Tue, Jul 07, 2020 08:40होमपेज › Aurangabad › दोन वर्षाच्या मुलाचा मृत्‍यू, नातेवाईकांचा रुबेला लसीकरणावर आरोप(Video)

दोन वर्षाच्या मुलाचा मृत्‍यू, नातेवाईकांचा रुबेला लसीकरणावर आरोप(Video)

Published On: Feb 08 2019 4:00PM | Last Updated: Feb 08 2019 4:44PM
औरंगाबाद : प्रतिनिधी

येथील हेडगेवार रुग्णालयात दोन वर्षीय बालक यश हा उपचारादरम्यान ब्रेन डेड झाला होता, काल गुरूवारी रात्री यशचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. त्याला ३१ जानेवारी रोजी महापालिकेच्या रुग्णालयात रूबेला लस देण्यात आली होती. त्‍यानंतर त्‍याला त्रास होऊ लागल्‍याने त्‍याला उपचारासाठी हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

याविषयी अधिक माहिती अशी की,  दोन वर्षीय बालक यशला रूबेला लस देण्यात आली होती. यानंतर त्‍याला त्रास होत असल्‍याने उपचारासाठी  हेडगेवार रूग्‍णालयात दाखल केले होते. दरम्‍यान गुरुवारी रात्री उपचारादरम्यान तो ब्रेन डेड झाला होता. रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास तो मृत झाला होता, मात्र रात्री ११:३० वाजता त्‍याला मृत घोषीत करण्यात आले. 

या प्रकारानंतर लस दिल्‍यामुळेच माझा मुलगा ब्रेन डेड झाला आहे, असा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे. पंरतु, त्याचा लसीकरणाशी संबंध आहे किंवा नाही हे योग्य तापासानंतरच कळू शकेल, असे रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अश्विनीकुमार तुपकरी यांनी सांगितले. या प्रकारामुळे रुग्णालयात काही वेळ गोंधळाची स्थिती होती.

दरम्‍यान, यशचे काका अविनाश भातपुते यांनी हेडगेवार रूग्‍णालयातील डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळेच यशचा मृत्‍यू झाला असल्‍याचा आरोप केला आहे. गोवर रूबेला लसीकरणानंतर बाळाची तब्‍येत बिघडली. त्‍यामुळे बाळाचे शवविच्‍छेदन करताना त्रिसदस्यीय समितीच्या उपस्‍थित शवविच्‍छेदन करावे अशी मागणी केली आहे. तसेच जवाहरनगर येथील पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून, डॉक्‍टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.