Thu, Jul 02, 2020 12:27होमपेज › Aurangabad › बाबरी पाडायला गेले होते, मंदिर बांधायलाही जाणार

बाबरी पाडायला गेले होते, मंदिर बांधायलाही जाणार

Published On: Feb 19 2018 1:24AM | Last Updated: Feb 19 2018 1:24AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

राम मंदिर निर्माण ही जनसामान्यांची भावना आहे. त्यामुळे अयोध्येत निश्‍चितपणे राम मंदिर बांधले जाईल. त्याविषयी कुणीही शंका घेऊ नये. मी स्वतः बाबरी मशीद पाडायला गेले होते, आता राम मंदिर बांधायलाही जाईल, असे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर रविवारी म्हणाल्या.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात अटक झालेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची मागील वर्षीच कारागृहातून सुटका झाली. मात्र आजारी असल्याने तेव्हापासून त्या सार्वजनिक जीवनातून दूर आहेत. जनूभाऊ रानडे स्मृती दिनानिमित्त सोमवारी आयोजित व्याख्यानासाठी त्या आज रविवारी शहरात आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेसने षड्यंत्र रचून मला तुरुंगात टाकलं. तिथे आपला खूप छळ झाला. आजारी पडल्यानंतर नीट उपचारही मिळाले नाहीत. मागील सहा महिन्यांत माझ्यावर कॅन्सरच्या शस्त्रक्रियेसह दोन शस्त्रक्रिया झाल्या. अजूनही उपचार संपलेले नाहीत, असेही त्या म्हणाल्या. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रभक्त असून ते चांगले आणि वेगळे काम करीत आहेत, असेही एका प्रश्‍नाच्या उत्तरात त्या म्हणाल्या. भगवा आंतकवाद हा शब्दप्रयोग काही वर्षांपासून केला जातो आहे, परंतु भगवा हा त्यागाचा रंग आहे. निधर्मीवाद्यांसाठी तो आंतकवाद आहे. त्यांची ती मानसिकता आहे, असेही त्यांनी म्हटले.

...तर राजकारणाचा विचार
साध्वी प्रज्ञासिंह यांना तुमचा मार्ग सत्ताकारणाकडे जातोय का असा प्रश्‍न विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या, मी विद्यार्थी चळवळीत होते. मी नेते घडविले, पण मी साध्वी आहे. मी माझे कर्तव्य पार पाडत आहे. देशहितासाठी स्वतःला झोकून दिले आहे. देशहितासाठी गरज वाटली आणि जबाबदारी टाकण्यात आली तर कोणतेही कर्तव्य पार पाडण्यास मी तयार आहे, पण राजकारणाचे म्हणाल तर सध्या तरी त्याचा विचार केलेला नाही, असेही प्रज्ञासिंह म्हणाल्या. 

देशात एकच मॅडम
प्रश्‍नोत्तरादरम्यान पत्रकारांनी साध्वी प्रज्ञासिंह यांना मॅडम असे संबोधिले. त्यावर त्यांनी मी मॅडम नाही. मी साध्वी आहे. मला माता म्हणा, साध्वीजी म्हणा, कारण देशात एकच मॅडम आहे. ती विदेशातून आलेली आहे, अशा शब्दात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यावर टीका केली.