कोरोना विरुद्ध क्रिकेट 

Last Updated: Jul 19 2020 1:50AM
Responsive image


अनिरुद्ध संकपाळ 

कोरोनाचं संकट गडद होत असताना इंग्लंड आणि वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंचा जीव धोक्यात घालून मालिका का खेळवत आहेत? याचं उत्तर आहे टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंगचा बुडणारा महसूल. त्यामुळेच इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बायोसेक्युअर वातावरणात क्रिकेटचा पुनश्च हरिओम केला.

चीनमधून बाहेर पडलेला साधारण 15 मायक्रॉनचा एक काटेरी चेंडू जगभरात थैमान घालतोय. या चेंडूचा आणि क्रिकेटचा दुरान्वयेही संबंध नाही. ज्या देशातून बाहेर पडला, त्या देशालाही क्रिकेटचा फारसा गंध नाही. पण या चेंडूने क्रिकेट जगतावर असा काही प्रभावी मारा केला की, त्याला जवळपास चार ते पाच महिने आपले क्रिज सोडून साधे स्टेप आऊटही होता आले नाही. क्रिकेट जगतालाच काय, कोणालाच या कोरोनाच्या लाईन आणि लेंथचा अंदाज न आला नाही. त्यामुळे त्यांच्याकडे हा कोरोनाच्या चेंडूचा मारा लेफ्ट करून वेळ काढण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नव्हता.

अखेर क्रिकेटने या कोरोनाचा कसा मुकाबला करायचा आणि आपला स्कोअर बोर्ड कसा हलता ठेवायचा याचं उत्तर शोधलंय. ते आहे बायो सेक्युअर वातावरण. कोरोनाचं जगभर थैमान सुरू असताना इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्या धाडसी संघांनी क्रिकेटला पुन्हा मैदानावर आणलं. त्यासाठी त्यांनी साऊथम्पटनला बायो सेक्युअर वातावरण तयार केलं आणि क्रिकेटचा पुनश्च हरिओम झाला. कोरोनाला चकवत इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात 5 दिवसांची पहिली टेस्ट मॅच पार पडली. त्यामुळे आपण आता क्रिकेट कोरोनाला इम्युन होतंय, असं म्हणायला हरकत नाही. पण जरी क्रिकेटने पुन्हा मोकळा श्वास घेतला असला तरी त्यात क्रिकेटचा आत्मा कुठेतरी हरवल्यासारखा वाटला.

संपूर्ण जग गेल्या सहा-सात महिन्यांपासून कोरोनाग्रस्त झालेलं असताना वेस्ट इंडिजने इंग्लंडचा क्रिकेट दौरा करण्याचा निर्णय घेतला. कोरोनासोबतच आपल्याला कसं जगता येईल याची ही चाचपणी होती. पहिली कसोटी कोणतेही कोरोनाविघ्न न येता पार पडल्याने ही चाचपणी यशस्वी ठरली असं म्हणता येईल. पण कोरोनासोबतचं हे सहजीवन क्रिकेटचा आत्मा बंदिवासात ठेवून सुरू झालंय.

क्रिकेटचा आत्मा म्हणजे त्याचे चाहते, त्याचे पाठीराखे. या नव्या सहजीवनात त्या आत्म्यालाच स्थान नाही. क्रिकेट चाहत्यांच्या गराड्यात भिडणारे दोन संघ मैदानात प्रवेश करतात त्यावेळी उठणारा जो सामूहिक आवाज आहे तीच तर क्रिकेटची खरी नैसर्गिक धकधक आहे. पण साऊथम्पटनच्या पहिल्या कसोटीत ही धकधक जाणवलीच नाही. तसंही सध्याच्या कसोटी क्रिकेटमध्ये चाहत्यांचा मैदानावरचा वावर रोडावलाय. पण इंग्लंडमध्ये अजूनही क्रिकेट चाहते कसोटीचा आनंद घेण्यासाठी मैदानावर चांगल्या संख्येने उपस्थिती लावतात. यामुळेच जगभरातले संघ इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक असतात.

कोरोना काळातील या बायो सेक्युअर क्रिकेटमध्ये या चाहत्यांनाच अपरिहार्यतेमुळे स्थान नाही. या बायो सेक्युअर क्रिकेटमध्ये क्रिकेटच्या आत्म्यालाच स्थान नसल्यामुळे मैदानावर चाहत्यांच्या टाळ्यांचा गजर नाही. शतकानंतर, निम्मा संघ गारद केल्यानंतर चाहत्यांचे स्टँडिंग ओवेशन नाही. गोलंदाजाने फलंदाजाला चकवल्यानंतर गोलंदाजापाठोपाठ चाहत्यांमधून निघाणारा तो ‘ओहहहह’चा आवाज नाही. बॅटमधून निघालेला एक उत्तम फटका सीमारेषा गाठण्यापूर्वीच चाहत्यांची दाद मिळवून जातो. हे साऊथम्पटनवर पाहायला, अनुभवायला मिळालं नाही. त्यामुळे बायो सेक्युअर क्रिकेटमध्ये प्रेक्षकांचा फील देण्यासाठी स्टिम्युलेशन म्हणजे आभासी आवाज काढण्याची मशिन लावणे म्हणजे व्हेंटिलेटरच्या मदतीने हृदयाची धकधक सुरू ठेवण्याचा प्रकार आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना हा चाहत्यांसाठी एक करमणुकीचं साधन असलं तरी प्रत्येकासाठीच ते करमणुकीचं साधन नाही. सीमारेषेबाहेर पांढर्‍या कपड्यात बसलेल्या छोट्या खेळाडूंची इतर जगाला फक्त बॉलबॉय म्हणून ओळख असली तरी त्यांच्या दृष्टीने सीमापार गेलेला चेंडू फक्त आत फेकणं इतकंच या सामन्याचं महत्त्व नसतं. त्यांच्या दृष्टीने हे एक क्रिकेटचे लाईव्ह प्रॅक्टिकल असतं. या प्रॅक्टिकलमधूनच हे छोटे खेळाडू क्रिकेटचं ज्ञान ग्रहण करतात आणि आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंकडून प्रेरणा घेतात.

प्रत्येक मोठा क्रिकेटपटू हा कधी ना कधी बॉलबॉय म्हणून काम करतोच. त्याच्यासाठी हे फक्त काम नसते तर हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने त्याच्यासाठी क्रिकेटचे विद्यापीठ असते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन. तोही याच प्रोसेसमधून गेला आणि त्याला याचा फायदा नक्की झाला असणार. अर्जुनसारख्या अनेक युवा खेळाडूंनी बॉलबॉय म्हणून काम केलं. त्यानंतर नेटमध्ये नेट बॉलर म्हणून गोलंदाजी करत आपल्या अनुभवाची शिदोरी समृद्ध केली. बायो सेक्युअर सामन्यात क्रिकेटचं भविष्य असलेल्या या छोट्या क्रिकेटपटूंना स्थानच नाही. त्यामुळे ही लाईव्ह शिकवणी थांबलीय. पर्यायाने क्रिकेटच्या भविष्यानेही पॉज घेतलाय. आता हा पॉज किती काळाचा आहे हे येणारा काळच ठरवणार आहे.

कोरोनाचं संकट डोक्यावर असताना आणि दिवसेंदिवस ते गडद होत असताना इंग्लंड आणि वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंचा जीव धोक्यात घालून मालिका का खेळवत आहेत? असा प्रश्न पडणं साहजिक आहे. याचं उत्तर आहे टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंगचा बुडणारा महसूल वाचवण्यासाठी हा सर्व आटापिटा सुरू आहे. कोरोनाच्या प्रकोपामुळे लॉकडाऊन झाल्याने इंग्लंडचा समर सिझन वाया जाण्याची भीती होती. सामनेच झाले नाहीत तर ते ब्रॉडकास्ट कसे करणार आणि ते ब्रॉडकास्ट झाले नाहीत तर त्यातून महसूल कसा मिळवणार? त्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बायो सेक्युअर वातावरणात क्रिकेटचा पुनश्च हरिओम केला. यामधून वेस्ट इंडिज बोर्डाला काय मिळालं हा वादाचा मुद्दा आहे. बरं, बोर्डाने त्यांच्या महसुलाची सोय केली. पण मैदानावर खाण्याचे पदार्थ, पाण्याच्या बॉटल, बीअरचे ग्लास विकणार्‍या छोट्या उद्योजकांचं काय? या बायो सेक्युअर क्रिकेटमध्ये त्यांच्या ग्राहकांना म्हणजेच प्रेक्षकांना स्थान नाहीच. त्यामुळे या छोट्यांच्या बिझनेसचा पुनश्च हरिओम नाहीच. त्यांचं छोटेखानी अर्थचक्र अजून लॉकडाऊनमध्येच अडकलंय.

बायोसेक्युअर सामन्यात अनेक गोष्टी मिस झाल्यात. खेळाडूंच्या हावभावातही कोरोना इफेक्ट जाणवला. टॉसच्या वेळी समालोचकांना पाहण्याची सवय होती. यावेळी ते दिसले नाहीत. तसंच मैदानावर खेळाडूंच्या वावरण्यातही शारीरिक अंतर दिसले. विकेट पडली की आधी गोलंदाजाला मिठी मारणं, टाळ्या देणं, डोक्यावरचे केस कुरवाळणे असले प्रकार संघ सहकारी करत. इथं मात्र हे प्रेमळ दृश्य दिसलं नाही. या मॅचमध्ये खेळाडू कोपराने एकमेकांना टाळ्या देत होते. हे डोळ्यांना बघायला विचित्र वाटत असलं तरी येत्या काही काळासाठी असं बघण्याची आपल्याला सवय करून घ्यावी लागणार आहे. पण काही खेळाडू याला अपवाद ठरले. इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसनने विकेट काढल्यानंतर कर्णधार बेन स्टोक्सला आलिंगन दिलं. पण कर्णधाराने हे आलिंगन सावरतच स्वीकारलं. काय करणार, माणूस सवयीचा गुलाम असतो. त्यामुळे अँडरसनकडून अनवधानाने हे घडून गेलं. पंचांनीही हे फार गंभीर घेतलं नाही.

अखेर गोलंदाजांनी लाळेवर तोडगा काढलाच 

बायो सेक्युअर क्रिकेटमध्ये काही नियम बदलण्यात आलेत. त्यात प्रामुख्याने चेंडूला लाळ लावण्यास मनाई करण्यात आलीय. या मनाईची क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा झाली. हा निर्णय म्हणजे गोलंदाजांवर घोर अन्याय असल्याचं मत काही माजी खेळाडूंनी व्यक्त केलं. त्यामुळे आता पहिल्या बायो सेक्युअर सामन्यात या गोलंदाजांचं काय होणार? चेंडू शाईनच करता आला नाही तर तो स्विंग कसा होणार आणि तो स्विंग झाला नाही तर विकेट कशा मिळणार? असे प्रश्न गोलंदाजांना भेडसावत होते. पण यावर इंग्लंडच्या गोलंदाजांनी अखेर तोडगा काढलाच. त्यांनी लाळेऐवजी पाठीचा घाम वापरून चेंडू शाईन केला. त्यामुळे गोलंदाजांचा त्यांच्या स्विंगचा दरारा कायम राहिला.

अशी ही इतिहासातली पहिली बायो सेक्युअर कसोटी सध्या तरी कोरोनाविरहित पार पडली. या कसोटीने अनेक छोट्या मोठ्या गोष्टी बदलल्या. क्रिकेटचा हा पुनश्च हरिओम पहिल्या कसोटीत यशस्वी झालाय. आता इतर देशांनाही असा प्रयोग करायला हरकत नाही. या सामन्याने क्रिकेट पुन्हा मैदानावर आणण्यासाठीची दारं उघडली आहेत. या कसोटीने इतर देशांना तसंच खेळांना पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्यासाठीचं उदाहरण घालून दिलंय. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातले अजून दोन कसोटी सामने राहिलेत. या दोन्ही सामन्यांकडे सर्व क्रिकेट जगताचं लक्ष आहे.