Sat, Jun 06, 2020 17:11होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : कन्नड तालुक्यात पाऊस, खडकी, अंजना नदीला पूर  

औरंगाबाद : कन्नड तालुक्यात पाऊस, खडकी, अंजना नदीला पूर  

Published On: Sep 18 2019 2:29PM | Last Updated: Sep 18 2019 1:33PM

पावसाने खडकी व अंजना नदीला आला पूर  कन्नड : प्रतिनिधी

तालुक्यातील सर्वच भागात कमी -अधिक प्रमाणात मध्यरात्रीपासून पाऊस बरसत आहे. करजंखेड, चिंचोली, पिशोर मंडळात जोरदार पाऊस झाल्याने खडकी व अंजना नदीला पूर आला आहे. 

तालुक्यात आतापर्यंत फक्त पिकांना पुरेसा इतकाच पाऊस झाला असून पावसाळ्यातील सप्टेंबर महिना अर्धा उलटला तरी सुध्दा तालुक्यातील मध्यम प्रकल्प, धरणे, पाझर तलाव मृत साठयात आहेत. यामुळे रब्बी हंगाम व पुढील काळात पिण्याच्या पाण्याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. मात्र, पितृपक्षात उतारा नक्षत्रात होत असलेल्या पावसाने शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवित झाल्या आहे. तालुक्यातील करंजखेड, चिंचोली, पिशोर या महसूल मंडळात जोरदार पाऊस झाला असल्याने खडकी नदी व नाल्यांना पाणी आले. तसेच या जोरदार पावसाने अंजना नदीला पूर आला. हे पावसाचे पाणी पुढे अंजना पळशी प्रकल्पात पाणी जमा झाले आहे. 

तालुक्यात गेल्या सहा ते सात वर्षानंतर उतारा नक्षत्रात प्रथमच असा पाऊस झाला आहे. तर या नक्षत्रात पाऊस न पडता कडक ऊन पडते. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. हा पाऊस खरीप हंगामासह रब्बी हंगमासाठी उपयुक्त ठरला आहे. तर उतारात पडणाऱ्या पावसाचे पाणी शेतकरी साठवून ठेवून त्याची पिकांवर परत फवारणी करतात, अशी माहिती तालुक्यातील काही जाणकार शेतकऱ्यांनी दिली आहे.

तालुक्यातील सर्वांत मोठा शिवना टाकळी मध्यम प्रकल्प अजूनही मृत साठयात आहे. कन्नड शहर, सुरपळया डोंगर, गौतळा अभयारण्य या परिसरात जोरदार पाऊस झाला तरच या भागातील उगम असलेली शिवना, ब्राम्हणी, गांधारी या नद्यांना पूर येईल. यामुळे शिवना प्रकल्पात पाणीसाठा होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कै. आप्पासाहेब नागदकर (अंबाडी) प्रकल्पात मृतसाठा असून त्याच्यावरील भागात जोरदार पावसाची आवश्यकता आहे. 

तालुक्यात आज मंडळ निहाय झालेला पाऊस 

कन्नड : ३२ मिमी, आतापर्यंत एकूण ५८६ मिमी

चापानेर :  ०० मिमी, आतापर्यंत एकूण ५०२ मिमी 

देवगाव : १३ मिमी, आतापर्यंत एकूण  ४३१ मिमी

चिखलठाण : ३६ मिमी, आतापर्यंत एकूण ४४७ मिमी

पिशोर  : २५ मिमी, आतापर्यंत एकूण ४४९ मिमी 

नाचनवेल : १४ मिमी, आतापर्यंत एकूण ४२४ मिमी

करजंखेडा : ६६ मिमी, आतापर्यंत एकूण  ५९७ मिमी

चिंचोली  : ७१ मिमी, आतापर्यंत एकूण ६५९ मिमी 

१८ रोजी पडलेला पाऊस ३२.१२ मिमी.

सर्व मंडळातील एकूण सरासरी पाऊस २५७ मिमी.

आतापर्यंत एकूण सर्व मंडळातील पाऊस ४०९५ मिमी

एकूण सरासरी आतापर्यंतचा पाऊस ५११.८७ मिमी