Sun, Feb 28, 2021 06:34
कादंबरीकार रंगनाथ पठारेंची विशेष मुलाखत

Last Updated: Feb 21 2021 1:15PM

मराठी साहित्यातील महत्त्वाचे कादंबरीकार रंगनाथ पठारे यांना साहित्य क्षेत्रातील समग्र योगदानाबद्दल पाच लाख रुपयांचा ‘विंदा करंदीकर जीवनगौरव’  पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेते, साहित्यिक वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी येत्या 27 फेब्रुवारी रोजी खास समारंभात महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. पठारे यांनी अभिजात भाषा समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. मराठी भाषेचे प्राचीनत्व, समृद्ध परंपरा, तिच्या पिछेहाटीमागील कारणे यांचा ऊहापोह करणारी ही खास मुलाखत. 

प्रश्न : सर, आपण मराठीतील महत्त्वाचे लेखक आहात. महाराष्ट्र शासनाच्या भाषा विभागाच्या वतीने आपणाला समग्र योगदानाबद्दल पाच लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. आपण अभिजात भाषा समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. तर आपण या पुरस्काराकडे कसे पाहता? 

पठारे : तशा या दोन घटना एकमेकांशी जोडलेल्या नाहीत. कदाचित साहित्यातल्या क्षेत्रातले थोडेफार काम आणि अभिजात भाषेचे काम मला महत्त्वाचे वाटते. एरव्ही मी भाषाशास्त्रज्ञ अथवा भाषेचा अभ्यासक नाही; पण एकूण माझ्या वाचनातून मला असे लक्षात आले की, मराठी भाषेला मोठी परंपरा आहे. त्यामुळे सगळी कामे बाजूला ठेवून समितीतल्या महत्त्वाच्या सदस्यांच्या सोबतीने हे काम आम्ही केले. एरव्ही या कामाला वेळ लागला असता; परंतु आपल्या पूर्वजांनीच भाषेच्या बाबतीत इतके काम करून ठेवले आहे की, ते पुरावे उचलून एकत्र करून त्यासंदर्भातले एक आर्ग्युमेंट करणे बाकी होते. त्यासाठीचा मसुदा बनवून ते काम दीड वर्षात शासनाकडे सादर केले.

प्रश्न : मराठीचे प्राचीनत्व सांगताना दिवेआगरचा ताम्रपट, श्रवणबेळगोळचा शिलालेख अथवा फार तर उद्योतनसुरीच्या  कुवलयमालाचा उल्लेख केला जातो. तर त्यापूर्वीचे काही पुरावे सांगता येतील का?  पठारे : त्यासाठी आपण तेराव्या शतकातील म्हाईंभटाच्या लीळाचरित्राचे उदाहरण घेऊ. याच परंपरेत ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्ठी, अनुभवामृत, नामदेवांची अभंगवाणी, तू म्हणतोस ते शिलालेख, ताम्रपट येतात. तर या ग्रंथातील मराठी इतकी प्रगल्भ आणि समृद्ध आहे की, मराठीची ही परंपरा निश्चितच पाच-सहा शतके मागे नेता येते आणि हे प्रमेय कोणताही भाषा अभ्यासक नाकारू शकत नाही. कारण, कोणतीही भाषा आज निर्माण झाली आणि उद्या प्रगल्भ झाली असे नसते. जिला आपण महाराष्ट्री अथवा महारठी असे म्हणतो, तिला मोठी परंपरा आहे. म्हणजे अत्यंत प्राचीन अशी प्रख्यात कादंबरी समरादित्याची कथा (समराईच्च कह), गाथा सत्तसई असे अनेक प्राकृत ग्रंथ आहेत. या रचना मराठीचे प्राचीनत्व सिद्ध करतात. तसेच प्राकृत भाषेचे व्याकरण संस्कृतमध्ये रचताना वैयाकरणांनी भाषेचे नियमन देताना शेवटी ‘शेष महाराष्ट्रिवत’ म्हणजे उर्वरित मराठी, असे दरवेळी म्हटले आहे. याचा अर्थ मराठी ही दोन हजार वर्षांची प्राचीन भाषा ठरते. 

‘गाथा सत्तसई’ या ग्रंथाच्या हस्तलिखित पोथ्या केवळ संपूर्ण भारतातच नव्हे, तर अफगाणिस्तानातही मिळाल्या आहेत. तर हे मराठीच्या वेगळेपणाचे निदर्शक आहे. हे सगळे जे वर्णन आहे ते गोदावरीच्या काठच्या खेड्याचे आहे. ज्या नदीचा संबंध केवळ महाराष्ट्राशी आहे. यालाच जोडून आणखी एक महत्त्वाचा संदर्भ म्हणजे सातवाहनांचे राज्य संपूर्ण भारताच्या भूखंडावर इस पूर्व 230 ते इस 200 असे सुमारे साडेचारशे वर्षे होते. त्यामुळे मराठीचे प्राचीनत्व जितके महत्त्वाचे आहे, तितके तिचे व्यापकत्वही महत्त्वाचे आहे.

प्रश्न : आपण ‘सातपाटील कुलवृत्तांत’ कादंबरी लिहून तिच्या शेवटी राजारामशास्त्री भागवतांचा संदर्भ देऊन मराठी ही संपूर्ण भारत खंडाची भाषा असल्याचे म्हटले आहे. तर याबद्दल आपण काय सांगाल? 

पठारे ः राजारामशास्त्री भागवत हे अत्यंत प्रतिभावान अभ्यासक होते. त्यांनी मर्‍हाटीसंबंधी चार उद्गार असे मांडताना संपूर्ण देशच मराठी माणसाने उभा केला आहे आणि ती भाषा राजव्यवहाराचीही होती. मराठीचा संबंध पश्तु या पठाण भाषेशी कसा आहे, हे स्पष्ट केले आहे. सिंधीमध्ये आईला आईच म्हणतात किंवा मेघालय, मिझोराम, आसाममध्येही आईला आईच म्हटले जाते. त्यामुळे मराठीचा संबंध देशभर असल्याचे लक्षात येते. हे केवळ एका शब्दाचे आहे असे नाही, तर असे शेकडो शब्द आणि लकबी मराठी सिंधीमध्ये समान आहेत आणि सिंधी ही सिंधू प्रदेशातील प्राचीन भाषा आहे. भाषेच्या अंगाने भाषा अभ्यासकांनी काम करायला हवे. तिचे हे प्राचीनत्व आजही जपले गेलेले आहे. 

प्रश्न : मराठी भाषादिनाच्या पार्श्वभूमीवर मी असे विचारतो की, इतकी प्राचीन परंपरा असलेली मराठी मरणपंथाला लागली आहे अशा भ्रमातून लोक इंग्रजीकडे वळले आहेत, याबद्दल आपण काय सांगाल?

पठारे ः इंग्रजांच्या आगमनानंतर मराठी भाषा बिघडायला आणि तिचा दर्जा खालावायला सुरुवात झालेली आहे. विष्णुशास्त्री चिपळूणकर या ज्ञानपुरुषाने मराठी ही मशागत न केलेल्या पडीक जमिनीसारखी भाषा असून, तिला एकीकडून  संस्कृत आणि दुसरीकडून इंग्रजी अशा दोन भाषांचा बळकट आधार द्यावा लागेल, असे सांगून मराठीचे खूप मोठे नुकसान केले आहे. ज्या भाषेत लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी लिहिली किंवा नामदेव, एकनाथ, तुकाराम यांनी लिहिलेले होते ती नूतन भूमिकेप्रमाणे कशी?  पण हे प्रमेय मधल्या काळात आपणासारख्या  लिहिण्या-वाचणार्‍या लोकांनी प्रमाण मानले. मधल्या शंभर वर्षांत पेशव्यांचे ब्राह्मणी नेतृत्व मध्यवर्ती असल्याने मराठीकडे बघण्याचा द़ृष्टिकोन बदलला. अरुण साधू यांनी एकेठिकाणी असे म्हटले आहे की, महाराष्ट्राचे नेतृत्व ब्राह्मण लोकांनी केल्यामुळे महाराष्ट्री धर्माचे मोठे नुकसान झाले आहे, हे आपण नीट समजून घेतले पाहिजे. कारण, बृहत मराठी यांच्या आस्थेच्या ठिकाणी कधी आले नाही. इंग्रजांनी आपल्या कारकुनीसाठी  इंग्रजी शिकवले. या सगळ्या प्रक्रियेपासून बहुजन दूरच होता. तिथूनच खर्‍या अर्थाने इंग्रजीचा शिरकाव झाला आणि मराठीची पिछेहाट सुरू झाली आहे. स्वभाषेला कमी लेखण्याची प्रवृत्ती बळवायला सुरुवात झाली. खरे तर महात्मा फुले यांनी खर्‍या अर्थाने मराठी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, अलीकडे अठरापगड जातीतले लोक लिहायला लागल्यावर तिला जरा बरे दिवस आले असले, तरी मात्र आजच्या मध्यमवर्गीय माणसाला ब्राह्मणी परंपरेचे जे आकर्षण आहे, त्याचाही एक परिणाम आजच्या मराठीच्या पिछेहाटेवर झालेला दिसतो. 

आता हा प्रश्न जागतिक असला, तरी मराठीबाबत बोलायचे झाले, तर याला आपण काऊंटर करू शकू. तेरा कोटी जनतेची भाषा अशी मरेल            
असे वाटत नाही; पण त्यासाठी आपणाला जाणीवपूर्वक काही प्रयत्न करावे लागतील. मराठी ही ज्ञान-विज्ञानाची आणि रोजगाराची भाषा बनवायला हवी. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यासाठी सातत्यपूर्ण आणि नवीन उपक्रम राबवले होते, ते समजून नीट लक्षात घ्यायला हवेत. त्यांनी जी पायाभरणी केली होती त्यावर आपण काही काळ तगून राहिलो; पण आता असा कोणी दूरद़ृष्टीने विचार करणारा राजकारणी राहिला नाही. त्यामुळे परिस्थिती विचार करण्यासारखी आहे. कारण, भाषा मरते म्हणजे एक पूर्ण संस्कृती मरत असते. असे काही घडणे धोकादायक आहे.

प्रश्न : सर, आपण विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. आपला इंग्रजीचा अभ्यास असूनही आपण मराठीत लेखन केले आहे. भाषेला ऊर्जितावस्था येण्यासाठी काही करता येईल काय? पठारे : मराठीला दिमाखाने उभे करायचे असेल, तर तिला ज्ञान-विज्ञानाची भाषा बनवायला हवे. साहित्य संस्कृती मंडळाने अनेक खंड प्रकाशित केले आहेत. ते काम पुढे गेले पाहिजे. त्याला गती मिळायला हवी. यशवंतराव चव्हाण यांनी मराठी विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळामार्फत खूप महत्त्वाचे ग्रंथ प्रकाशित केले होते, ते काम आता बंद पडले आहे. ते पुन्हा नव्याने सुरू करायला हरकत नाही, ते फार खर्चिकही नाही. जगातल्या इतर भाषेतले उत्तम ज्ञान अनुवादित करायला हरकत नाही. असे काही उपक्रम विद्यापीठाने अग्रक्रमाने करायला हवेत त्या-त्या ज्ञानशाखेतील साहित्य सहजपणे उपलब्ध व्हायला हवे. कोरियासारख्या अत्यंत छोट्या देशाने आपल्या कोरियन भाषेत जगातले सर्वोत्तम ज्ञान उपलब्ध करून दिले आहे. त्यांना इंग्रजी येत नसूनही तो देश आज पुढे आहे. मात्र, इकडे आपणच आपल्या भाषेला दुय्यम मानत आलो आहोत. ती प्रगल्भ बनवण्यासाठी छोटे-मोठे उपक्रम ठोसपणे राबविण्यात आले पाहिजेत. तसा एक भाषाविषयक आराखडा मी शासनाला देऊ शकतो.

प्रश्न : अभिजात भाषाविषयक आजची स्थिती काय आहे? 

पठारे : समितीने म्हणून जे काम करायला हवे, ते आपण दीड वर्षात करून 2015 मध्येच शासनाकडे सादर केले आहे. शासनाकडून तो प्रस्ताव केंद्राच्या सांस्कृतिक विभागाकडे गेला आहे. माझ्या समजुतीनुसार त्याला मनुष्यबळ मंत्रालय आणि अर्थ मंत्रालय यांची मंजुरी घेऊन तो संसदेत मांडला गेला पाहिजे; पण मला असे समजते की, कोणी तरी मद्रास हायकोर्टात मल्याळमच्या संदर्भाने केस दाखल केलेली आहे. त्या केसचे कारण पुढे करून दिरंगाई केली. आता आणखी कारण उरलेलं नाहीय. मंत्री म्हणतात, प्रपोजल ऑफ मराठी इज अंडर अ‍ॅक्टिव्ह कन्सिडरेशन. आता तो प्रस्ताव साहित्य अकादमीकडे आला आहे. याला काय म्हणावे. यांच्यासाठी आपल्या मुख्यमंत्री आणि खासदारांनी आवाज उठवायला हवा, तरच हा प्रश्न मार्गी लागू शकतो.

प्राचार्य डॉ. महेंद्र कदम