Sun, Aug 09, 2020 11:59होमपेज › Aurangabad › कचरा विघटन प्रक्रियेचे प्रयोग सुरूच

कचरा विघटन प्रक्रियेचे प्रयोग सुरूच

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

गेल्या 43 दिवसांपासून ओला-सुका असे वर्गीकरण न झालेला कचरा मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी डंपिंग केलेला आहे. या कचर्‍यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी मनपा प्रशासन व पदाधिकार्‍यांचे कचर्‍यावरील प्रक्रियेचे प्रयोगामागून प्रयोग सुरूच आहेत. मध्यवर्ती बसस्थानक, टाऊन हॉल, आकाशवाणी आदींसह विविध भागात साचलेल्या कचर्‍यामुळे दुर्गंधी पसरू लागली आहे. शुक्रवारी (दि. 30) टाऊन हॉल येथे आणखी एक प्रयोग झाला. साचलेल्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक पुण्यातील एका कंपनीने सादर केले. यावेळी महापौरांसह पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शासन नियुक्त विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने कचरा प्रक्रियेसाठी चिकलठाण्यातील जागा निवडली आहे. या जागेत दररोज निर्माण होणार्‍या कचर्‍याचे ओला-सुका वर्गीकरण करून प्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठी 3 एकरांत ओल्या कचर्‍यावर कंपोस्टिंग आणि 2 एकरांत सुक्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी शेड उभारण्याचा निर्णय गुरुवारच्या बैठकीत घेण्यात आला आहे. कंपोस्टिंगसाठी खड्डे व प्रोसेसिंगसाठी प्रकल्प उभारण्यासाठी आठवडा लागणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांनी गुरुवारी सांगितले होते. त्यामुळे आणखी आठवडाभर तरी कचरा शहरात विविध ठिकाणी साचवावा लागणार आहे. 

शुक्रवारी एम-प्लस ऑटोमेशन या कंपनीच्या मिलिंद आर्या, मनोहर दाभाडे यांनी   मनपाच्या पदाधिकार्‍यांसमोर प्रात्यक्षिक सादर केले. कचर्‍यावर प्रक्रिया करून त्यापासून ऑईल, गॅस आणि अ‍ॅश (राख) तयार करता येते. दहा तासांत 400 किलो ते 16 टन कचर्‍यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असणार्‍या मशीन कंपनीकडे आहेत. ओला-सुका कचरा एकत्र जाळून त्यापासून ऑईल, गॅस आणि अ‍ॅश वेगवेगळी बाहेर पडते. ही प्रक्रिया होताना तसेच प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यापासून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. एक टन कचर्‍यापासून 40 टक्के गॅस, 35 टक्के ऑईल आणि 25 टक्के अ‍ॅश तयार होत असल्याचा दावा कंपनीच्या प्रतिनिधींनी केला. टाऊन हॉल येथील प्रात्यक्षिकाच्यावेळी जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त नवल किशोर राम हे उपस्थित नव्हते. ते स्वतः हे प्रात्यक्षिक पाहून निर्णय घेतील, असे महापौर घोडेले यांनी सांगितले.


  •