Mon, Jan 25, 2021 06:49होमपेज › Bahar › सर्वात आनंदी लोकांच्या देशा...

सर्वात आनंदी लोकांच्या देशा...

Last Updated: Feb 08 2020 8:16PM
अमोल पवार, कॅलिफोर्निया 

फिनलँड हा युरोपातील क्षेत्रफळाच्या द‍ृष्टीने आठवा मोठा देश आहे. 1995 मध्ये तो युरोपीय महासंघाचा सदस्य देश बनला. उत्तर युरोपातील हा महासंघाचा एकमेव सदस्य देश असून, युरो हे अधिकृत चलन म्हणून स्वीकारण्यात आले आहे. फिनलँड हा भौगोलिकद‍ृष्ट्या अत्यंत वेगळा देश. मुख्य भूभाग आणि आसपास तब्बल 1 लाख 79 हजार 584 बेटे असून, हा एक जागतिक विक्रम आहे. याखेरीज सरोवरांचा देश म्हणूनच फिनलँड ओळखला जातो. त्याखेरीज जगातील सर्वात आनंदी लोकांचा देश म्हणून फिनलँडने ओळख मिळवली आहे.

माझी नोकरी अचानक गेली तर..? मी म्हातारा झालो आणि माझ्याकडे पुरेसा पैसा नसेल तर..? घरात अचानक एखाद्याचे आजारपण उद्भवले आणि उपचारांसाठी पैसे नसतील तर..? मला अचानक एखादा अपघात झाला तर..? आपल्यापैकी बहुतांश लोकांना या प्रश्‍नांनी अक्षरशः पछाडलेले असते. परंतु, या समस्या तर जगात सर्वांनाच आहेत, असे म्हणून आपण स्वतःचीच समजूत घालतो; पण विचार करा, असे प्रश्‍नच कुणाला पडत नाहीत, असा एखादा देश जगात असेल का? होय, असा एक देश जगाच्या पाठीवर आहे. आश्‍चर्य वाटले ना? फिनलँड हा असा देश आहे, जिथे लोकांना हे प्रश्‍नच पडत नाहीत. आपल्या नागरिकांना सर्वाधिक सामाजिक सुरक्षितता देणारा हा देश आहे. संकटात असलेल्या कोणत्याही नागरिकाच्या खर्चाची संपूर्ण जबाबदारी तेथील सरकार उचलते. बेरोजगारांना भरभक्‍कम म्हणजे 600 डॉलर (38,000 रुपये) मासिक भत्ता दिला जातो. त्यामुळे तिथे लोकसंख्या कमी असूनही बेरोजगारांची संख्या प्रचंड आहे. अर्थात, नोकरदारांचे उत्पन्‍नही या देशात प्रचंड आहे. म्हणूनच जगातील सर्वात आनंदी लोकांचा देश म्हणून फिनलँडचा लौकिक आहे.

एक असा समाज, जिथे कुणाला आर्थिक विवंचनाच नाहीत, तिथे गुन्हे तरी कसे घडतील? खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण फिनलँडमध्ये लोकसंख्येच्या अवघे 1.28 टक्के आहे. लोकसंख्या तरी किती कमी! अवघ्या 55 लाख लोकसंख्येचा हा देश. एका चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात केवळ 18 नागरिकांचे वास्तव्य, इतकी विरळ लोकवस्ती! 2015 च्या आकडेवारीनुसार, वर्षभरात या देशात खुनाच्या अवघ्या 50 घटना घडल्या. संघटित गुन्हेगारी तर या देशात जवळजवळ नाहीच! तरीही या देशातील पोलिस खाते जगातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वाधिक सक्षम पोलिस खाते मानले जाते. इंटरनेट सुरक्षिततेच्या बाबतीतही फिनलँडचा जगात दुसरा नंबर आहे. येथील राजकीय व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्थेची स्थिती यावरील लोकांचा भरवसा जगात सर्वाधिक आहे. अर्थात, तरीसुद्धा या देशातील ट्रॅफिक पोलिसांची एक लडिवाळ तक्रार आहे आणि त्याला या देशातील एक आगळावेगळा नियम कारणीभूत आहे. वाहतुकीचा नियम मोडणार्‍या व्यक्‍तीला त्याच्या पगाराच्या प्रमाणात दंड केला जातो आणि अशावेळी अनेकजण आपले उत्पन्‍न कमी सांगतात, ही पोलिसांची तक्रार आहे. एखाद्या कोट्यधीशाने वाहतुकीचा नियम मोडला, तर एक लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. (आपल्याकडे श्रीमंतांसाठी ‘वेगळेच’ नियम आहेत ना?) युरोपीय महासंघाचे आणि स्वित्झर्लंडचे ड्रायव्हिंग लायसेन्स फिनलँडमध्ये वैध आहे. फिनलँडला जायचे असेल, तर तेथील वाहतुकीचा आणखी एक नियम नीट लक्षात ठेवा. तिथे दिवस-रात्र हेडलाईट ऑन ठेवूनच गाडी चालवावी लागते. त्याचेही एक कारण आहे. 

दिवस आणि रात्रीचे गणित मांडून आपण नियोजन करतो; मात्र तरीही आपल्याकडे ‘नाईट लाईफ’ची चर्चा सुरू असते. फिनलँडमध्ये दिवस-रात्रीचे गणितच वेगळे. तिथे काही ठिकाणी रात्री बारा वाजताही सूर्य दिसतो. काही ठिकाणी 23 तासांचा दिवस असतो, तर काही ठिकाणी सतत 51 दिवस रात्रच सुरू असते; पण घड्याळानुसार अचूक कामकाज सुरू असते. तिथले रस्ते खूपच चांगल्या दर्जाचे आहेत आणि वाहतूक अतिशय तुरळक असल्यामुळे ते बर्‍याच वेळा मोकळेच दिसतात. कोणत्याही रस्त्यावर टोल घेतला जात नाही. स्वच्छता आणि पर्यावरणाविषयी लोकांना असलेली आपुलकी वाखाणण्याजोगी आहे. फिनलँडमध्ये प्लास्टिकच्या दहापैकी नऊ बाटल्यांचे पुनश्‍चक्रीकरण (रिसायकलिंग) केले जाते. बेरोजगारांना भत्ते मिळतात म्हणून कामधंदा मुद्दाम टाळणारे तरुण फिनलँडमध्ये असतील; पण तिथल्या शिक्षणाचा दर्जा जगात सर्वोत्तम मानला जातो. आपल्याकडे तिसरे वर्ष पूर्ण झाले की, मुलाला ‘प्ले-ग्रुप’मध्ये ढकलले जाते. फिनलँडमध्ये वयाच्या सातव्या वर्षापर्यंत बालपण यथेच्छ उपभोगू दिले जाते आणि मगच मुलाला शाळेत घातले जाते. पदवी घेऊन बाहेर पडताना विद्यार्थ्याला टोपी आणि तलवार देण्याची प्रथा आहे. 

फिनलँड हा युरोपातील क्षेत्रफळाच्या द‍ृष्टीने आठवा मोठा देश आहे. 1995 मध्ये तो युरोपीय महासंघाचा सदस्य देश बनला. उत्तर युरोपातील हा महासंघाचा एकमेव सदस्य देश असून, युरो हे अधिकृत चलन म्हणून स्वीकारण्यात आले आहे. फिनलँड हा भौगोलिकद‍ृष्ट्या अत्यंत वेगळा देश. मुख्य भूभाग आणि आसपास तब्बल 1 लाख 79 हजार 584 बेटे असून, हा एक जागतिक विक्रम आहे. दुसरा विक्रम सरोवरांचा आहे. वस्तुतः, सरोवरांचा देश म्हणूनच फिनलँड ओळखला जातो. देशभरात तब्बल 1 लाख 87 हजार 888 लहान-मोठी सरोवरे असून, सर्वात मोठे साईमा सरोवर हे युरोपातील चौथे सर्वात मोठे सरोवर आहे. देशाचा 87 टक्के भाग जंगलांनी व्यापलेला असून, देवदार हा फिनलँडमधील मुख्य वृक्ष आहे. या वृक्षाच्या मुळांची जमिनीखालील एकत्रित लांबी तब्बल 30 मैल इतकी असते. नॉर्दर्न लाईटस् (ऑरोरा बोरिअलिस) म्हणजे उत्तरेकडील प्रकाश हे फिनलँडमध्ये येणार्‍या पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. प्रत्येक ऋतूत हा प्रकाश दिसतो आणि तो पाहण्यासाठी बनविलेल्या काचेच्या ‘इग्लू’मध्ये रात्र व्यतीत करणे हा सुखद अनुभव असतो. हिमनद्यांचा प्रतिक्षेप हे अन्य एक भौगोलिक वैशिष्ट्य असून, त्यामुळे फिनलँडची उंची दरवर्षी 0.04 इंचांनी वाढते. जमिनीच्या या विस्तारामुळे फिनलँड समुद्रसपाटीपासून सात चौरस किलोमीटर अधिक उंचीवर पोहोचला आहे. जगातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात लांब बोगदा म्हणजेच पैजानी वॉटर टनेल फिनलँडमध्येच असून, त्याची लांबी 120 किलोमीटर आहे. शतकानुशतके राजेशाही असलेल्या या देशावर नंतर रशियाने कब्जा केला होता. स्वीडिश संस्कृती मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे फिनलँड हा नंतर स्वीडनचा भाग झाला.

मध्ययुगापासून 1809 पर्यंत तो स्वीडनचा भाग राहिला आणि नंतर स्वतंत्र झाला. तिथे एक गोल्फ क्लब असा पाहायला मिळतो, ज्याचा निम्मा भाग फिनलँडमध्ये आहे, तर निम्मा स्वीडनमध्ये. 
फिनलँडमध्ये अनेक गमतीशीर गोष्टी पाहायला मिळतात. गुन्हेगारी कमी असली, तरी गुन्हा केल्यास तुरुंगात जाणे हाही सुखद अनुभव असावा. कारण, जगात सर्वात सुंदर तुरुंग फिनलँडमध्ये असून, काही तुरुंग तर भारतातल्या हॉटेल्सपेक्षाही उत्तम आहेत म्हणे! तरीही फिनलँडला युरोपातील ‘प्रिझन ब्रेक कॅपिटल’ म्हणून ओळखले जाते. 2013 च्या आकडेवारीनुसार 10 हजार कैद्यांपैकी 1,084 जण तेथील तुरुंगांमधून पळून गेल्याची नोंद आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे, तिथे खुले तुरुंग अधिक असून, तेथील कैदी इतर नागरिकांसोबत स्वच्छंदीपणे फिरू शकतात, काम करू शकतात आणि शॉपिंगसुद्धा! तेथील लोकांचे खेळही विचित्रच. तसे पाहायला गेल्यास क्रीडापटूंचा हा देश. 1908 पासून आजतागायत ऑलिम्पिकमधून ते कधी रिकाम्या हाताने परतले नाहीत. आतापर्यंत असंख्य पदके त्यांनी पटकावली असून, ऑलिम्पिकच्या इतिहासातील सर्वात यशस्वी देश म्हणून फिनलँडची ओळख आहे. गॅम्बलिंग म्हणजे जुगार हा तेथे ‘अधिकृत खेळ’ मानला जातो आणि त्यातून सरकारला मिळणारे उत्पन्‍न गरिबांसाठीच्या योजनांमध्ये खर्च केले जाते. याखेरीज डास पकडणे (मॉक्स्विटो हंटिंग), चिखलातला फुटबॉल (स्वॅम्प फुटबॉल), रबराचे बूट फेकणे, मोबाईल फेकणे आणि एअर गिटार चॅम्पियनशिप हे अतिशय विचित्र खेळ तिथे खेळले जातात. एका खेळात तर पतीने आपल्या पत्नीला उचलून धावायचे असते. जिंकणार्‍या पुरुषाला त्याच्या पत्नीच्या वजनाइतकी बीअर बक्षीस म्हणून दिली जाते. आता बोला!

जगातील प्रसिद्ध नोकिया कंपनी फिनलँडमध्येच सुरू झाली. जगाला अँग्री बर्डस् हा खेळ फिनलँडनेच दिला. प्रजनन दर वाढवण्यासाठी जोडप्यांना प्रतिमूल 10 हजार डॉलरचे इनाम देणार्‍या आणि गर्भवती महिलांना कपडे, चादरी, नॅपकिन आणि गाद्या भेट देणार्‍या या देशात प्रामाणिकपणाला मोठे महत्त्व आहे. टी.व्ही. वापरण्यासाठी तिथे कर भरावा लागतो आणि लोक प्रामाणिकपणे तो भरतात. रिडर्स डायजेस्टने केलेल्या सर्वेक्षणात पैशांनी भरलेल्या 12 बॅगा सार्वजनिक ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या आणि त्यातील 11 बॅगा नागरिकांनी परत केल्या. आणखी एक गमतीशीर गोष्ट म्हणजे, जगप्रसिद्ध डोनाल्ड डक या कार्टूनने पँट घातली नाही म्हणून त्यावर फिनलँडमध्ये बंदी आणण्यात आली होती. सर्वात कमी भ्रष्टाचार असणारा आणि एकही माणूस बेघर नसणारा हा देश असून, तिथला समाज प्रगत विचारांचा आहे. मुक्‍त आणि स्वतंत्र वातावरण, जीवनाबद्दल संतुष्ट असलेले लोक, प्रशिक्षण आणि संशोधनावर सर्वाधिक खर्च, शुद्ध हवा आणि पाणी, व्यवसायपूरक वातावरण अशी वैशिष्ट्ये असलेल्या फिनलँडला एकदा भेट द्यायलाच हवी.