौशल्य आत्मसात केले आहे, ते कामच संपून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा आधीच अंदाज घेऊन रिस्किलिंगच्या तयारीला लागणे, नव्या तंत्रज्ञानाचा आधीच अंदाज घेऊन त्याद़ृष्टीने स्वत:ला अपडेट ठेवणे, ही काळाची गरज झाली आहे. हे सर्व रिस्किलिंगशी निगडित आहे. तर अपस्किलिंगमध्ये आपल्या कौशल्यात आधुनिकता आणणे, हे काम वरच्या स्तरावर नेणे, कधीच न केलेले काम करून पाहणे, कामाची जबाबदारी घेत त्यात अधिक कल्पकता वापरून नव्या गोष्टी करणे, नवे तंत्रज्ञान शिकणे, नवा अभ्यासक्रम शिकणे हे अभिप्रेत आहे.  

कोविड काळात संकटाचे संधीत रूपांतर केल्याची असंख्य प्रेरणादायी उदाहरणे सापडतील. या काळात नोकरी गमावलेल्या पुण्यातल्या शीतल कोरे या महिलेने साईन बोर्डासाठी लागणार्‍या अक्षरांच्या लेझर कटिंगचे तंत्र सेल्फ लर्निंगद्वारे शिकून घेतले. त्याचे मशीन कर्जाद्वारे विकत घेऊन उद्योजक होण्याचे धाडस तिने प्रत्यक्षात आणले. एच आर प्रोसेसमध्ये काम करणार्‍या जिशा कुमार या अधिकारी महिलेने त्याच कंपनीत अर्टिफिशिअल इंटेलिजन्स टीममध्ये जाण्याचा मान मिळविला. कारण तिने या विषयाशी निगडित अभ्यासक्रम फावल्या वेळेत पूर्ण केला. एका ट्रॅव्हल कंपनीत काम करणार्‍या 29 वर्षे वयाच्या अनिल शर्मा या तरुणाची नोकरी कोविड संकटात गेली, पण त्याने एमएस एक्सेल आणि ऑफिस सिस्टीमचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्याला युकेत मुख्यालय असलेल्या बँक ऑफिसमध्ये दुसरी चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकली. ही काही उदाहरणे रिस्किलिंगचे कोविड काळातील महत्त्व अधोरेखित करतात. हे लक्षात घेऊन अनेक स्टार्ट अप कंपन्या यासंबंधीच्या नव्या कौशल्य प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम घेऊन आल्या आहेत. 1 हजारापासून 1 लाख रुपयांपर्यंतची शुल्क आकारणी साधारणत: केली जाते. मोठमोठ्या फी असूनही तिथे नोंदणीसाठी वेटिंग लिस्ट आहे. अनेक कंपन्या आपले कर्मचारी शिकण्यासाठी तिकडे पाठवितात, काही जण स्वत:च शुल्क भरून हा अभ्यसक्रम पसंत करतात. कॅम्पस् भरतीत पदवीधर तरुणांना नोकरीची संधी 

आयटी क्षेत्र देते, पण ते जे शिकलेले असतात, ते 3 ते 5 वर्षांत कालबाह्य होत असल्याने त्यांना रिस्किलिंगची गरज भासते. सध्या जो 42 लाखांचा आयटी बीपीओ हा वर्कफोर्स आहे, त्यापैकी निम्म्यांना रिस्किलिंगची आवश्यकता आहे. ताज हॉटेल चेन चालविणार्‍या  इंडियन हॉटेल कंपनीपासून ते आयसीआयसीआय प्रुडेन्शिअलपर्यंतच्या असंख्य कंपन्यांनी या काळात रिस्किलिंगवर भर दिला. पब्लिक प्रायव्हेट भागीदारीत सरकारने स्थापन केलेल्या नॅशनल स्कील्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या eSkill India portal ला मिळत असलेला प्रतिसाद याचे वाढते महत्त्व द़ृष्टोत्पतीस आणून देणारा आहे. फेब्रुवारी 2020 ला सुरुवात झाल्यापासून सप्टेंबरपर्यंत तेथील नोंदणीत तब्बल 2  हजार टक्के वाढ झाली. हा आकडा सप्टेंबरमध्ये 3 लाखांहून अधिक झाला होता. डिजिटल स्किल्सचे शिक्षण देण्याच्या या प्रयत्नात नॅसकॉम चे Future Skills, upGrad, Simplilearn, Harappa Education यासारख्या ऑनलाईन पोर्टलची मदत घेण्यात आली आहे. स्किल्सफोरमवर महिन्याला 1 लाख लर्नर्स येत असतात. अपग्रॅड वर मार्चमध्ये 4.8 लाख लर्नर्स होते, त्यांची संख्या ऑगस्टमध्ये 8.3  लाखांवर गेली आहे. अलीकडे कंपन्यांना मॅनेजर हवे असतात ते टेकसॅव्ही आणि ताण घेण्याच्या क्षमतेचे असावेत, अशी त्यांची अपेक्षा असते. फूडशी निगडित एका कंपनीला अलीकडे विक्री विभागासाठी एक प्रमुख नेमावयाचा होता, त्यासाठी ई कॉमर्स कंपनीतील कामाच्या अनुभवाची अट घालण्यात आली होती. नॅसकॉमने फ्युचरस्कील उपक्रम 2018 मध्ये सुरू केला. त्यानंतर 100 वर कंपन्यांनी आपले कर्मचारी तिथे प्रशिक्षणासाठी पाठविले. डाटा अ‍ॅनॅलिटिक्स, मशीन लर्निंग, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मायक्रोसॉफ्ट आणि अ‍ॅडोब सिस्टीम्स इत्यादी तंत्रज्ञानाची कौशल्ये त्यांना शिकविण्यात आली, अनेक  स्टार्ट अप्स त्यांना वाटाघाटी करणे, एखाद्या विषयावर मतैक्य घडवून आणणे, डिझाईन थिंकिंग इत्यादी मॅनेजरिअल कौशल्याचेही प्रशिक्षण देतात. तंत्रज्ञान बदलाचा वेग इतका झपाट्याने वाढत आहे की, पदवी शिक्षण पूर्ण होईपर्यंत घेतलेल्या शिक्षणापैकी निम्मे कालबाह्य झालेले असते, या  अपग्रॅडचे सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक मयांक कुमार यांच्या निरीक्षणाशी आपण बहुसंख्य सहमत असणारच. त्यांच्या एका अभ्यासक्रमाचे शुल्क 1 ते 5 लाख रुपये असले तरी महिन्याला सरासरी  50 हजारांवर लर्नर्स नोंदणी करीत असतात.

कॉग्निटिव्ह, सोशल आणि बिहेविरीअल स्कील्स. डिजिटल, टेक, एआय, थ्रीडी प्रिंटिंग, आंत्रप्रुनरशिप, मॅनेजमेंट, डाटा, लॉ इत्यादी अनेक विषय त्याचे ताजे संदर्भ लक्षात घेऊन शिकवावे लागतात. वारंवार होत असलेले तंत्रज्ञानातील बदल, कोणत्याही कौशल्याचे अल्पकालीन शेल्फ लाईफ, कामावर पिंक स्लिप मिळण्याचा किंवा कालबाह्य होण्याचा धोका, करिअरमधील प्रगतीचा मार्ग, महाविद्यालयीन शिक्षणाच्या मर्यादा आणि कंपन्यांना अपेक्षित असलेले डिजिटल टॅलेंट इत्यादी घटकांमुळे रिस्किलिंगला पर्याय राहिलेला नाही. अर्थात रिस्किलिंग काही जादू नाही. अनलर्न आणि रीलर्न या रिस्किलिंगच्या अत्यावश्यक बाजू आहेत, वय कोणतेही असो शिक ण्याची तयारी असेल तर प्रत्येक व्यक्ती काही ना काही प्रांतांत नवे काही शिकू शकते. एकाच नोकरीत कायम राहण्याचे दिवस आता इतिहासजमा झाले आहेत. आता एखादी व्यक्ती त्याच्या हयातीत 4 ते 5 तर काही 10 नोकर्‍या करू शकते. त्यात त्यांची कामाची क्षेत्रेही बदलू शकतात. त्यासाठी नवी कौशल्ये शिकण्याला पर्याय नाही. या क्षेत्रातील एका जाणकाराने या बदलत्या स्थितीचे अत्यंत अचूक उदाहरण देऊन जे विश्लेषण केले आहे, त्याचा उल्लेख शेवटी करावासा वाटतो. त्याच्या म्हणण्यानुसार कोविड काळात मानवी जीवन एखाद्या स्मार्टफोनप्रमाणे झाले. आपला फोन सतत  अपग्रेड करणे आणि ऑपरेटिंग सिस्टीमचे नवे व्हर्जन डाऊनलोड करणे, हे टाळता न येणारे झाले. You need to upgrade all the time . Reskilling will explode.  हे  त्यांच्या म्हणण्यातील मर्म आपण आता ओळखायला हवे.