Sat, Nov 28, 2020 19:02होमपेज › Aurangabad › सासूरवाडीतूनच तरुणाचे दुचाकीवरून अपहरण

सासूरवाडीतूनच तरुणाचे दुचाकीवरून अपहरण

Published On: Dec 30 2017 1:11PM | Last Updated: Dec 30 2017 1:12PM

बुकमार्क करा
वडोदबाजार:  प्रतिनिधी

तुमच्या वडिलांना मारहाण करण्यात  आली असल्याचा बनाव करत चार जणांनी संगनमत करून एका तरुणाचे त्याच्या सासूरवाडीतून दुचाकीद्वारे सिनेस्टाईल  अपहरण केल्याची घटना फुलंब्री तालुक्यातील निधोना येथे उघडकीस  आली आहे.

दरम्यान, याप्रकरणी गुरुवारी चार अज्ञात लोकांविरुद्ध वडोदबाजार पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  खुलताबाद तालुक्यातील पाडळी येथील रहिवासी  सज्जो जावेद शेख (20) ही महिला  बाळंतपणासाठी माहेरी निधोना येथे आलेली आहे. मंगळवारी तिचे पती जावेद ताजुद्दीन शेख हे पत्नीला भेटण्यासाठी निधोना येथे  आले होते. बुधवारी त्यांना औरंगाबादला जायचे होते; परंतु पत्नीला  गुरुवारी सोनोग्राफी करण्यासाठी फुलंब्रीला जायचे असल्याने त्यांना पत्नीने थांबवून घेतले.

दरम्यान, बुधवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास जावेद यांनी जेवण केले. याचवेळी एक अनोळखी  इसम त्यांच्या सासर्‍याच्या घरी आला.  बोलत बोलत ते घरापासून दूर गेले.आपणाला औरंगाबादला सही करण्यासाठी  जायचे आहे, असा सदर इसम जावेद यांना बोलत होता. याच वेळी सज्जो हिने सदर इसमास  विचारपूस केली असता जावेदच्या वडिलांना बाजारसावंगी येथे मारहाण झाली असून  त्यांना घेऊन जात आहे, असे उत्तर त्या इसमाने सज्जो हिला दिले. त्यानंतर चार जणांनी बळजबरीने जावेद याला दुचाकीवर बसवून त्याचे अपहरण केले.

सज्जो यांनी फोनवरून  सासरे ताजुद्दीन शेख यांच्याशी संपर्क साधला मला  मारहाण झाल्याचा कुठलाच प्रकार घडला नसल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी सज्जो हिने थेट वडोदबाजार  पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. त्यानंतर गुरुवारी चार अज्ञात लोकांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार सुरेश दौड पुढील तपास करीत आहेत.