डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक
अमेरिकेच्या 250 वर्षांच्या लोकशाहीच्या इतिहासातील सर्वांत काळा दिवस संपूर्ण जगाला कॅपिटॉल हिल येथील हिंसाचारामुळे पाहायला मिळाला. संपूर्ण जगभरातून याचा तीव्र शब्दांत निषेध केला जात आहे. कॅपिटॉल हिल ही अमेरिकन संसदेची इमारत आहे. अमेरिकन संसदेला काँग्रेस असे म्हटले जाते. याची दोन सभागृहे आहेत. वरिष्ठ सभागृहाला ‘सिनेट’ आणि कनिष्ठ सभागृहाला ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’ म्हणजेच लोकप्रतिनिधी सभागृह म्हटले जाते. या कॅपिटॉल हिलमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या चिथावणीवरून त्यांच्या हजारो समर्थकांनी घुसखोरी करत हिंसाचार घडवून आणत अक्षरशः धुमाकूळ घातला. कोणत्याही देशामध्ये त्या देशाचा सन्मान, सार्वभौमत्त्व या सर्वांचा आत्मा म्हणून संसदेकडे पाहिले जाते. संसदेला लोकशाहीचे मंदिर म्हटले जाते. या संसदेची सुरक्षाव्यवस्था अत्यंत कडेकोट आणि गोळीबंद असते. असे असताना अमेरिकेसारख्या देशाच्या संसदेत हजारो गुंड घुसतात आणि आतमध्ये कमालीची नासधूस करतात, जाळपोळ करतात, त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांकडून गोळीबार केला जातो, त्यामध्ये काहींचा मृत्यू होतो हे सर्व अत्यंत लज्जास्पद आहे.
अमेरिकेच्या संसदेवर अमेरिकन लोकांकडून झालेला हा हल्ला होता. अमेरिका केवळ आपल्या लोकशाहीचे गोडवे गात नाहीये, तर अशा स्वरूपाची लोकशाही जगामध्ये असावी असा आग्रह धरत आली आहे. दुसर्या महायुद्धानंतर लोकशाहीचा जागतिक पातळीवर प्रसार व्हावा यासाठीही अमेरिका प्रयत्नशील राहिली आहे. इतकेच नव्हे तर अमेरिकेत असे अनेक आयोग आहेत की, जे दरवर्षी इतर देशांबाबतचे अहवाल अमेरिकन काँग्रेसला आणि तेथील राष्ट्राध्यक्षांना सादर करत असतात. यावरून त्या देशांशी अमेरिकेने मित्रत्वाचेे संबंध ठेवायचे का, अशा देशांना लष्करी, आर्थिक मदत करायची का, हे अमेरिकन सरकार किंवा अमेरिकन काँग्रेस निर्धारित करत असते. इतर देशांच्या लोकशाहीविषयी संवेदनशीलपणा दाखविणार्या याच अमेरिकेत लोकशाही यंत्रणा पूर्णपणे ढासळल्याचे कॅपिटॉल हिलमधील घटनेने जगापुढे आले.
या अधःपतनाला प्रचंड राजकीय महत्त्वाकांक्षा असणारे अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेच सर्वस्वी जबाबदार आहेत. कॅपिटॉल हिलवरील हल्ला हा ट्रम्प यांच्या आदेशावरून, चिथावणीवरूनच झालेला आहे. कारण या हल्ल्याच्या दोनच दिवस आधी ट्रम्प यांनी त्यांच्या समर्थकांना एक आवाहन केले होते. सिनेटमधील आपल्या प्रतिनिधींना ‘चिअरअप’ करण्यासाठी आपण सर्वांनी कॅपिटॉल हिलला यायचे आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. असे असले तरी त्यामागचा छुपा उद्देश काय होता, हे या हल्ल्याने स्पष्ट झाले आहे. या हल्ल्याने अमेरिकेतील सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण हजार-दीड हजार लोक अमेरिकेच्या संसदेत घुसले असताना अवघ्या 10-15 जणांनाच अटक झाली आहे. याची तुलना साहजिकच अमेरिकेत सुरू असलेल्या अश्वेतवर्णीयांच्या चळवळीशी, आंदोलनाशी केली जात आहे.
हा हल्ला अमेरिकेतील गोर्या लोकांकडून झालेला असून, या श्वेतवर्णीयांचा बहुसंख्याकवाद आणि त्याचा प्रभाव आता वाढू लागलेला आहे. सर्वांत दुर्दैवाची बाब म्हणजे, ट्रम्प हे या हल्ल्याचे मास्टरमाईंड आहेत; पण ही विचारसरणी ज्याला ट्रम्पिझम म्हटले जाते, ती अमेरिकेच्या लोकशाहीला सुरुंग लावणारी आहे. ही ट्रम्पिझम विचारसरणी गोर्यांच्या बहुसंख्याकवादावर आणि एकाधिकारशाहीवर विसंबून आहे. आज अमेरिकन समाज हा दुभंग उघड्या डोळ्याने पाहत आहे; जिथे अश्वेतवर्णीयांच्या ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ या चळवळीला दाबण्यासाठी अमेरिकेतील नॅशनल गार्डस्ना पाचारण करण्यात येते, प्रचंड गोळीबार केला जातो; पण हजारो गोर्यांनी जेव्हा लोकशाहीच्या मंदिराची नासधूस केली, लोकशाहीला काळिमा फासला तेव्हा त्यांना फारसा विरोध होत नाही ! अमेरिकन समाजातील या ध्रुवीकरणाचे, दुभंगलेपणाचे दूरगामी परिणाम येणार्या काळात पाहायला मिळणार आहेत.
जो बायडेन 20 जानेवारी रोजी अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. बायडेन यांना अशा अमेरिकेचे नेतृत्व करायचे आहे की; जी अमेरिका पूर्णपणे दुभंगली गेलेली आहे. वस्तुतः, अमेरिका अशी नव्हती. अमेरिकेचा उल्लेख ‘मेल्टिंग बाऊल’ असा केला जातो. अमेरिका हा निर्वासितांचा देश म्हणून ओळखला जातो. आजवर अमेरिकेमध्ये जगभरातील देशांमधून हजारो नागरिकांचे स्थलांतर झाले आहे. त्यांना अमेरिकेमध्ये सामावून घेण्यात आले. या स्थलांतरितांनी, निर्वासितांनी अमेरिकेच्या आर्थिक विकासामध्ये मोठे योगदान दिलेले आहे. हे सर्व निर्वासित अमेरिकेच्या वातावरणात एकरूप झाले; पण आज हे सर्व अल्पसंख्याक निर्वासित असुरक्षित बनलेले आहेत. कारण अमेरिकेत आज बहुसंख्याकवाद कमालीचा वाढला आहे. या बहुसंख्याकवादाला खतपाणी घालण्याचे काम रिपब्लिकन पक्षानेच केले आहे.
कॅपिटॉल हिलवर हल्ला करणारा वर्ग हा अमेरिकेच्या इस्टर्न आणि वेस्टर्न कोस्टवरील नव्हता. कारण या भागात मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्रगती झालेली आहे. यामधला जो बायबल बेल्ट आहे, ज्याला ‘काऊ बेल्ट’ असेही म्हणतात, या भागातून हा वर्ग आलेला होता. हा वर्ग अत्यंत कॉन्झर्व्हेटिव्ह असून तो रिपब्लिकन पक्षाचा खंदा पाठीराखा राहिलेला आहे. हे लोक आक्रमक बनल्यामुळे आता अमेरिकन समाजातील दुही समाजासमोर आलेली आहे.
या हिंसाचारानंतर ट्रम्प यांनी अखेरीस आपला पराभव मान्य केला आहे; पण यादरम्यान त्यांनी जे-जे प्रकार घडवून आणले त्यातील कळसाध्याय म्हणून कॅपिटॉल हिलवरील हल्ल्याचा उल्लेख करावा लागेल. हा अत्यंत घातक पायंडा आहे. खरे पाहता, या प्रयत्नाचा उपयोग होणार नाही याची ट्रम्प यांना कल्पना होती. मात्र, तरीही त्यांनी हे का घडवून आणले? यामागे दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे 2022 मध्ये अमेरिकेत मध्यावधी निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाने आपली ताकद लोकांना दाखवावी, हा यामागचा उद्देश असू शकतो. दुसरे म्हणजे ट्रम्प यांनी 2024 मध्ये होणार्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मी परत येणार आहे, अशी घोषणा केली होती. त्यामुळे आताच्या निवडणुकीत माझ्यावर अन्याय झाला आहे, खोट्या पद्धतीने माझा पराभव झाला आहे असे दाखवून जनतेची सहानुभूती मिळवायची व 2024 मध्ये जनतेचे समर्थन मिळवायचे असाही उद्देश ट्रम्प यांचा असू शकतो. ट्रम्प यांचा उद्देश काहीही असला तरी घडलेल्या सर्व प्रकारांमुळे एक प्रमुख प्रश्न किंवा मुद्दा उपस्थित झाला आहे तो म्हणजे अमेरिकेतील निवडणूक प्रक्रियेतील सुधारणांचा. अमेरिकेत आजपर्यंत इलेक्ट्रोल रिफॉर्मस् झालेले नाहीत. तेथील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत अत्यंत मोठे दोष आहेत. त्यामुळेच ट्रम्पसारख्यांना असे घृणास्पद प्रकार करण्याची संधी मिळते आहे. त्यामुळे येणार्या काळात हे दोष दूर करण्यासाठी अमेरिकन काँग्रेसने तत्परतेने पावले उचलली पाहिजेत; तरच कॅपिटॉल हिलच्या घटनेची पुनरावृत्ती घडणार नाही.