Sat, Aug 08, 2020 03:24होमपेज › Aurangabad › दरोडेखोरांचा धुमाकूळ; लासूर स्टेशन पुन्हा हादरले

दरोडेखोरांचा धुमाकूळ; लासूर स्टेशन पुन्हा हादरले

Published On: Feb 21 2018 1:46AM | Last Updated: Feb 21 2018 1:44AMलासूर स्टेशन : प्रतिनिधी 

पूर्वीच्या खून आणि दरोड्याच्या घटनांचा छडा लावण्यात पूर्णतः अपयशी ठरलेल्या सिल्लेगाव पोलिसांच्या नाकावर टिच्चून दरोडेखोरांनी लासूर स्टेशनमध्ये पुन्हा धुमाकूळ घातला. अडत व्यापारी विनोद जाजू यांच्या घरात घुसून मंगळवारी (दि. 20) पहाटे 2 ते 3 वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी जाजू दांपत्याला जबर मारहाण करीत 13 तोळे सोने आणि एक लाखाची रोकड असा पाच लाख 60 हजार रुपयांचा ऐवज लुटला. या दरोड्यामुळे लासूर स्टेशन पुन्हा हादरले. सोबतच सिल्लेगाव पोलिसांची कार्यशून्यताही स्पष्ट झाली. 

दरोडेखोरांच्या हल्ल्यात विनोद गुलाबचंद जाजू आणि सुषमा विनोद जाजू (दोघे रा. गणपती मंदिराजवळ, जुना मोंढा, लासूर स्टेशन) हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अडत व्यापारी विनोद जाजू रविवारी रात्री नेहमीप्रमाणे घरी आले. जेवण करून ते कुटुंबीयांसह झोपले. दरम्यान, मंगळवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास गच्चीवरून दोन चोरटे घरात घुसले. ते जाजू दांपत्याच्या शेजारी येऊन बसले. सुषमा जाजू यांना जाग येताच समोर तोंड बांधलेले दोन चोर दिसले. त्यांनी सुषमा यांना जिवे मारण्याची धमकी देत अंगावरील सर्व दागिने काढून देण्यास बजावले. त्यामुळे काहीही न बोलता त्यांनी गळ्यातील पोत, हातातील सोन्याच्या बांगड्या, अंगठी दरोडेखोरांच्या स्वाधीन केले. तितक्यात विनोद जाजू यांना जाग आली. तोच, दरोडेखोरांनी टोकदार शस्त्राने त्यांच्या कानाच्या खाली वार केला. यात ते गंभीर  जखमी झाले.  विनोद जाजू यांच्या घरावर दरोडा पडल्याची बातमी वार्‍यासारखी गावात पसरली. लगेचच नागरिकांना जुन्या सर्व घटना आठवल्या. यापूर्वी कुठे शटर उचकटून तर कुठे दुकानात घुसून चोरट्यांनी लासूर स्टेशनमध्ये दहशत निर्माण केली होती. आता घरात घुसून मारहाण करून चोरटे ऐवज लुटत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा भीती पसरली आहे. 

आरडाओरड केली तर जीव घेईन...
सुषमा जाजू यांच्या अंगावरील सोने काढून घेतल्यानंतर तेवढ्यावर दरोडेखोरांचे समाधान झाले नाही. एकाने विनोद जाजू यांना धमकावत जागेवर बसवून ठेवले तर दुसर्‍याने सुषमा जाजू यांच्याकडून कपाट, किचन व अन्य ठिकाणांची पाहणी करून एक लाख रुपये रोकड काढून घेतली. आरडाओरड केली तर जिवे मारून टाकू, अशी धमकी ते जाजू दांपत्याला देत होते.

सात दिवसांत शोध लावा...
प्रभारी पोलिस अधीक्षक उज्ज्वला वनकर यांनी लासूर स्टेशन येथील घटनास्थळाला भेट दिली. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. ‘चोरांना अटक झालीच पाहिजे, होत कशी नाही, झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत व्यापार्‍यांनीही यात सहभाग नोंदविला. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार, निरीक्षक सुभाष भुजंग, सहायक निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्यासह मोठा फौजफाटा तैनात होता. 

जबरी चोरी, दरोड्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती पसरणे सहाजिक आहे. गुन्हे उघड झाले नाहीत हे आम्ही मान्य करतो, परंतु यामुळे पोलिस काहीच करीत नाहीत असे म्हणणे योग्य नाही. नागरिकांनी पोलिसांवर विश्‍वास दाखविला पाहिजे. सर्व घटनांचा शोध सुरू आहे, असे प्रभारी पोलिस अधीक्षक उज्ज्वला वनकर यांनी सांगितले.  

भय इथले संपेना..!
लासूर स्टेशनमध्ये 25 सप्टेंबर 2017 रोजी पाटणी यांच्या घरावर दरोडा पडला. यात दरोडेखोरांच्या हल्ल्यात राजूलबाई पाटणी यांचा खून झाला होता. ही घटना ताजी असतानाच 14 नोव्हेंबर 2017 रोजी केशरचंद जाजू यांच्या घरात दरोडेखोरांनी हल्ला केला. त्यात त्यांचा खून झाला होता. याशिवाय येथे पाच महिन्यांत दरोड्याच्या चार घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे, या दोन्ही घटनांचा छडा लावण्यात ग्रामीण पोलिसांना अपयश आले