Wed, Jul 08, 2020 03:38होमपेज › Aurangabad › अधिकारी, व्हीआयपींची ‘स्पा’ला असायची हजेरी!

अधिकारी, व्हीआयपींची ‘स्पा’ला असायची हजेरी!

Published On: Dec 10 2017 1:18AM | Last Updated: Dec 10 2017 1:18AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

प्रोझोन मॉलमधील ‘अनंतरा आणि दी स्ट्रेस हब’ या दोन्ही स्पामध्ये शहरातील अनेक वरिष्ठ पोलिस आणि अन्य विभागांच्या अधिकार्‍यांबरोबरच अनेक व्हीआयपी सतत हजेरी लावत होते. या व्हीआयपींमुळेच तीन वर्षे राजरोसपणे या आंतरराष्ट्रीय देहविक्रीच्या गोरखधंद्याला अभय मिळत गेले, असे सूत्राने सांगितले. 

प्रोझोनमध्ये गेल्या तीन वर्षांपासून हे दोन्ही ‘स्पा’चालू आहेत आणि ‘स्पा’च्या नावाखाली सुरू असलेले देहविक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेटही तेव्हापासूनच सुरू आहे. विशेष म्हणजे प्रोझोन व्यवस्थापनाच्या कार्यालयाला खेटूनच हा गोरखधंदा सुरू होता. याबाबत अनेकदा पोलिसांकडे तक्रारीही आतापर्यंत गेल्या होत्या. मात्र, कोणतीही कारवाई होत नव्हती. विशेष म्हणजे या ‘स्पा’च्या बाजूलाच बसणार्‍या प्रोझोन मॉल व्यवस्थापनाला याची कुणकुण कशी लागली नाही, याबाबतही आता संशय व्यक्‍त केला जात आहे. 

मॉल व्यवस्थापनानेही दडविली माहिती
विशेष म्हणजे एखाद्या संस्थेत विदेशी कामगार काम करीत असतील, तर त्याची माहिती नजीकच्या पोलिस ठाण्यात देणे बंधनकारक असते. गेल्या तीन वर्षांपासून प्रोझोन व्यवस्थापनाच्या समोरच या दोन्ही ‘स्पा’मध्ये विदेशी तरुणी येऊन काम करीत होत्या. प्रोझोन व्यवस्थापनाने मात्र कधीही या तरुणींबाबत पोलिसांना माहिती कळविली नाही की त्या ‘स्पा’चालकांना याचा जाब विचारला, त्यामुळे व्यवस्थापनही संशयाच्या भोवर्‍यात सापडलेले आहे. विशेष म्हणजे या ‘स्पा’चा मालक कोण? हे शोधण्यासाठी पोलिसांना अडीच दिवस लागले. वास्तविक पाहता प्रोझोन मॉलच्या रेकॉर्डला याची संपूर्ण माहिती होती. तरीही अडीच दिवस का लागावेत? हेही संशयास्पदच आहे. या प्रकरणात प्रोझोन व्यवस्थापनाचीही गरज पडल्यास चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्‍त डॉ. दीपाली धाटे-घाडगेे यांनी कालच स्पष्ट केलेले आहे, हे विशेष. 

प्रोझोनच्या विश्‍वासार्हतेला तडा
प्रोझोन मॉल हा एक तर मराठवाड्यातील सर्वांत मोठा आणि नामांकित मॉल आहे. येथे दूरदूरहून नागरिक कुटुंबासह खरेदी, मनोरंजनासाठी येतात. अनेक जण तर या दोन्ही ‘स्पा’मध्ये कुटुंबासमवेत हेअर कटिंग, मेकअपसाठी जात होते. आपण ज्या ‘स्पा’मध्ये कुटुंबासमवेत येतो, तेथे पडद्याआड काय चालते, याची अनेकांना कल्पनाच नव्हती. गुरुवारी उघडकीस आलेल्या या गोरखधंद्यामुळे प्रोझोन मॉलच्याच विश्‍वासार्हतेला तडा गेला आहे.