Wed, Jul 08, 2020 08:50होमपेज › Aurangabad › शाळेचा दुसरा मजला कोसळला; 5 विद्यार्थी गंभीर जखमी 

शाळेचा दुसरा मजला कोसळला; 5 विद्यार्थी गंभीर जखमी 

Published On: Jul 03 2018 6:57PM | Last Updated: Jul 03 2018 6:57PMपरभणी : प्रतिनिधी

शाळा सुरु असताना इमारतीच्या दुसरा मजल्यावर केलेले बांधकाम व शेडचा भाग कोसळून 5 विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी रोजी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास परभणीत घडली. शहरातील पाथरी रोडवर असलेल्या नोमानिया कॅम्पसमध्ये झालेल्या दुर्घटनेतील जखमी विद्यार्थ्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

पाथरी रोडवरील नोमानिया कॅम्पसमध्ये अलफला इंटरनॅशनल इस्लामिक स्कुल, नोमानिया उर्दू प्राथमिक स्कुल, अरबी नोमानिया मुलींचे हायस्कुल या तीन शाळा आहेत. यापैकी रोडलगतच असलेल्या एका शाळेच्या इमारतीवर दुसरा मजला बांधण्यात आला आहे. नव्याने केलेले बांधकाम कच्चे असून त्यावर पत्र्याचे शेड टाकण्यात आले होते. बांधकाम कच्चे असल्याने व त्यावर पत्रे उभारले असल्याने जोराच्या वार्‍याने सदरील शेडसह मागच्या बाजूच्या भिंती दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास कोसळल्या. यावेळी शाळेच्या मागच्या बाजूस असलेल्या गार्डनमध्ये शाळेतील विद्यार्थी खेळत होते. हवेने भिंत कोसळल्याचा आवाज ऐकून विद्यार्थ्यांनी पळ काढला. परंतु हारा रईस खान, बुशरा बेगम महम्मद अली, तमन्‍ना अब्दुल वाहेद, रेशमा सय्यद, सानिया बेगम हे या विद्यार्थ्यांच्या हाताला, पायाला व डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाले आहेत. 

सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान माहिती मिळताच पालकांनी रुग्णालयात धाव घेतली. शाळा व्यवस्थापनाच्या गलथान कारभारामुळे सदरील घटना घडली असून दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्‍त करण्यात येत आहे. शाळेतील कर्मचारी आणि व्यवस्थापना विरोधात आक्रोश करण्यात येत होता. शासकीय रुग्णालयात प्रथमोपचार करुन त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे. घटनेची नोंद करुन या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया मंगळवारी संध्याकाळी सुरु होती.