Thu, Jun 24, 2021 10:59होमपेज › Aurangabad › रेल्वेत बसण्यापूर्वीच मारले होम क्वारंटाईनचे शिक्के; औरंगाबाद स्थानकात तब्बल दोन तास गोंधळ

रेल्वेत बसण्यापूर्वीच मारले होम क्वारंटाईनचे शिक्के; औरंगाबाद स्थानकात तब्बल दोन तास गोंधळ

Last Updated: May 23 2020 7:33PM

file photoऔरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा:

रेल्वेतून उतरताना मारावयाचे होम क्वारंटाईनचे शिक्के चक्क बसण्यापूर्वीच मारण्यात आले. त्यामुळे शिक्के पाहून १३७ प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकारानंतर तब्बत दोन तास गोंधळ झाला. अखेर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी लातूर जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रवाशांची माहिती घेतल्यानंतर त्या नागरिकांना रेल्वेत बसण्यास परवानगी देण्यात आली. हा प्रकार शनिवारी दुपारी औरंगाबाद रेल्वे स्थानकात घडला. 

मराठवाड्यात अडकलेल्या हजारो परप्रांतीयांसाठी औरंगाबादेतून श्रमिक रेल्वे सोडण्यात येत आहे. आतापर्यंत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंडसाठी विशेष रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. या रेल्वेतून १५ हजारावर परप्रांतीय नागरिक कुटूंब गावाकडे रवाना झाले आहेत. बिहारसाठी देखील विशेष रेल्वे देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाने केली होती. त्यावरून गेल्या आठवड्यात रेल्वेला मंजूरी देण्यात आली. यात शु्क्रवारी पहिली रेल्वे बिहारला रवाना झाली.
लॉकडाऊनदरम्यान संपूर्ण मराठवाड्यात अडकलेल्या बिहार येथील नागरिकांना या रेल्वेतून परत गावाकडे पाठविण्यात येत आहे. आतापर्यंत अडीच हजारांहून अधिकजण बिहारला रवाना झाले असून त्यातील १४६७ प्रवासी रेल्वेने गेले आहेत. शहरातून बिहारसाठी दुसरी रेल्वे शनिवारी सोडण्यात आली. या रेल्वेने गावाकडे जाण्यासाठी मराठवाड्यातून बिहारी नागरिक शहरात दाखल झाले. यात लातूरहून आलेल्या १३७ प्रवाशांच्या हातावर बिहारला जाण्यापूर्वीच होम क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले.

दरम्यान, हे प्रवासी स्थानकात दाखल झाल्यानंतर त्यांना तिकीट देण्यास नकार देण्यात आला. त्यांच्याबाबत तातडीने जिल्हा प्रशासनाला माहिती देण्यात आली. अप्पर तहसीलदार किशोर देशमुख तातडीने दाखल झाले. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले होते. त्यामुळे स्थानकात गोंधळ सुरू झाला. ही माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना कळविण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लातूर जिल्हाधिकाऱ्यांना संपर्क साधला. अखेर प्रवाशांची यादी मिळविल्यानंतर व त्यांच्या हातावर लातुरमध्येच शिक्के मारण्यात आल्याचे कळाले. यामुळे तब्बल  दोन तासांच्या गोंधळानंतर त्या प्रवाशांसह १३८७ जण श्रमिक रेल्वेने बिहारच्या दिशेने रवाना झाले.