Wed, Jul 08, 2020 09:56होमपेज › Aurangabad ›   पाठलाग करून पकडली मुले पळविणारी टोळी

  पाठलाग करून पकडली मुले पळविणारी टोळी

Published On: Nov 26 2018 1:34AM | Last Updated: Nov 26 2018 1:34AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

चार वर्षीय मुलीचे अपहरण करणार्‍या चौघांच्या टोळीला सातारा आणि जिन्सी पोलिसांनी पाठलाग करून दीड तासात गजाआड केले. अटकेतील आरोपी लातूरचे आहेत. रविवारी (दि. 25) ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, मुले पळविणारीच टोळी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

अन्वर महेबूब पठाण (22), शुभम लक्ष्मण महेकले (23, दोघे रा. शास्त्रीनगर, लातूर), कार चालक हसन नूरखान शेख (22, रा. अंजलीनगर, लातूर) व संगमेश्‍वर रघुनाथ गाडे (25, रा. रमजानपूर, लातूर), अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. यातील अन्वर महेबूब  पठाण पीडित मुलीचा आजोबा व तिच्या वडिलांचा मामेसासरा आहे. या चौघांनाही अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. कर्णिक यांनी बुधवारपर्यंत (दि. 28) पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बायजीपुर्‍यातील पीडितेच्या वडिलांनी याबाबत तक्रार दिली. त्यांचा गाड्या खरेदी व विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांना दोन मुले असून 24 नोव्हेंबरला सकाळी दहाच्या सुमारास मुलीचा आजोबा अन्वर पठाण घरी आला. त्याने चार वर्षीय मुलीला खुलताबाद ऊर्साला घेऊन जातो, असे सांगून उचलून नेले. त्यानंतर तिला कार (क्र. एम. एच.03, ए. आर. 6376) मध्ये बसविले. त्याचवेळी तिथे मुलीच्या अपहरणाची फोनवरून धमकी देणारा संशयित शुभम महेकले हाही आला होता. ही बाब मुलीच्या वडिलांना समजली. त्यांना त्याचा व इतर तिघांचाही संशय आला. परंतु तोपर्यंत कारमधून तिच्या आजोबासह अन्य संशयितांनी तिला पळवून नेले.

सातारा पोलिसांनी एमआयटीजवळ अडविले

संशय आल्यामुळे अपहृत मुलीच्या वडिलांनी संशयित कारचा रेल्वेस्थानकापर्यंत पाठलाग केला. त्याचवेळी त्यांनी ही माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्षाने सर्व ठाण्याला अलर्ट देत नाकाबंदीच्या सूचना दिल्या. त्याचवेळी सातारा पोलिसांनी एमआयटी कॉलेजजवळ संशयित कारला अडविले. त्यानंतर मुलीची सुटका करीत चारही आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस उपनिरीक्षक दत्ता शेळके अधिक तपास करीत आहेत.