होमपेज › Aurangabad › महिलेच्या पर्समधून चार लाखांचे दागिने लंपास 

महिलेच्या पर्समधून चार लाखांचे दागिने लंपास 

Published On: Jan 07 2018 2:01AM | Last Updated: Jan 07 2018 12:14AM

बुकमार्क करा




वैजापूर : प्रतिनिधी

शहरातील नवीन बसस्थानकात बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या पर्समधून चार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केल्याची घटना 6 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, भरदिवसा घडलेल्या घटनकेने महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

पोलिसांच्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील रहिवासी सविता ठवाळ (59) यांच्यासह त्यांचे पती व मुलगी असे तिघे 29 डिसेंबर रोजी औरंगाबाद येथून कोपरगाव येथे वास्तव्यास असलेल्या त्यांच्या मुलाकडे गेले होते. 6 जानेवारी रोजी दुपारी औरंगाबादकडे जाण्यासाठी हे तिघे कोपरगाव-वैजापूर बसने वैजापूरकडे जाण्यासाठी निघाले. वैजापूर येथील येवला रस्त्यावरील नवीन बसस्थानकात उतरल्यानंतर त्यांनी औरंगाबादकडे जाणार्‍या बसचा शोध घेतला.

दुपारी दोन वाजता औरंगाबादकडे जाणार्‍या बसमध्ये चढत असताना चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने लंपास केले, परंतु सविता टवाळ यांना पर्सला कुणीतरी हात लावल्याचा भास झाल्याने त्यांनी पर्स उघडून बघितली असता त्यांच्यासह सुनेचे ठेवलेले दागिने लंपास झाल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी बसमधील प्रवाशांसह बसस्थानकात विचारपूस केली, परंतु त्यांना याबाबत काहीच सांगण्यात आले नाही. चोरी गेलेल्या सोन्यामध्ये साडेतीन तोळ्याचे दोन गंठण, राणीहार, लॉकेट, नेकलेस, अंगठी, चेन व रोख 51 हजार हजार असा एकूण तीन लाख 92 हजार रुपये किमतीच्या ऐवजाचा समावेश आहे.

दरम्यान, याप्रकरणी सविता ठवाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी महिला प्रवाशांना लक्ष्य करून दागिने लंपास करण्याचा सपाटा लावला आहे. यापूर्वीही बसस्थानक परिसरातून सोन्याचे दागिने लंपास करण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. आतापर्यंत बसस्थानकात घडलेल्या सोन्याच्या चोरीच्या घटनेत ही सर्वात मोठी घटना आहे. त्यामुळे या घटनेतील चोरट्यांचा शोध लावणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे. विशेष म्हणजे भरदिवसा ही घटना घडल्याने महिला प्रवाशांसह स्थानिक महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.