Tue, Jul 14, 2020 06:54होमपेज › Aurangabad › पैठणमध्ये रंगणार चौरंगी लढत

पैठणमध्ये रंगणार चौरंगी लढत

Published On: Sep 20 2019 1:42AM | Last Updated: Sep 19 2019 7:44PM
दादासाहेब गलांडे

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या पैठण विधानसभा मतदार संघात यावेळी सेनेसह राष्ट्रवादी, अपक्ष आणि वंचित आघाडी यांच्यात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. सेना सोडून सर्वच प्रमुख पक्षांत या मतदार संघातून अनेक जण इच्छुक असले, तरी पक्षश्रेष्ठी उमेदवारी  कुणाला देतील, हे तर काळच ठरविणार आहे.

येत्या ऑक्टोबरमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे आतापासून सर्वच पक्षांच्या इच्छुकांनी जनतेच्या भेटीवर भर दिल्याचे दिसून येत आहे. विद्यमान आ. संदिपान भुमरे गेल्या 25 वर्षांपासून या मतदार संघाचे नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे त्यांची  शिवसैनिक व तळागाळातील जनतेशी नाळ जुळलेली आहे. मात्र, शिवसेनेत अनेक पक्षांतून आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमुळेे निष्ठावंत शिवसैनिक त्यांच्यावर नाराज दिसून येत आहेत. यामुळे भुमरे यांना त्याचा फटका बसतो की काय, अशी चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे.

राष्ट्रवादीकडून माजी आ. संजय वाघचौरे यांच्यासह आप्पासाहेब निर्मळ, डॉ. धोंडिराम पुजारी, अनिता वानखेडे हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र, यातील कुणाला तिकीट मिळते, हे तर काळच ठरवणार आहे. याशिवाय भाजपकडून माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, कल्याण गायकवाड, तालुकाध्यक्ष तुषार शिसोदे, डॉ. सुनील शिंदे, कांचनकुमार चाटे हे इच्छुक आहेत. काँग्रेसकडून माजी मंत्री तथा जिल्हाध्यक्ष अनिल पटेल, विनोद तांबे यांची नावे आघाडीवर आहेत. शिवसेनेसोबत युती न झाल्यास भाजपकडून तिकीट नाकारल्यास कुठल्याही परिस्थितीत अपक्ष म्हणून गोर्डे आणि गायकवाड लढणार असल्याची चर्चा मतदार संघात जोरदार सुरू आहे. या मतदार संघात ओबीसी मतदार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वंचित आघाडीकडून जिल्हा परिषद सदस्य तथा माजी समाजकल्याण सभापती विजय चव्हाण, अण्णासाहेब कोल्हे, डॉ. पंडित किल्लारीकर यांची नावे चर्चेत आहेत.

ओबीसीचे मतदान ठरणार निर्णायक

या मतदार संघात ओबीसीचे मतदान मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे उमेदवार कुठल्याही पक्षाचा असो, त्याच्या विजयासाठी ओबीसीचे मतदान निर्णायक ठरणार, यात कसलीही शंका नाही. या निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी ठरली असली, तरी अद्यापपर्यंत भाजप-शिवसेना ही निवडणूक युती करून लढणार की स्वतंत्र, याबाबत अद्यापपर्यंत कुठलाच निर्णय झाला नसल्याने दोन्ही पक्षांचे इच्छुक उमेदवार संभ्रमावस्थेत आहेत.