बहार विशेष : क्रौर्याचा एक अध्याय संपला

Last Updated: Nov 07 2019 2:43PM
Responsive image

अभय कुलकर्णी, मस्कत 


क्रौर्याचे दुसरे नाव असेच ज्याचे वर्णन करता येईल, तो अबू बक्र अल बगदादी हा काही दिवसांपूर्वी मारला गेला. ‘इसिस’ या संघटनेचा दरारा काही वर्षांपूर्वी जगाने अनुभवला. त्यांच्या कट्टरतेला काहीच सीमा नव्हती. या ‘इसिस’चा म्होरक्या असणार्‍या बगदादीच्या मृत्यूमुळे दहशतवादाचे एक युग संपले असेच म्हणावे लागेल. मात्र, मारला गेल्यानंतरही ओसामा बिन लादेन दहशतवाद्यांसाठी प्रेरणादायी राहिला तसाच प्रभाव बगदादीचा राहील, असे मानले जाते. कारण, बगदादीचा प्रभाव लादेनपेक्षाही जास्त होता, हे विसरून चालणार नाही.

गेल्या काही दिवसांपासून जागतिक पातळीवर विविध प्रकारच्या हिंसक कारवाया सुरूच आहेत. जागतिक दहशतवादाला खतपाणी घालणार्‍या कट्टर दहशतवादी संघटना म्हणजेच ‘इसिस’चा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी याला अमेरिकेने कारवाईत ठार मारले आणि क्रूरतेच्या एका पर्वाचा अंत झाला. जगातील सर्वात मोठे दोन दहशतवादी ओसामा बिन लादेन आणि अबू बक्र अल बगदादी यांना शोधून ठार केल्याचे श्रेय अमेरिका निश्चितच घेऊ शकते. त्याशिवाय मुल्ला उमर सह लादेनचा मुलगा हमजा बिन लादेनलाही मारण्यात यश आले आहे. मात्र, 2 मे 2011 मध्ये ओसामा आणि आता 27 ऑक्टोबरला बगदादीला ठार मारणे या दोन्ही गोष्टी दहशतवादविरोधी युद्धातील मोठे यश म्हणून कायम लक्षात ठेवल्या जातील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बगदादीच्या मृत्यूची घोषणा केली तेव्हा संपूर्ण जगाने सुटकेचा नि:श्वास सोडला. ट्रम्प यांनी असे सांगितले की, अमेरिकेच्या शक्तीच्या भीतीने बगदादी ओरडत, किंचाळत कुत्र्याप्रमाणे मेला.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनुसार, बगदादीने अमेरिकन सैन्य आपल्याकडे येते आहे असे पाहून आपल्या ठिकाणाच्या खालच्या भुयारातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. स्वतःबरोबर तो आपल्या तीन मुलांनाही घेऊन गेला होता. यादरम्यान लष्कराने आणि लष्कराच्या कुत्र्यांनी त्याचा पाठलाग केला. भुयारातून पळून जाण्यासाठी पुढे त्याला मार्ग मिळाला नाही तेव्हा त्याने आत्मघातकी जॅकेटचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात त्याचा आणि त्याच्या तीन मुलांचा मृत्यू झाला. अमेरिकेने बगदादीवर 177 कोटी रुपयांचे इनाम ठेवले होते. अर्थात,  बगदादी मारला जाणे ही गोष्ट याआधी आठ वेळा सांगण्यात आली आहे; पण प्रत्येकवेळी बगदादी मेला हा दावा खोटा ठरला आहे. अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी 22 जुलै 2017 मध्ये बगदादी मारला गेल्याचा दावा फेटाळला होता आणि म्हटले होते की, बगदादी जिवंत आहे आणि जेव्हा आम्ही त्याला मारून टाकले आहे, हे कळेल तेव्हाच तो मेला आहे, हे मी मान्य करेन. यावर्षी श्रीलंकेतील ख्राईस्ट चर्चमध्ये 21 एप्रिल रोजी झालेल्या बॉम्बस्फोटानंतर बगदादीने एक व्हिडीओ प्रसारित केला होता. त्यापूर्वी तो सार्वजनिक ठिकाणी एकदाच जुलै 2014 मध्ये मोसूलमधील अल नुरी मस्जिद येथे दिसला होता. त्याने इराक आणि सीरियामध्ये इस्लामिक स्टेट (इसिस)च्या स्थापनेची घोषणा केली होती. आता बगदादीचा हिंसा आणि विनाश करण्यास सांगणारा ऑडियो आणि व्हिडीओ कधीच येणार नाही. दहशतवादविरोधी युद्धातील हे सर्वात मोठे यश आहे. 

बगदादी जगात वाँटेड असलेला दहशतवादी होता. 2017 पासून मात्र या दहशतवाद्याचे पाय डळमळीत होऊ लागले होते. 28 जून 2017 ला ‘इसिस’ने मोसूलमधील प्रसिद्ध झुकलेला मीनार आणि त्याच्याशी निगडित नुरी मशीद बॉम्बस्फोट करून उडवून दिली होती. त्या वर्षी म्हणजे 2014 मध्ये पहिल्यांदा सार्वजनिकरीत्या समोर आलेल्या बगदादीने स्वतःला खलिफा घोषित केले होते. हा सर्व मोसूलचा परिसर होता, जो ‘इसिस’च्या ताब्यातून सोडवण्यासाठी इराकी सैन्य सातत्याने संघर्ष करत होते. 9 डिसेंबर 2017 मध्ये इराकचे पंतप्रधान हैदर अल अबादी यांनी ‘इसिस’ला इराकमधून पूर्णपणे उखडून बाहेर केल्याचा दावा केला होता आणि ते खरेही होते. मात्र, जोपर्यंत बगदादी जिवंत होता, तोपर्यंत हा संपूर्ण विजय असल्याचे मानले जाऊ शकत नव्हतेच. अमेरिकेने ओसामा बिन लादेनला संपवण्यासाठी अफगाणिस्तानवर हल्ला केला होता, त्यानंतर लादेनचा शोध घेण्यास 9 वर्षे लागली होती. त्यामुळेच बगदादीचा शोध घेणे हे काही सोपे नव्हते, याची कल्पना होती. परंतु, दोघांमध्ये अंतर होते. लादेनला पाकिस्तानात अत्यंत सुरक्षित जागा लपण्यासाठी मिळाली होती. बगदादीला मात्र कोणत्याही देशात जागाच मिळणार नव्हती. सीरियामध्येच असण्याची शक्यता अधिक होती. 

बगदादी इराकमध्ये अमेरिकेच्या विजयाच्या विरोधात संघर्ष करणार्‍या ‘अल कायदा’ या संघटनेचा प्रमुख होता. ‘अल कायदा’मधून बाहेर पडत त्याने 2006 मध्ये वेगला आयएसआय म्हणजेच  इस्लामिक स्टेट ऑफ इराक (इसिस) या नावाने संघटना निर्माण करून एकट्याने कब्जा करण्याच्या द़ृष्टीने काम सुरू केले. त्यात तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यात सद्दाम हुसेनच्या काळातील काही लष्करी अधिकारी त्याला भेटले; पण त्याच्या कल्पनेच्या भरार्‍या उच्च होत्या. मध्यकालीन साम्राज्याची स्थापना करायची, ज्याचा प्रमुख असेल खलिफा. आता सीरियामध्ये गृहकलहाला सुरुवात झाली होती. मग, बगदादीने त्याच्या संघटनेचे नाव ‘इसिस’ म्हणजे इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया असे केले. तिथे फ्री सीरियन आर्मी किंवा ‘एफएसए’ला अमेरिका आणि त्याच्या इतर साथीदार देशांची सहानूभुती किंवा थोडे सहकार्य मिळाले होते. जून 2013 मध्ये ‘एफएसए’ने आपला पराभव होत असल्याचे पाहून शस्त्रे आणि इतर संसाधने देण्याची मागणी केली. त्यानंतर अमेरिका, इस्रायल, जॉर्डन, तुर्की, सौदी अरेबिया आणि कतार या राष्ट्रांनी शस्त्रे, पैसा आणि सैन्य प्रशिक्षण आदी मदत देण्यास सुरुवात केली. या देशांना याची कल्पनाच नव्हती की, ‘एफएसए’बरोबर ‘इसिस’देखील आहे. या सर्व शस्त्रांच्या, साधने आणि प्रशिक्षण यांच्या मदतीने बगदादीने सीरिया आणि इराकचा एक मोठा भूभाग आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर त्याचीच सत्ता तिथे होती. इराक आणि सीरिया बगदादीच्या कब्जातून कधीच मुक्त होणार नाही, असे वाटत होते. परंतु, मोसूल आणि रक्का ही दोन प्रमुख केंद्रे बगदादीच्या हातून निसटल्यानंतर ‘इसिस’चे अधिपत्य संपू शकते, अशी खात्री झाली. 

बगदादीच्या नेतृत्वात ‘इसिस’ ही पहिलीच दहशतवादी संघटना आहे जिने इराक आणि सीरियामध्ये 88 हजार वर्ग किलोमीटरपर्यंतच्या परिसरावर कब्जा केला होता. अफगाणिस्तानामध्ये तालिबानने कब्जा केला होता, त्याचा स्रोत ‘अल कायदा’ होता. ओसामा बिन लादेन याने स्वतःला खलिफा घोषित केले नव्हते. बगदादीच्या महत्त्वाकांक्षा वेगळ्या होत्या, त्याला लवकरात लवकर त्याचे लक्ष्य गाठायचे होते. आपण पुस्तकांमध्ये मध्ययुगीन शासनकालाविषयी वाचले होते, बगदादी आपल्या परिसरात त्याप्रमाणे शासन, संघर्ष आणि व्यवहार, वर्तन करत होता. बगदादीने त्याचा कब्जा असताना त्या ठिकाणी खूप मोठा नरसंहार केला होता. 2014 मध्ये इराकच्या सिंजार क्षेत्रावर कब्जा केल्यानंतर त्याचा रानटीपणा जगासमोर आला होता. त्याने कुर्दी धर्मीय अल्पसंख्याक समुदायाच्या हजारो महिला आणि तरुणींना कैदेत ठेवले आणि त्यांना लैंगिक गुलाम होण्यास मजबूर केले. बाजारात त्यांची विक्री केल्याचे व्हिडीओही व्हायरल केले. 

इराक आणि सीरिया या दोन्ही प्रदेशांतून ‘इसिस’चा झालेला पराभव आणि बगदादीचा मृत्यू यामुळे आधुनिक जगात क्रूरतेचा एक काळा अध्याय संपुष्टात आला. त्यामुळे जगातील आत्मघातकी दहशतवादाला बसलेला हा सर्वात मोठा धक्का आहे. परंतु, दहशतवादाचा धोका अद्यापही पूर्णपणे संपलाय, असे मानणे धाडसाचे ठरेल. अजूनही ‘इसिस’ दहशतवादी आहे. कारण, ‘इसिस’ नायजेरियापासून फिलीपिन्सपर्यंत सक्रिय आहे. ओसामा बिन लादेन मेला तरीही दहशतवाद्यांचे प्रेरणास्थान आहे; पण बगदादीचा प्रभाव त्याहीपेक्षा अधिक आहे. बगदादीने संघर्ष करताना आपल्या प्रवक्त्याकडून ‘लोन वूल्फ’ म्हणजे एकट्याने जे काही शस्त्रे मिळतील त्याने हल्ला करण्याविषयी सांगितले आहे, तो ऑडिओ जगभरात प्रसिद्ध झाला आहे. अनेक देश त्याला बळी पडले आहेत. ‘इसिस’च्या सहकारी संघटना इजिप्त आणि लीबियामध्येही हल्ला करताहेत. त्यामुळे बगदादी मेला तरीही धोका कायम आहे. एक नक्की की, बगदादी मेल्यामुळे त्याचे आकर्षण आणि त्याच्याकडून मिळणारी हिंसा करण्याच्या प्रेरणेचा जिवंत स्रोत नक्कीच संपला आहे. 

बगदादी मेला असला, तरीही त्याने पेरलेली बीजे कुठेना कुठे रुजलेली असावीत. त्यामुळे बगदादी मेला म्हणजे आत्मघातकी दहशतवाद संपला, असे आता तरी म्हणता येणार नाही. जिवंत प्रेरणा राहिली नसली, तरीही सजग राहून त्याच्याशी संबंधित संघटनांकडे लक्ष ठेवावे लागणार आहे. बगदादीच्या मृत्यूमुळे क्रूरतेच्या परिसीमेचा अंत झाला आहे, असेच म्हणावे लागेल.

•अबू बक्र अल बगदादीला मारल्यानंतर अमेरिकेकडून एक व्हिडीओ प्रसारित करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये उत्तर-पश्चिम सीरियातील एका भागात कशाप्रकारे अमेरिकन सैन्याने प्रवेश केला आणि बगदादीचा कशाप्रकारे खात्मा केला हे दिसत आहे. हा व्हिडीओ प्रसारित करून बगदादीच्या मृत्यूविषयीची साशंकता संपुष्टात आणण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे.  त्याचबरोबर बगदादीला मारण्यासाठी गेलेल्या अमेरिकेच्या हेलिकॉप्टरवर काही दहशतवाद्यांनी गोळीबारही सुरू केला होता; पण त्यांनाही यमसदनी धाडण्यात आले आहे. 

•बगदादीला मारण्यासाठी अमेरिकेची ‘सीआयए’ ही संघटना 15 मेपासून त्याच्या मागावर होती. त्याने अनेकदा आपले निवासस्थान बदलले. मात्र, अखेर त्याच्या घरापर्यंत पोहोचण्यास अमेरिकेच्या जवानांंना यश आलेच. 

•अबू बक्र अल बगदादीने ‘इसिस’च्या पुढील वाटचालीसाठी आपला उत्तराधिकारीही आधीच तयार करून ठेवला होता. त्याच्या हाती कमान सोपवण्यापूर्वीच त्यालाही अमेरिकन सैन्याने ठेचला आहे. त्यामुळे ‘इसिस’च्या नेतृत्वफळीतील पहिल्या आणि दुसर्‍या क्रमांकाचे नेतृत्वही आता उरलेले नाही. त्यामुळेच आता ‘इसिस’ संपली, असा दावा केला जात आहे.

ही कारवाई दहशतवादविरोधी लढाईतील एक मोठे पाऊल ठरणारी आहे. त्याचबरोबर या कारवाईला राजकीय कंगोरेही आहेत. अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकीत ट्रम्प महाशय पुन्हा नशीब आजमावणार असले, तरी सततच्या कोलांटउड्या, धरसोड करणारी चमत्कारिक भूमिका, यामुळे ते काहीसे पिछाडीवर पडलेले दिसत होते. त्यांच्यावरील महाभियोगाचीही बरीच चर्चा अमेरिकेत झाली आणि होत आहे. तथापि, राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांच्या प्रचारकाळात ट्रम्प यांनी दहशतवादाविरोधात कठोर पाऊल उचलणार असल्याचे आश्वासन अमेरिकेतील जनतेला दिले होते आणि बगदादीला कंठस्नान घालून यासंदर्भात एक मोठे पाऊल त्यांनी टाकले आहे. त्यामुळेच मध्यंतरीच्या काळात काहीसे बॅकफुटवर गेलेले ट्रम्प आता नव्या जोमाने अमेरिकन जनतेपुढे आणि जगापुढे येताना दिसत आहेत. याचा त्यांना प्रत्यक्षात राजकीय लाभ किती होतो, हे आगामी काळात पाहावे लागेल. 

बगदादीचा खात्मा करण्याच्या या कारवाईमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या एका श्वानाचा फोटो ट्रम्प यांनी ट्विट केला आहे. बेल्जियममधील मेलोनॉईज प्रजातीच्या या श्वानांनी ओसामा बिन लादेनविरोधातील कारवाईतही महत्त्वाची भूमिका बजावली होती. अमेरिकेतील राष्ट्रपती भवनाबाहेर सुरक्षेसाठीही या प्रजातीतील कुत्र्यांची तैनाती केली जाते. भारतीय सुरक्षा यंत्रणांकडेही असे श्वान आहेत. मेट्रो स्टेशन्स आणि विमानतळांवर सिक्युरिटी चेकिंगसाठी त्यांचा वापर केला जातो. 

दोन फूट खोल जमिनीखाली असलेल्या साहित्याचाही ते वासावरून शोध लावू शकतात. इतकेच नव्हे, तर एखादा व्यक्ती 24 तासांपूर्वी एखाद्या ठिकाणाहून गेला असेल, तर त्याचाही पत्ता ही श्वान लावू शकतात.

सांगली मिरज कुपवाड महापालिकेतील भाजपचे गटनेते युवराज बावडेकर यांचा राजीनामा


कल्याण : नव्याने उभारण्यात आलेल्या पत्रीपुलाच्या नामकरणावरून सेना-भाजपमध्ये वाद  


प. बंगाल निवडणुकासंदर्भातील याचिकेची दखल घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार


मुंबई : आझाद मैदानातील शेतकऱ्यांच्या मोर्चाकडे शिवसेनेने पाठ फिरवली! 


नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी छगन भुजबळ यांची निवड 


आझाद मैदान शेतकरी आंदोलन : जेव्हा येथील छत्रपतींचे वंशज तलवार काढतील, तेव्हा मोदीजी जागेवर दिसणार नाहीत


'माझा होशील ना फेम' आदित्य आहे 'या' प्रसिध्द अभिनेत्रीचा मुलगा 


बामनोली- कुडाळ हुतात्मा स्मारकाच्या कोनशिलेची विटंबना, ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी 


उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय आपल्‍या दारी या उपक्रमाची कोल्‍हापुरातून सुरूवात 


लॉकडाऊनमध्ये देशातील अब्जाधीशांच्या संपत्तीत ३५ टक्के वाढ; त्यातून १३ कोटी लोकांना ९४ हजार ४५ रुपयांचा चेक दिला जाऊ शकतो!