Tue, Jul 07, 2020 23:29होमपेज › Aurangabad › कचरा कोंडीवरून पेटले राजकारण

कचरा कोंडीवरून पेटले राजकारण

Published On: Mar 12 2018 1:03AM | Last Updated: Mar 12 2018 12:19AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मिटमिटा येथील दंडुकेशाही प्रकरणाने पोलिसांमधील राक्षसी वृत्ती समोर आली. ज्यांचा प्रकरणाशी काहीही संबंध नाही अशा लोकांना दंडुक्याने बदडून कहर केला. दुसर्‍या गावचे दोन विद्यार्थी फक्‍त त्या मार्गाने गावी जात असताना त्यांनाही लॉकअपमध्ये टाकले आहे. त्यांचा पेपर बुडाला. राक्षसी वृत्तीचा कहर म्हणजे दोन वर्षीय चिमुकल्याचे हात पिरगळून तुझे पप्पा कुठे आहे अशी विचारणा केली. तरुणी, महिला व वृद्धांनाही सोडले नाही. यापेक्षा रझाकारांची राजवट चांगली होती, अशी भावना तेथील वृद्ध नागरिकांनी आपल्याशी बोलताना व्यक्‍त केल्याचे आ. सतीश चव्हाण यांनी रविवारी(दि. 11) पत्र परिषदेत सांगितले.

आ. सतीश चव्हाण यांनी मिटमिटा येथे घडलेल्या दंडुकेशाही प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी करण्याकरिता गेले होते. यानंतर त्यांनी पत्र परिषदेत तेथील नागरिकांची आपबिती सांगितली. ते म्हणाले, बिहारमध्येही अशा घटना घडत नसाव्यात. पोलिसांनी नागरिकांच्या घरात घुसून साहित्य, वाहने फोडली. विशेष म्हणजे दगडफेकीची सुरुवात पोलिसांनीच केल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. कोंबिंग ऑपरेशनच्या नावाने पोलिसांनी मिटमिट्यात अक्षरशः हैदोस घातला. याचे सर्व व्हिडिओ शूटिंग तसेच सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे. अदित्य देशमुख व प्रद्युम्न जोशी हे दुसर्‍या गावचे विद्यार्थी त्या मार्गाने जात असताना, पोलिसांनी त्यांनाही मारहाण करीत अटक केली. त्यांचा पेपर बुडाला आहे. वीटभट्टीच्या कामावरून आलेला दीपक भावरे याचे डोके व दोन्ही पायांची हाडे मोडली. घरात जेवण करीत असलेल्या गणेश जाधव यांचे पोलिसांनी 12 हजार रुपये काढून त्यांनाही आत टाकले आहे. शशिकला जाधव य वृद्धेला मुलाला सोडविण्यासाठी गळ्यातील डोरले मागितले.  या प्रकरणाबाबत विधान परिषदेत सर्व पुराव्यानिशी प्रश्‍न उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

आदेश देणारेच करताहेत चौकशी

पोलिस आयुक्‍तांनी सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश ज्या महिला अधिकार्‍यांकडे दिले आहेत. त्यांचाच या प्रकरणात हात असल्याचा आरोप चव्हाण यांनी करून चौकशीवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण केले.

पाप सेना-भाजपचे

25 वर्षांपासून येथे सेना भाजप सत्तेत आहे. शहरातील पाणी, ड्रेनेजचे मूलभूत प्रश्‍न आम्ही सोडविले आहेत. खैरे याचे श्रेय घेतात तर कचर्‍याचे श्रेयही त्यांनी घ्यायला हवे. शहरातील कचर्‍याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी मागील वीस वषार्र्ंत जे करायला हवे होते ते केले गेले नाही. विकासाऐवजी भावनात्मक मुद्यांवरच भर दिला गेला. विकासाच्या मुद्यावरून भरकटून भावनात्मक मुद्द्यांवर राजकारण केले की असे प्रश्‍न निर्माण होणारच. खरे तर राजकारण्यांसाठी हा एक प्रकारचा धडाच आहे, अशा शब्दांत भाजप आमदार प्रशांत बंब यांनी रविवारी शिवसेनेवर नाव न घेता टीका केली. भावनात्मक विषयांवर लोकांना आणखी किती दिवस खेळवणार असा सवालही यावेळी त्यांनी केला. 

राज्य सरकारच्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्यांची माहिती देण्यासाठी भाजपच्या वतीने रविवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत आमदार प्रशांत बंब आणि जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी सरकारने केलेल्या तरतुदींची माहिती दिली. यावेळी शहरातील कचराकोंडीच्या विषयावर आमदार बंब यांनी मनपावर आणि पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर जोरदार टीका केली.
स  मनपात शिवसेना भाजप युतीची सत्ता आहे. हे मी कबूल करतो. पण सोबतच कचर्‍याच्या प्रश्‍नात मनपाने काही केले नाही हीदेखील वस्तुस्थिती आहे. अनेक प्रमुख विषयांत मनपा मागे आहे. मनपाच्या पातळीवर विकासाऐवजी भावनांचेच राजकारण केले गेले. विकासाच्या मुद्यावरून भरकटून भावनांचे राजकारण केले की असे प्रश्‍न उद्भवणारच हे जगजाहीर आहे. त्यामुळे आता तरी संबंधितांनी आत्मचिंतन करावे, लोकांना भावनात्मक विषयावर आणखी किती दिवस खेळवणार याचाही विचार करावा, असे बंब यांनी नमूद केले.