Sat, Jul 04, 2020 04:16होमपेज › Aurangabad › वाहनधारकांची दररोज साडेतेरा लाखांची लूट

वाहनधारकांची दररोज साडेतेरा लाखांची लूट

Published On: Jan 25 2018 1:03AM | Last Updated: Jan 24 2018 11:31PMऔरंगाबाद : संजय देशपांडे

शहरातून जाणार्‍या महामार्गावरील मद्यालये सुरू झाल्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात आलेला तीन रुपये प्रतिलिटरचा अधिभार अजूनही कायम आहे. शहरातील 35 पंपांवर दररोज साडेचार लाख लिटर इंधनाची विक्री केली जाते. त्यातून वाहनधारकांची दररोज साडेतेरा लाख रुपयांची लूट केली जात आहे. अशीच परिस्थिती मराठवाड्यात सर्वत्र आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक एप्रिल 2017 पासून महामार्गावरील मद्यालये बंद करण्यात आली होती. औरंगाबाद जिल्ह्यातील तीनशेपेक्षा जास्त मद्यालये यामुळे बंद झाली. बंदीमुळे उत्पादन शुल्काचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी इंधन विक्रीवर अधिभार लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अधिभारामुळे औरंगाबाद शहरातील इंधनांच्या किमतीत प्रतिलिटर तीन रुपयांनी वाढ करण्यात आली. महिनाभरानंतर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात दुरुस्ती केली. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, छावणी परिषद असणार्‍या गावांतून जाणार्‍या महामार्गावरील मद्यालये उघडण्यास परवानगी देण्यात आली. ग्रामपंचायतींच्या हद्दीतून जाणार्‍या महामार्गावरील मद्यालयांना मात्र कायमचे टाळे लागले. 

मद्यालये उघडल्यानंतर इंधनावरील अधिभार कमी होणे अपेक्षित होते, मात्र गेल्या सात महिन्यांपासून वाहनधारकांची सरकारी लूट सुरूच आहे. ग्रामपंचायतींच्या हद्दीतील मद्यालये बंद झाल्याने तेथील इंधन विक्रीसाठी अधिभार लावणे अपेक्षित होते, मात्र तसे न करण्यात आल्याने आजही तेथील इंधनाच्या किमती प्रतिलिटर तीन रुपयांनी कमी आहेत.

औरंगाबाद शहरात 35 पेट्रोलपंप आहेत. दररोज तीन लाख लिटर पेट्रोल आणि दीड लाख लिटर डिझेल, अशी साडेचार लाख लिटर इंधनाची शहरात विक्री होते. या इंधन विक्रीवर प्रतिलिटर तीन रुपये याप्रमाणे साडेतेरा लाख रुपयांचा डल्ला वाहनधारकांच्या खिशातून मारला जात आहे. अधिभार बंद करण्याची मागणी आम्ही वेळोवेळी केली असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे पेट्रोल-डिझेल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अखिल अब्बास यांनी सांगितले.

रस्ते विकासासाठी 2022 पर्यंत वसुली
एकात्मिक रस्ते विकास योजनेअंतर्गत रस्ते विकास महामंडळाने शहरात सात उड्डाणपूल बांधले आहेत. हा निधी महामंडळाला परत मिळावा, यासाठी इंधन विक्रीवर प्रतिलिटर दोन रुपयांचा अधिभार लावण्यात आला आहे. हा अधिभार 2022 पर्यंत राहणार आहे. मद्यालये आणि रस्त्यांचा अधिभार रद्द झाल्यास औरंगाबादकरांना प्रतिलिटर पाच रुपये कमी दराने इंधन मिळू शकेल.

शहरातून जाणार्‍या महामार्गावरील मद्यालये बंद झाल्यानंतर इंधन विक्रीवर अधिभार लावण्यात आल्याचे शासनाचे अधिकृत पत्र आमच्याकडे नाही, मात्र अधिभार सुरू असल्याचे चर्चेतूनच ऐकायला मिळते. याबाबत सध्या तरी काही सांगता येणार नाही.
- प्रदीप वाळूंजकर, अधीक्षक, उत्पादन शुल्क.