Thu, Jul 09, 2020 23:37होमपेज › Aurangabad › पोलिसांवर हल्ला करून दोन कैद्यांचे पलायन

पोलिसांवर हल्ला करून दोन कैद्यांचे पलायन

Published On: Apr 23 2018 12:53PM | Last Updated: Apr 23 2018 12:53PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

उपचारासाठी घाटीतील वॉर्ड क्र. 10 मध्ये दाखल केलेल्या दोन कैद्यांनी हवालदारावर जीवघेणा हल्ला करून पलायन केले. दरम्यान, यातील एकाला जमावाच्या मदतीने पकडण्यात आले असून, दुसरा कैदी पसार झाला आहे. हा प्रकार सोमवारी सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास घडला. आरोपींच्या हल्ल्यात हवालदार योगेश जोशी (नेमणूक मुख्यालय) जखमी झाले असून, त्यांच्यावर घाटी येथील रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत.

अक्षय आठवले (रा. बीड) आणि सोनू दिलीप वाघमारे (रा. राजूनगर, रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाखाली) अशी कैद्यांची नावे असून, यातील आठवले फरार झाला तर वाघमारेला जमावाच्या मदतीने पकडण्यात आले. 

घटनेबाबत बेगमपुरा ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मुख्यालयातील हवालदार योगेश जोशी आणि बबन जाधव हे दोघे घाटीतील वॉर्ड क्र. 10 येथे कर्तव्यावर होते. या वॉर्डात हर्सूल कारागृहातील आजारी कैद्यांवर उपचार करण्यात येतात. त्यात मोक्‍कांतर्गत अटकेत असलेला अक्षय आठवले आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यात एक वर्षाची शिक्षा सुनावलेला कैदी सोनू वाघमारे  या दोघांनाही उपचारासाठी घाटीत आणले होते. सोमवारी सकाळी त्यांनी पाणी मागितल्‍यानंतर हवालदार जोशी हे पाण्याची बाटली देण्यासाठी गेले असता आरोपी आठवले आणि वाघमारे यांनी जोशी यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर दोघे तेथून पसार झाले. हा प्रकार लक्षात येताच हवालदार बबन जाधव यांनी जमावाच्या मदतीने सोनू वाघामारे याला पकडले. मात्र, कुख्यात गुन्हेगार अक्षय आठवले पसार झाला. हवालदार जोशी यांच्यावर उपचार सुरू असल्याने अद्याप या प्रकरणी बेगमपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. 

फरार कैदी कुख्यात गुंड
अक्षय आठवले हा मुळचा बीडचा असून, त्याला मोक्‍कांतर्गत हर्सूल कारागृहात ठेवण्यात आले होते. त्याच्यावर बीड जिल्ह्यात विविध गुन्हे असून मोंढा भागातील बिअरबारमधील वेटरवर छर्‍याच्या बंदुकीतून त्याने गोळीबार केला होता. तो कुख्यात गुंड असून यापूर्वी त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत. 

सोनू वाघमारेला एक वर्षांची शिक्षा
सोनू वाघमारे याला रेल्वे पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्याला रेल्वे पोलिसांच्या न्यायालयाने एक वर्षांची शिक्षा सुनावली असून तो हर्सूल कारागृहात शिक्षा भोगत होता. दरम्यान, त्याला आजारपणामुळे घाटीत दाखल करण्यात आले होते.