Sun, Sep 20, 2020 03:38होमपेज › Bahar › कोरोना वेगाने का फैलावतोय?

कोरोना वेगाने का फैलावतोय?

Last Updated: Sep 12 2020 8:59PM
डॉ. अनंत फडके

कोरोना वेगाने वाढत जाण्याचे प्रमुख कारण म्हणजे सरकारने राबवायची पंचसूत्री केरळ सरकार वगळता कोणीच वेळेवर, नीट राबवली नाही. खासगीकरणामुळे दुबळी झालेली सार्वजनिक आरोग्यसेवा व नफेखोर खासगी क्षेत्र यामुळे सध्याची परिस्थिती ओढवली आहे.

भारतात व महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या आता फक्त मोठ्या शहरांतच नव्हे तर छोट्या शहरांमध्येही खूपच वेगाने वाढते आहे. पैकी फक्त 5 टक्के रुग्ण गंभीर होत असले तरी त्यांच्यासाठीच्या खाटा फारच कमी पडत असल्याने रुग्णसंख्या खूप वाढलेल्या ठिकाणी हाहाकार उडाला आहे किंवा त्याकडे वाटचाल चालू आहे. याला तेथील सरकारे जबाबदार आहेत, मग पक्ष कोणताही असो. दिल्ली सरकारने उशिरा का होईना, काही चांगले प्रयत्न केले. पण तोपर्यंत रुग्णांची फार ससेहोलपट झाली! इतर राज्यांमध्ये राजकीय नेतृत्वाने ज्या ठिकाणी खास लक्ष देऊन पुरेसे आरोग्य कर्मचारी व इतर साधनसामग्री योग्य पद्धतीने वापरली, त्या भागात साथीचा वेग कमी झाला (उदा. महाराष्ट्रात बारामती, वरळी, धारावी). पण त्याचे सार्वत्रिकीकरण झाले नाही. तसेच या यशस्वी ठरलेल्या ठिकाणीसुद्धा सातत्याने पुरेशी, नीट काळजी घेत राहिले नाही तर तिथे कोरोनाच्या केसेस एकदम वेगाने वाढतील. 

आता काहीही केले तरी कोरोना लागणीचे प्रमाण निरनिराळ्या ठिकाणी येते काही महिने वेगाने वाढतच जाणार आहे. ही वाढ टाळता येणार नाही. पण त्याचा वेग मात्र कमी करायला हवा; म्हणजे हाहाकार उडणार नाही. खरे तर कोरोना लागणीचे प्रमाण मर्यादित ठेवले तर सर्व गंभीर रुग्णांवर उपचार करता येतील. दुसर्‍या बाजूला आपली कोव्हिडविरोधी हर्ड इम्युनिटी (समूह प्रतिकारशक्ती) कडे प्रगती होईल. कोव्हिडविरोधी समूह प्रतिकारशक्ती म्हणजे समाजातील सुमारे 50 ते 60 टक्के लोकांना लागण होऊन त्यामुळे त्यांच्यात प्रतिकारशक्ती आली की, उरलेल्या लोकांना केवळ त्या समूहाचा भाग असल्याने कोव्हिड लागणीपासून संरक्षण मिळेल. गोवर, कांजिण्यापासून स्वाईन फ्लूपर्यंतच्या साथी ओसरण्यामागे समूह प्रतिकारशक्ती हेच कारण होते. निरनिराळ्या तज्ज्ञांनी सांगितले आहे की, भारतातील एकूण सुमारे 60-65 कोटी लोकांना कोव्हिड लागण झाल्यावर हर्ड इम्युनिटी येऊन ही साथ कायमची ओसरू लागेल. नाही तर केरळप्रमाणे परत अटळपणे साथ डोके वर काढेल. लस आली तरी ती जानेवारीनंतर येईल. तोपर्यंत अनेक ठिकाणी साथ ओसरायला सुरुवात झाली असेल. 

कोरोना वेगाने वाढत जाण्याचे प्रमुख कारण म्हणजे सरकारने राबवायची पंचसूत्री केरळ सरकार वगळता कोणीच वेळेवर व नीट राबवली नाही. ही पंचसूत्री म्हणजे संशयित रुग्णांचा व त्यांच्या घनिष्ट संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपासण्या, काही दिवस या रुग्णांचे विलगीकरण, त्यांच्यावर गरजेनुसार कमी-जास्त उपचार, त्यांच्या घनिष्ट संपर्कात आलेल्यांचे अलगीकरण, त्यांचा पाठपुरावा होय. केरळ सरकारने दर रुग्णामागे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्कातील सरासरी शंभर व्यक्तींना गाठून त्यांची चौकशी, तपासणी, पाठपुरावा केला. ज्या लोकांना सार्वजनिक संस्थांमध्ये तात्पुरते हलवले, तिथे स्वच्छता, खाणे-पिणे याची नीट व्यवस्था केली. हे सर्व करताना पंचायत व्यवस्थेमार्फत नागरिकांचा, स्वयंसेवकांचा मोठा सहभाग घेतला. नागरिकांनीही काळजी कटाक्षाने घेतली. घराबाहेर जाताना मास्क लावणे, सहा फुटांचे अंतर ठेवणे, वारंवार, विशेषत: बाहेरून आल्यावर साबणाने हात धुणे, शिक्षण संस्था, नाटक-सिनेमे, सण-समारंभ, गप्पा इ. सर्व बंद ठेवणे. विशेषत: ज्येष्ठ नागरिक, तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, लठ्ठपणा, श्वसनविकार इ.पैकी आजार असलेल्यांना त्यांनी जपले. कारण अशी खास जोखीम असलेल्यांमध्ये कोव्हिडमुळे जीवाला धोका होण्याची शक्यता जास्त असते.  इतर राज्यांमध्ये हे सर्व वेळेवर, पुरेसे, नीट झाले नाही. त्यामुळे भारतभर साथ वेगाने वाढतच गेली. 1980 पासूनच्या खासगीकरणाच्या धोरणाने कुपोषित, खिळखिळी झालेली सार्वजनिक आरोग्यसेवा वरील पंचसूत्री वेळेवर, पुरेशी राबवू शकली नाही. महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य सेवेत तर 17,000 रिक्त पदे आहेत! ती भरली जातील असे राजेश टोपे यांनी मंत्री होताच जाहीर केले; पण तसे केले नाही.  

कोव्हिड केसेस वाढतच जाणार हे विज्ञान सांगत होते. तरी हाहाकार उडाला. कारण खासगीकरणामुळे सरकारी हॉस्पिटल्सची पुरेशी वाढ झालेली नाही, कोव्हिड रुग्ण संख्या वाढल्यावर कोव्हिड खाटांचा आत्यंतिक तुटवडा निर्माण झाला. महाराष्ट्रात परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म. फुले योजनेत सामील असलेल्या खासगी हॉस्पिटल्समधील कोव्हिड खाटांपैकी 80 टक्के खाटा सरकारी नियंत्रणाखाली आणल्या आणि ही योजना सर्व रेशन कार्डधारकांना कोव्हिड उपचारासाठी खुली केली. पण या योजनेच्या अंगभूत मर्यादा आणि अनेक खासगी हॉस्पिटल्सनी काढलेल्या पळवाटा, केलेली नफेखोरी यामुळे फारच थोड्या कोव्हिड रुग्णांना या योजनेअंतर्गत कोव्हिड उपचार मोफत मिळतात. कॉर्पोरेट हॉस्पिटल्स तर लोकांना जास्तीत जास्त लुटायचा प्रयत्न करत आहेत. पुण्या-मुंबईत वैद्यकीय महाविद्यालये आहेत. त्यांच्याशी संलग्न हॉस्पिटल्समध्ये तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित नर्स इत्यादी स्टाफ आहे. पण मध्यम व छोट्या छोट्या शहरांमध्ये हे नसल्याने तिथे येत्या दोन-तीन महिन्यांत रुग्णांची मोठ्या प्रमाणात ससेहोलपट होऊन अनेक अकारण मृत्यू व्हायची चांगलीच शक्यता आहे. त्यामुळे डॉक्टर्सवर हल्ले झाले तर ते कामावर येणार नाहीत व परिस्थिती आणखी बिघडेल. कोव्हिड रुग्णांसाठी नवीन, खास जम्बो हॉस्पिटल उभारली जात असल्याने प्रश्न सुटेल असे सांगण्यात आले. पण पुण्यातील सुरुवातीचा अनुभव निराशाजनक आहे. एकंदरीत पाहता खासगीकरणामुळे दुबळी झालेली सार्वजनिक आरोग्यसेवा व नफेखोर खासगी क्षेत्र यामुळे सध्याची परिस्थिती ओढवली आहे. 

 "