Tue, Aug 11, 2020 21:26होमपेज › Aurangabad › मुलाच्या मृतदेहाशेजारी आई तीन दिवस बसून 

मुलाच्या मृतदेहाशेजारी आई तीन दिवस बसून 

Published On: May 22 2018 1:24AM | Last Updated: May 22 2018 12:49AMपडेगाव : प्रतिनीधी

अज्ञात कारणाने मुलाचा मृत्यू झाला. मनोरुग्ण असलेल्या वृद्ध आईला आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याची कल्पनाही आली नाही. पडेगाव येथील गणेश नगरातील घरात ती तब्बल तीन दिवस मृतदेहाजवळ राहिली. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शेजार्‍याचा मुलगा त्यांना भाकरी देण्यासाठी गेल्यावर ही घटना उघडकीस आली.

मूळ जुना बाजार बुढीलेन येथील शालिग्राम तुळशीराम बाखरे (वय 50) हे पडेगाव येथील पावर हाऊस मागील गणेश नगरात 20 वर्षांपासून राहात होते. 20 बाय 30 चा प्लॉटवर बांधलेल्या घरात मनोरुग्ण असलेल्या आईसोबत राहून ते मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. तीन दिवसांपूर्वी घरातच अज्ञात कारणाने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मनोरुग्ण असलेल्या आई देवकाबाई तुलशीराम बाखरे (90) यांना मुलाचा मृत्यू झाल्याचे कळले नाही. त्या तीन दिवसांपासून मृतदेहाशेजारीच पडून होत्या. सोमवारी सकाळी शेजार्‍याचा मुलगा त्यांना भाकरी घेऊन गेला असता ही घटना उघडकीस आली.

या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. घराचा दरवाजा उघडाच होता. घरात मृतदेह सडल्याने दुर्गंधी होती. औरंगाबाद कंट्रोलरूम व छावणी पोलिसांना माहिती मिळताच छावणी ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद घोडके, बिट जमादार कुर्‍हाडे, कॉन्स्टेबल जे. आर. बडगुजर, बी. ई. मडावी, टू मोबाईल कर्मचारी एएसआय शेख बाबर, शेख ईस्माईल, डी. आर. टाकळकर, बी. के. मिर्झा, मदतनीस पप्पू मिर्झा यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.