Sat, Jul 11, 2020 21:07होमपेज › Aurangabad › फेसबुकवर जुळले, समोरासमोर फिस्कटले : हातकडीपेक्षा ‘लग्‍नाची बेडी’ बरी!

फेसबुकवर जुळले, समोरासमोर फिस्कटले : हातकडीपेक्षा ‘लग्‍नाची बेडी’ बरी!

Published On: May 04 2018 1:54AM | Last Updated: May 03 2018 9:04PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

फेसबुकवर चॅटिंगमधून फुललेले प्रेम समोरासमोर आल्यावर एकमेकांचे खरे चेहरे, वयातील अंतर पाहून फिस्कटले. त्याने नकार देताच तिने थेट बलात्कार केल्याचीच फिर्याद दिली. मग काय? पोलिसांच्या हातकडीपेक्षा ‘लग्‍नाची बेडी’ बरी असा विचार करून तरुणाने अखेर लग्‍नाला तयारी दर्शविली. त्यानंतर गैरसमजुतीतून तक्रार नोंदविल्याचा जबाब तरुणीने दिला अन् हे प्रकरण मिटले!

या आगळ्यावेगळ्या प्रेमकथेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठल (२४, रा. वैजापूर) हा ट्रकवर क्‍लिनर म्हणून काम करतो. तर ती तरुणी नव्हे ३६ वर्षीय महिला औरंगाबाद शहरात राहते आणि टेलरिंगचे काम करते. मोबाइलच्या एका मिस्ड कॉलमुळे त्यांच्यात ओळख झाली. नंतर दोघांनी वॉट्सअ‍ॅप आणि सोशल मीडियावरून चॅटिंग सुरू केली. विशेष म्हणजे या तरुणाने बढाया मारत आपण बडोदा बँकेत नोकरी करीत असल्याची थाप मारून तिला प्रभावीत केले. तर, तिनेही टेलरिंगचे काम करीत असल्याचे सांगण्याऐवजी नोकरी करीत असल्याची थाप मारली. मग या दोघांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले; परंतु हे प्रेम सोशल मीडियावरच सुरू होते. ते चांगलेच फुलत गेले. अखेर दोघांनी भेटायचे ठरविले. १५ एप्रिल रोजी विठ्ठल ठरल्याप्रमाणे औरंगाबादेत आला. ती महिला आधीपासून मध्यवर्ती बसस्थानकावर त्याची वाट पाहात उभी होती. जेव्हा विठ्ठलने तिला पाहिले तेव्हा त्याला धक्‍काच बसला. कारण जो चेहरा, वय त्याने सोशल मीडियावर पाहिले होते, त्याच्या अगदी विरुद्धच होते. बसस्थानकावर भेट झाल्यावर तिच्या आग्रहास्तव तो सिद्धार्थ उद्यानात तिच्यासोबत गेला. तेथून ते लॉजवर गेले. काही वेळ तेथे गप्पा मारल्यानंतर दोघे आपापल्या घरी निघून गेले. दरम्यान, वास्तव समोर आल्यानंतर विठ्ठलने तिला टाळण्यास सुरुवात केली. ते लक्षात येताच या महिलेने २८ एप्रिल रोजी सिटी चौक ठाणे गाठले आणि बलात्काराची फिर्याद दिली होती. त्यावरून गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपी विठ्ठलला बोलावून घेत त्याचा जबाब नोंदविला. त्यानंतर फिर्यादी आणि आरोपींचे बोलणे झाले. आता गुन्हा दाखल झाला, बदनामी होणार, हातकडी पडणार, हे विठ्ठलच्या लक्षात आले. बदनामी, हातकडीपेक्षा लग्नाची बेडी परवडली असा विचार करीत अखेर त्याने तिच्यासोबत लग्‍नाची तयारी दर्शवली. मग तिनेही लग्न करणार असशील तर फिर्याद वापस घेते, असे सांगितले. मग दोघांनी पोलिसांची भेट घेतली. अखेर महिलेने पोलिसांना जबाब लिहून दिला असून गैरसमजुतीतून हा प्रकार घडल्याचे तिने म्हटले आहे. लवकरच दोघे लग्‍न करतील, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्‍त गोवर्धन कोळेकर यांनी दिली. 

वयाच्या फरकामुळे दिला होता नकार

फेसबुकवर चॅटिंग करताना विठ्ठलने तिचा पाहिलेला फोटो, तिचे वय आणि प्रत्यक्षात पाहिल्यानंतर समोर आलेले वास्तव बरेच वेगळे होते. तो २४ चा आणि ती ३६ वर्षांची होती. या वयाच्या अंतरामुळेन विठ्ठलने लग्नास नकार दिला होता. त्यातच तरुणीने थेट बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यामुळे अखेर पोलिसांच्या हातकडीपेक्षा लग्‍नाची बेडी बरी असा विचार करून त्याने लग्‍नास तयारी दर्शविली.