औरंगाबाद : प्रतिनिधी
मोकाट कुत्र्याने चावा घेतलेल्या दोन वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान बुधवारी (दि. ११) सकाळी मृत्यू झाला आहे. अक्षरा राजू वावरे (मुकुंदवाडी, जे सेक्टर) असे मृत मुलीचे नाव आहे. या घटनेनंतर शहरात पुन्हा एकदा नागरिकांमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत पसरली आहे. तर राजू वावरे यांना एकच मुलगी असून मुकुंदवाडी परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुकुंदवाडीच्या जे सेक्टर परिसरात राजू वावरे हे मजुरी करुन आपल्या घराचा उदरनिर्वाह करतात. त्यांना दोन वर्षांची एकुलती एक अक्षरा ही मुलगी आहे. २५ ऑगस्ट रोजी सकाळच्या वेळेला अचानक मोकाट कुत्र्यांनी वावरे यांच्या घरासमोर धुमाकूळ घातला. यावेळी रस्त्याच्या कडेला उभी असलेली दोन वर्षीय अक्षराला मोकाट कुत्र्याने चावा घेतला.
अक्षराच्या नाक, डोक, कान अशा तीन्ही ठिकाणी चावा घेतल्याने ती पुर्णपणे गंभीर जखमी झाली. तत्काळ घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले. प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला दोन-तीन दिवस अंतर्गत रुग्णालयात दाखल करुन घेतले. डिस्चार्ज मिळाल्यानंतर उपचारासाठी आई-वडील तिला नियमितपणे घाटी रुग्णालयात आणत असतं. परंतु, मंगळवारी (दि.१०) मध्यरात्री तिला अचानक झटके येण्यास सुरूवात झाली. तिला तत्काळ हेडगेवार रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. याठिकाणी नकार दिल्यानंतर पुन्हा घाटीत दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान तिचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. नागरिकांकडून महापालिकेविरोधात संताप व्यक्त केला जात असून मोकाट कुत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.