Thu, Jul 09, 2020 23:00होमपेज › Aurangabad › ट्रकने मोपेडला उडविले : पत्नी ठार, पती जखमी

ट्रकने मोपेडला उडविले : पत्नी ठार, पती जखमी

Published On: Mar 08 2019 3:04PM | Last Updated: Mar 08 2019 3:04PM
औरंगाबाद : प्रतिनिधी 

भरधाव ट्रकने मोपेडला दिलेल्‍या जोरदार धडकेत, मोपेडवरील पत्‍नी जागीच ठार, तर पती गंभीर जखमी झाला. हा अपघात आज (दि ८) रोजी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास घडला. बीड बायपासवरील एमआयटी चौकात हा अपघात घडला. जखमी पतीला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्नेहल बावळे असे ठार झालेल्‍या महिलेचे नाव आहे.

आज दुपारी १.२० वाजण्याच्या सुमारास एमआयटी चौकात (एमएच२०-डीयू-३९२७) या मोपेडवरून स्नेहल बावळे या आपल्‍या पतीसोबत चालल्‍या होत्‍या. यावेळी त्‍या तीन मोठे सामानाचे बाँक्स घेऊन बसल्‍या होत्‍या. यादरम्‍यान त्‍या महानुभाव चौकाकडे जात असताना, बाँक्सला भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकचा धक्का बसला. त्यामुळे मोपेडवरील स्‍नेहल यांचा तोल जाऊन त्‍या खाली पडल्‍या आणि ट्रकच्या( एमएच१८-बीए-२७४९) टायरखाली आल्‍या. यावेळी ट्रकचे चाक स्‍नेहल यांच्या डोक्यावरून गेले. यावेळी त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला.

यावेळी वाहतूक पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत दुचाकी स्वार पतीला बाजूला ओढल्यामुळे तो जखमी झाला व त्‍याचे प्राण वाचले. यानंतर त्‍याला तातडीने घाटी रुग्णालयात उपचारांसाठी रवाना करण्यात आले. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.