Mon, Jan 25, 2021 07:16होमपेज › Bahar › बाबुराव पेंटर यांच्या ‘सैरंध्री’ची शताब्दी

बाबुराव पेंटर यांच्या ‘सैरंध्री’ची शताब्दी

Last Updated: Feb 09 2020 1:24AM
जयसिंग पाटील

भारतीय चित्रपटाच्या इतिहासात 11 फेब्रुवारी 1920 हा दिवस एका घटनेमुळे महत्त्वाचा ठरतो. पुण्यातल्या आर्यन सिनेमागृहात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या हस्ते या दिवशी कलामहर्षी बाबुराव पेंटर यांचा गौरव करण्यात आला. याच समारंभात टिळकांनी बाबुरावांना ‘सिनेमा केसरी’ असे संबोधले. संपूर्ण भारतीय बनावटीच्या ‘सैरंध्री’ या चित्रपटाच्या निर्मितीबद्दलचा हा गौरव होता. या मूकपटाची संपूर्ण निर्मिती कोल्हापूरच्या भूमीत झाली. 

दादासाहेब फाळके यांचा ‘राजा हरिश्‍चंद्र’ हा पहिला भारतीय चित्रपट. तो 21 एप्रिल 1913 या दिवशी मुंबईच्या ‘ऑलेंपिया थिएटर’मध्ये प्रदर्शित झाला. फाळके यांच्याअगोदरही चित्रपटनिर्मितीचे प्रयत्न झाले होते. त्यातील दोन प्रयत्न महत्त्वाचे मानले जातात. मुंबईत  ल्यूमिए बंधूंचे मूकपट पाहून सावेदादा तथा हरिश्‍चंद्र भाटवडेकर यांनी हॅगिंग गार्डनमधील पुंडलिकदादा व कृष्णा न्हावी यांच्या कुस्तीचे चित्रीकरण केले. त्यासाठी लंडनहून कॅमेरा मागविला. फिल्मवर प्रक्रियासुद्धा परदेशातच केली. 1899 च्या दरम्यान ही फिल्म दाखविली गेली. त्यानंतर दादासाहेब तोरणे यांनी ‘भक्‍त पुंडलिक’ या नाटकाचे चित्रीकरण केले होते. त्यासाठी कॅमेरा, फिल्मवरची प्रक्रिया परदेशातूनच करून घेतली. दादासाहेब फाळके यांनी लंडनला जाऊन चित्रपटनिर्मितीचा अभ्यास केला. कॅमेरा आणि फिल्म आयात केली. चित्रपटासाठी स्टुडिओची रचना स्वतः केली होती. त्यामुळे ‘राजा हरिश्‍चंद्र’ हा पहिला भारतीय चित्रपट ठरतो. फाळके जे. जे. स्कूलमध्ये शिकले होते. काही वर्षे त्यांनी फोटोग्राफी, छपाईचा व्यवसाय केला होता. त्यातुलनेत बाबुराव पेंटर यांचा चित्रपटाचा प्रवास विलक्षण आणि वेगळा ठरतो. 

बाबुराव हे सामान्य सुतार कुटुंबात जन्माला आले होते. त्यांना अर्ध्यातूनच शालेय शिक्षण सोडून द्यावे लागले. ते उत्तम चित्रकार होते. फोटोग्राफीची कला त्यांना अवगत होती; पण फाळके यांच्याप्रमाणे चित्रकला किंवा चित्रपटकला यांचे कोणतेही रीतसर प्रशिक्षण त्यांनी घेतलेले नव्हते. तरीही त्यांनी स्वतः कॅमेरा तयार केला. चित्रीकरणाचे, संकलनाचे तंत्र अवगत केले. त्यामुळेच त्यांचा ‘सैरंध्री’ हा संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला चित्रपट ठरतो. 11 फेब्रुवारी 1920 या दिवशी पुण्यातल्या आर्यन सिनेमागृहात लोकमान्य टिळकांनी बाबुराव पेंटर यांचा सत्कार केला. त्यापूर्वीच चित्रपटासंबंधी ‘केसरी’मध्ये ‘सैरंध्री’बाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यामध्ये ‘सैरंध्री’मधील कलाकारांच्या वेशभूषा, कलावंत आणि निर्मितीचा श्रेष्ठ दर्जा याचे कौतुक केले होते. ‘सैरंध्री’ हा चित्रपट युरोप, अमेरिकन चित्रपटांच्या तोडीचा असल्याचे ‘केसरी’ने म्हटले होते. ‘सैरंध्री’ नंतर मुंबईत मॅजेस्टिक सिनेमागृहात प्रदर्शित झाला. पुणेकरांप्रमाणेच मुंबईकरांनीही हा चित्रपट डोक्यावर घेतला. चित्रपटातला किचकवधाचा प्रसंग वादग्रस्त ठरला. भीम किचकाचे मुंडके पिरगळून धडावेगळे करतो. रक्‍ताच्या चिळकांड्या उडतात, असा हा प्रसंग पाहून प्रेक्षक मोठ्याने किंचाळत. घाबरून पळू लागत. इतक्या प्रभावीपणाने हा प्रसंग चित्रित केला गेला होता. मुंबईच्या गव्हर्नरने चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी माणूस मारला अशा समजातून बाबुराव पेंटर यांना नोटीस बजावली होती. किचकाची भूमिका झुंजारराव पवार यांनी केली होती. ते जिवंत असल्याचे पुराव्याने दाखवावे लागले होते. या घटनेनंतर चित्रपटासाठी सेन्सॉर बोर्ड लागू करण्यात आले. 

फाळके यांच्या ‘राजा हरिश्‍चंद्र’ चित्रपटामध्ये तारामतीची भूमिका कृष्णा नावाच्या मुलाने केली होती. प्रयत्न करूनही फाळके यांना स्त्री कलाकार मिळाली नाही. मात्र, आपल्या चित्रपटात स्त्री भूमिका स्त्री कलावंतांनीच केली पाहिजे, असा आग्रह बाबुराव यांचा होता. गुलाबबाई, अनुसया या कलावंत कुटुंबातील महिलांना त्यांनी अभिनेत्री म्हणून तयार केले. मूकपटात सरदार बाळासाहेब यादव यांनी भीमाची व झुजांरराव पवार यांनी किचकाची भूमिका केली.  बाळासाहेब यादव हे बावडेकर आखाड्यातले मल्ल होते. ते वकील होते; पण कायद्याचे पदवीधर नव्हते. आपल्या अधिकारात शाहू महाराजांनी त्यांना वकिलीची सनद दिली होती. बलदंड देहयष्टीचे बाळासाहेब अखंड सुपारी तोंडात टाकून दातांनी काडकाड फोडत. कासांडीने दूध पीत. त्यांच्याबद्दल अनेक आख्यायिका त्या काळात प्रचलित होत्या. किचकाची भूमिका करणारे झुंजारराव पवार हे त्यावेळी दत्तोबा पवार म्हणून ओळखले जात होते. शनिवार पेठेत त्यांचे घर होते. केशवराव भोसले यांच्याबरोबर नाटकातून काम करणारे रावजी म्हसकर व नानासाहेब सरपोतदार यांचा अपवाद वगळता बहुतेक कलाकारांना  अभिनयाचे कसलेच ज्ञान नव्हते. बाबुराव पेंढारकर, केशवराव धायबर, किशाबापू बकरे  हे त्यातील काही इतर कलावंत.

‘सैरंध्री’ हा चित्रपट 1920 मध्ये प्रदर्शित झाला असला, तरी सिनेमा समजून घेण्याचा बाबुरावांचा प्रवास किमान दशकभर तरी सुरू असावा, असे अभ्यासातून लक्षात येते. मुळात चित्रपटाचे स्वप्न बाबुरावांच्या मनात रुजले ते त्यांचे मावस बंधू आनंदराव पेंटर यांच्यामुळे. आनंदराव हे अवलिया कलावंत होते. आनंदराव आणि बाबुराव यांची घरे जवळजवळ होती. त्यामुळे ते लहानपणापासून एकत्रच वाढले. त्यांच्यात अत्यंत जीवाभावाचे नाते होते. श्रीपतराव काकडे हे त्यांचे आणखी एक मित्र. त्यांचे टेलरिंगचे दुकान होते. या दुकानाच्या माडीवर बाबुराव आणि आनंदराव चित्रे काढत. केशवराव भोसले हे त्यावेळी नट म्हणून महाराष्ट्र गाजवत होते. अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी स्वतःची ललित कलादर्श मंडळी ही संस्था स्थापन केली होती. त्यांच्या नाटकाचे पडदे रंगविण्याच्या निमित्ताने आनंदराव व बाबुराव मुंबईला गेले. याच दरम्यान त्यांनी काही इंग्रजी मूकपट पाहिले. सिनेमा काढण्याच्या कल्पनेचे बीज तिथेच त्यांच्या मनात रुजले. केशवरावांच्या ओळखीमुळे वाशीकर यांच्याशी भागीदारीत त्यांनी डेक्‍कन सिनेमा सुरू केला. शिवाजी थिएटरचे सिनेमागृहात रूपांतर केले. केशवरावांच्या संस्थेतच विष्णुपंत दामले आनंदरावांच्या संपर्कात आले. डेक्‍कन सिनेमागृहाचे काम सुरू असतानाच, दामले, फत्तेलाल मदतीला म्हणून सहवासात आले. मतभेदामुळे पेंटर बंधूंनी भागीदारी सोडली. नंतर त्यांना केशवराव यांच्यामुळे ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ या नाटकाचे पडदे रंगविण्याचे काम मिळाले. त्यासाठी ते मुंबईला गेले. त्याचदरम्यान त्यांनी फाळके यांचा ‘राजा हरिश्‍चंद्र’ चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहिल्यावर आनंदरावांच्या मनात पुन्हा सिनेमाचा विचार सुरू झाला. नाटकाचे पडदे रंगविण्याच्या कामामुळे दोघांचे मोठे नाव झाले. मिस्त्री हे त्यांचे मूळचे नाव मागे पडून ते पेंटर म्हणूनच ओळखले जाऊ लागले. 

श्रीपतराव काकडे यांच्या मध्यस्थीने रूईकर सावकार यांच्याशी भागीदारीत पेंटर बंधूंनी महाराष्ट्र सिनेमा सुरू केला. (शनिवार पेठेतील या जागेत सध्या पोस्ट ऑफिस आहे.) चित्रपट लोकप्रिय करण्यासाठी ते अनेक क्‍लृप्त्यांचा वापर करीत. चित्रपटाचे भव्य पोस्टर्स तयार करत. अनेक परदेशी मूकपट महाराष्ट्र सिनेमामध्ये दाखविले जात. फाळके यांचे सुरुवातीचे चित्रपटही महाराष्ट्र सिनेमामध्ये प्रदर्शित झाले. दामले, फत्तेलाल, लिमये असे काही तरुण त्यांच्या मदतीला होते. महाराष्ट्र सिनेमाचा शुभारंभ राजर्षी शाहू महाराज यांच्या हस्ते झाला. सिनेमाची सजावट पाहून ते आश्‍चर्यचकित झाले. सिनेमा लोक अंधारात पाहणार, मग त्यासाठी थिएटरमध्ये इतकी सजावट कशाला, असा गमतीचा प्रश्‍न त्यांनी पेंटरांना विचारला होता. शाहू महाराजांच्या मिश्कील स्वभावावर आणि पेंटर बंधूंच्या उत्साहावर प्रकाश टाकणारा हा प्रसंग आहे.

लोकांना सिनेमा दाखवत असतानाच सिनेमा समजून घेण्याचा प्रयत्न पेंटर बंधू करत होते. प्रोेजेक्टरमधून सिनेमा कसा पडद्यावर दिसतो, हे त्यांना कळले होते. मधल्या काळात दादासाहेब फाळके नाशिकला स्थलांतरित झाले होते. पेंटर बंधू त्यांना भेटले. मात्र, कॅमेरा पाहणे, सिनेमा समजून घेण्याच्या त्यांच्या इच्छेला फाळकेंकडून प्रतिसाद मिळाला नाही. परत आल्यानंतर त्यांनी कॅमेरा मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. आनंदराव त्यात जास्त उत्साही होते. त्यांनी मुंबईहून एक जुना नादुरुस्त कॅमेरा मिळवला. तो दुरुस्त करून चित्रीकरणाचे प्रयत्न त्यांनी केले. ते पहिल्या महायुद्धाचेे दिवस होते. परदेशातून कच्ची फिल्म, कॅमेरा मागविणे हे प्रचंड कटकटीचे व वेळखाऊ होते. यातूनच आनंदराव स्वतः कॅमेरा तयार करण्याच्या खटपटीला लागले. त्यासाठीचे काही सुटे भाग त्यांनी तयार करून घेतले. दरम्यानच्या काळातच महायुद्धामुळे युवराज राजाराम व शिवाजी हे शिक्षण सोडून लंडनहून भारतात परतले. त्यांच्या स्वागताची कमान उभारण्याचे काम पेंटर बंधूंकडे होते. कमान उभारण्याचे काम सुरू असताना अचानक आलेल्या पावसात भिजल्याने आनंदराव आजारी पडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 

आनंदरावांचा मृत्यू हा बाबुरावांसाठी मोठा धक्‍का होता. असे म्हटले जाते की, मृत्युसमयी आनंदरावांना सिनेमा काढण्याचे वचन बाबुरावांनी दिले होते. बाबुराव त्या प्रयत्नाला लागले. कॅमेरा तयार करणे हा एक भाग झाला. परंतु, भांडवल उभारणीपासून चित्रीकरणापर्यंतची अनेक आव्हाने त्यांना पेलायची होती. महाराष्ट्र सिनेमाच्या भागीदारीतून ते बाहेर पडले होते. या काळात  ओळखीच्या लोकांच्या माध्यमातून तानीबाई कागलकर या कलावंत महिलेने दहा हजार रुपयांची मदत दिली. 1 डिसेंबर 1917 रोजी पॅलेस थिएटरमध्ये (सध्याचे केशवराव भोसले नाट्यगृह) आनंदरावांच्या फोटोचे पूजन करून महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना झाली. नंतर डेक्‍कन सिनेमा सुरू केला होता त्याच शिवाजी थिएटरमध्ये चित्रपटनिर्मितीचे काम सुरू झाले. सुरुवातीला ‘सीता स्वयंवर’ हे कथानक चित्रपटासाठी निवडण्यात आले. नंतर ते रद्द करून ‘सैरंध्री’ हे महाभारतातील किचकवधाचे कथानक चित्रपटासाठी निश्‍चित केले. त्यासाठी बाबुरावांनी चित्रपटातील अनेक प्रसंगांची चित्रे काढली होती. (स्टोरीबोर्ड) दोन प्रसंगांच्या मध्ये संवाद लेखनाच्या कामात नानासाहेब सरपोतदार यांचे त्यांना सहाय्य झाले. नाटकाच्या तालमीप्रमाणे चित्रपटाच्या तालमी घेतल्या. रावजी म्हसकर आणि नानासाहेब सरपोतदार या दोघांना नाटकातून कामे करण्याचा अनुभव होता. त्यांचा उपयोग बाबुरावांना झाला. 

सिनेमाचे चित्रीकरण दिवसा चाले. स्टुडिओचे वरचे छत काढून नैसर्गिक सूर्यप्रकाशाचा उपयोग करण्यात आला. रात्री फिल्म धुण्याचे काम चाले. त्यासाठीचे ड्रम इत्यादी साधने बाबुरावांनी आपल्या कल्पकतेने तयार केली होती. तंत्रज्ञानाच्या बाबतीत दामले, फत्तेलाल यासारखे तरुण मदतीला होते. व्यवस्थापक म्हणून बाबा गजबर, परशुरामबापू सुतार, वेशभूषेसाठी श्रीपतराव काकडे अशा असंख्य लोकांचे सहाय्य बाबुरावांना झाले. चित्रपटाची तयारी सुरू असतानाच केशवराव भोसले येऊन गेले. बाबुरावांनी उभारलेले सेटस्, चित्रीकरणाची तयारी पाहून ते भारावून गेले. आनंदरावांचे स्वप्न तू साकार केलेस, असे उद‍्गार त्यांनी काढले. ‘सैरंध्री’ सिनेमाची निर्मिती हा एक वेगळा प्रयोग होता. बाबुराव स्वतः शिकत होते. शिकता शिकताच इतरांना शिकवत होते.  

महाराष्ट्र फिल्म कंपनीने इतिहास घडविला. त्यांचा ‘सैरंध्री’ हा पहिला टप्पा होता. 1920 ते 1930 हा महाराष्ट्र फिल्म कंपनीचा वैभवाचा काळ होता. 1932 मध्ये ही फिल्म कंपनी बंद पडली. ‘वत्सलाहरण’च्या दरम्यान बाबुराव पेंढारकर यांच्यामुळे शांताराम वणकुद्रे हा तरुण पोरगा महाराष्ट्र फिल्म कंपनीत आला. तो बाबुरावांचा उजवा हात बनला. बाबुरावांनी नंतरचे चित्रपट बेल अँड हॉवेल कॅमेर्‍याने चित्रित केले. त्यासाठी बारा हजार रुपये शंकरराव नेसरीकर यांनी दिले. ते महाराष्ट्र फिल्मचे तिसरे भागीदार झाले. कंपनीतल्या अंतर्गत वादातून व्ही. शांताराम, दामले, फत्तेलाल बाहेर पडले. 1 जून 1929 रोजी त्यांनी प्रभात फिल्म कंपनीची स्थापना केली. 1930 मध्ये बाबुराव महाराष्ट्र फिल्म कंपनीतून बाहेर पडले. त्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये तानीबाई कागलकर यांचे निधन झाले. कंपनीचे मागे राहिलेले एकमेव भागीदार शंकराराव नेसरीकर यांनी 1932 मध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनी बंद केली. कंपनीतल्या 20 मूकपटांचे दिग्दर्शन बाबुरावांनी केले. त्यातील ‘सिंहगड’, ‘सावकारी पाश’ मैलाचे दगड मानले जातात. ‘सिंहगड’ हा देशातला पहिला ऐतिहासिक चित्रपट. या चित्रपटापासून करमणूक कर सुरू झाला. तर ‘सावकारी पाश’ हा देशातला पहिला सामाजिक चित्रपट ठरतो. ‘सिंहगड’च्या चित्रीकरणादरम्यान लागलेल्या आगीत ‘सैरंध्री’ चित्रपट भस्मसात झाला. 1924 मधला ‘कल्याण खजिना’ हा बाबुरावांचा आणखी एक महत्त्वाचा मूकपट. इंडियन डग्लस मा. विठ्ठल आणि झुबेदा यांचा हा पहिला चित्रपट. देशातला पहिला बोलपट ‘आलमआरा’ चित्रपटातले हे नायक-नायिका. ‘नेताजी पालकर’ हा व्ही. शांताराम आणि केशवराव धायबर यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट. ही संधी त्यांना बाबुरावांमुळेच मिळाली.  महाराष्ट्र फिल्म कंपनीतून बाहेर पडल्यानंतरही बाबुरावांची चित्रपटनिर्मिती सुरूच राहिली. मूकपटांबरोबरच काही बोलपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केले. चित्रकलेबरोबरच शिल्पकलेचे कामही त्यांनी केले. 16 जानेवारी 1954 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या एकूण चित्रपटांची संख्या 30 हून अधिक होते.  प्रभात फिल्म कंपनी आणि तिचे भागीदार पुण्याला स्थलांतरित झाले. बाबुरावांच्या हयातीतच छत्रपती राजाराम महाराज आणि अक्‍कासाहेब महाराज यांच्या प्रेरणेतून अनुक्रमे कोल्हापूर सिनेटोन, शालिनी सिनेटोन या स्टुडिओंची उभारणी झाली. त्या माध्यमातून चित्रपटांची निर्मिती सुरूच राहिली. 1990 पर्यंत कोल्हापूर हे मराठी चित्रपटनिर्मितीचे केंद्र होते. बाबुरावांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीतल्या कलाकारांनी नंतरच्या काळात स्वतंत्रपणे नावलौकिक मिळवला. व्ही. शांताराम, दामले, फत्तेलाल, धायबर, बाबुराव पेंढारकर, सरदार बाळासाहेब यादव, झुंजारराव पवार यांचा त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. कोल्हापूरच्या फिल्म स्कूलमधून इतर असंख्य दिग्दर्शक, कलावंत, अभिनेते तयार झाले. मा. विनायक, भालजी पेंढारकर, अनंत माने, दिनकर द. पाटील, लता मंगेशकर, आशा भोसले, अरुण सरनाईक ही अशी किती तरी नावे सांगता येतील. या सगळ्या मोठ्या कलाकारांच्या यशाचे श्रेय प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे बाबुरावांच्या ‘सैरंध्री’ चित्रपटाला जाते. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून दादासाहेब फाळके यांचे नाव देशपातळीवर घेतले जाते. त्यांच्या नावाने राष्ट्रीय पातळीवरला सर्वोच्च पुरस्कार दिला जातो; पण फाळके यांच्या कार्याची तुलना करता बाबुरावांचे कार्य कुठेच कमी दिसत नाही. काही बाबतीत तर ते अधिक उजवे ठरते. मग त्यांच्या नावाने देश पातळीवरील जाऊ द्या, किमान राज्य पातळीवर एखादा पुरस्कार द्यावा, असे कुणालाच वाटू नये हे क�