Wed, Jul 08, 2020 15:38होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : त्यांना घराजवळच मृत्यूने गाठले!

औरंगाबाद : त्यांना घराजवळच मृत्यूने गाठले!

Published On: Feb 21 2018 1:46AM | Last Updated: Feb 21 2018 1:46AMऔरंगाबाद : प्रतिनिधी 

भरधाव वेगाने येणारी कार जालना रोडवरील रामनगर कमानीजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर धडकली. या भीषण अपघातात दोन डॉक्टर मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडला. 

विशेष म्हणजे जालन्याला जाऊन मित्राला भेटून परत येताना अगदी घराजवळच त्यांना मृत्यूने गाठले. डॉ. लक्ष्मीकांत दगडिया (25, रा. रामनगर, मुकुंदवाडी परिसर) व गोविंदकुमार सतनामसिंग (25, रा. मुकुंदवाडी, मूळ हरियाणा) अशी या अपघातात मरण पावलेल्या डॉक्टरांची नावे आहेत. तर जखमीमध्ये अरविंद रमेश पवार (27, रा. म्हाडा कॉलनी) याचा समावेश आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, डॉक्टर लक्ष्मीकांत, गोविंदकुमार व अरविंद हे तिघेही जिवलग मित्र होते. तिघांनीही सोबतच वैद्यकीय शिक्षण घेतलेले आहे. सोमवारी त्यांचा जालना येथे राहणार्‍या एका मित्राकडे कार्यक्रम होता. त्यासाठी हे तिघेही सोमवारी दुपारी मुकुंदवाडीतील सावंगीकर रुग्णालयाच्या मालकाची कार (एमएच -20- डीव्ही 4932) घेऊन जालना येथे गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर रात्री उशिरा तिघे कारने परतीच्या प्रवासाला निघाले. शहरात पोहचेपर्यंत त्यांना पहाटेचे अडीच वाजले होते. जालन्यावरून जाऊन तिघेही सुखरूप अगदी घराजवळ पोहचले होते. मात्र, घरी पोहचण्याच्या आतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. 

जालना रोडवरील रामनगर कमानीच्या थोडे अलीकडेच रस्त्याच्या कडेला एक झाड आहे. अचानक कारवरील ताबा सुटला अन् कार त्या झाडावर जाऊन धडकली. या कारचा वेग इतका जास्त होता की धडकेनंतर तिचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. कारची चाके निखळून दूरवर जाऊन पडली आणि तिघे मित्र गंभीर जखमी झाले. हा आवाज ऐकून आसपासचे नागरिक धावत आले. घटनेची माहिती मिळताच मुकुंदवाडी ठाण्याचे पोलिसही तेथे पोहचले. मग पोलिसांनी    नागरिकांच्या मदतीने तिघांना कारमधून बाहेर काले. तातडीने घाटीत आणले; परंतु तोपर्यंत लक्ष्मीकांत व गोविंदकुमार या दोघांचा मृत्यू झालेला होता. तर अरविंद पवार गंभीर जखमी झाले होते. नंतर त्यांना अधिक उपचारसाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक संजय बनसोड व हवालदार अण्णासाहेब शिरसाट हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. 

दोघांचा एप्रिलमध्ये होता विवाह
डॉ. लक्ष्मीकांत, गोविंदकुमार व अरविंद या तिघांचे सोबत शिक्षण झालेले आहे. गोविंदकुमारचे वडील औरंगाबादेत लष्करात अधिकारी होते. ते निवृत्त झाल्यानंतर गोविंदकुमार औरंगाबादेतच वास्तव्यास होता. तो आणि लक्ष्मीकांत सोबतच फुलंब्री येथील एका खासगी रुग्णालयात प्रॉक्टिस करीत होते. तर अरविंद हे मुकुंदवाडीतील सावंगीकर रुग्णालयात प्रॉक्टिस करीत होते. विशेष म्हणजे तिघेही मित्र अविवाहित होते. गोविंदकुमार व लक्ष्मीकांत या दोघांचाही नुकताच विवाह जमलेला होता. एप्रिल महिन्यात त्यांचे विवाह होते, असे नातेवाइकांनी सांगितले.

झाडाने पुन्हा घेतला दोघांचा बळी
औरंगाबाद-जालना रोडवर रामनगर कमानीसमोर दोन झाडे आहेत, एक वडाचे व दुसरे गुलमोहोराचे आहे. वडाचे अगदी वळणावर तर गुलमोहोराचे नाल्यावर आहे. आतापर्यंत या दोन्ही झाडांना धडकून अनेक जणांनी जीव गमावला आहे. रात्रीच्या वेळी इतर झाडांपेक्षा गुलमोहोराचे झाड हे रस्त्यावर थोडे पुढे आलेले आहे. त्यामुळे जालन्याकडून येणार्‍या वाहनधारकांना रात्रीच्या वेळी या झाडाचा अंदाज न आल्यास वाहन त्यावर धडकते. आतापर्यंत जो कोणी या दोन झाडांवर धडकला तो वाचला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.