Tue, Jul 07, 2020 17:04होमपेज › Aurangabad › पारनेरच्या दुखण्यावर पवार करणार ‘इलाज’

पारनेरच्या दुखण्यावर पवार करणार ‘इलाज’

Published On: Nov 23 2018 1:18AM | Last Updated: Nov 22 2018 11:48PMपारनेर : प्रतिनिधी  

राष्ट्रवादी काँग्रेसला जडलेल्या जुळ्याच्या दुखण्यावर इलाज करण्यासाठी खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच पुढाकार घेतला असून, येत्या 26 नोहेंबर त्यांनी रोजी दोन्ही गटांची पुण्यात एकत्रित बैठक बोलविली आहे. 

जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे व त्यांच्या समर्थकांनी बुधवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीनंतर पवार यांनी पक्षातील वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेतला असून पक्षातील वाद पक्षातच मिटले पाहिजेत ते चव्हाट्यावर आणणे दोन्ही गटांनी थांबवण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या. पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसंतर्गत दोन गट असून त्यांच्यात नेहमीच सुप्त संघर्ष सुरू असतो. बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्यावर अविश्‍वास आणण्यात आल्यानंतर हा संघर्ष अधिकच तीव्र झाला. त्यात काही झावरे समर्थकही सामील झाले. पक्षातील हा संघर्ष चव्हाट्यावर आलेला असतानाच तालुकाध्यक्षपदी झावरे विरोधी गटाने बाबाजी तरटे यांची वर्णी लावून घेत झावरे समर्थकांच्या जखमेवर मीठ चोळले. 

त्यानंतर युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी झावरे गटाने अशोक रोहोकले यांची तर कार्याध्यक्षपदी योगेश रोकडे यांची नियुक्ती करून घेतली. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नियुक्तीची पत्रे देऊन झावरे गटाने विरोधी गटावर पलटवार केला. त्यानंतर विरोधी गटाने शांत न बसताना युवकच्या तालुकाध्यक्ष पदावर विक्रम कळमकर यांची नियुक्ती जाहिर केली. जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके,ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांच्या मध्यस्थीने ही नियुक्ती करण्यात आली. 

पक्षातील ही सुंदोपसुंदी पक्षाध्यक्ष पवार यांच्या कानावर होतीच. त्यांची भेट घेण्यास गेलेल्या झावरे समर्थकांना त्यांनी काही गोष्टी सुनावत दोन्ही गटांनी मतभेद विसरून एकत्र येण्याच्या सूचना दिल्या. मागील निवडणुकीत अपक्ष उमेदवारी केलेले माधवराव लामखडे यांनीही यावेळी पक्षासोबत राहण्याची ग्वाही दिली आहे. झावरे व लामखडे यांच्या मतांची बेरीज केली तर पक्षाचा उमेदवार मतदार  संघात सहज विजयी होऊ शकतो याचीही पवार यांनी जाणीव करून दिली. दोन्ही गटांची येत्या सोमवारी बैठक बोलविण्यात आली आहे.

  या बैठकीस शरद पवार यांंच्यासह निरीक्षक दिलीप वळसे, दादाभाऊ कळमकर, सुजित झावरे, उदय शेळके, मधुकर उचाळे, प्रशांत गायकवाड हे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.