Fri, Jul 10, 2020 16:31होमपेज › Aurangabad › न्यायासाठी उद्योजक शेतकर्‍यांच्या वाटेवर

न्यायासाठी उद्योजक शेतकर्‍यांच्या वाटेवर

Published On: Feb 25 2018 1:34AM | Last Updated: Feb 25 2018 1:29AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

महाराष्ट्र ग्रामपंचायत कायद्यामुळे होणारा राज्यातील उद्योजकांचा छळ थांबायला हवा, अन्यथा शेतकर्‍यांसारखेच आंदोलनाचे शस्त्र हाती घेण्याचा निर्णय मराठवाड्यातील औद्योगिक संघटनांनी घेतला आहे. ग्रामपंचायतींकडून गब्बरसिंग स्टाईलने होणारी वसुली थांबवा, अन्यथा राज्य सोडण्याचा इशारा औरंगाबादेतील औद्योगिक संघटनांनी शनिवारी येथे दिला. 

मासिआचे अध्यक्ष सुनील किर्दक, सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, डब्ल्यूआयएचे अध्यक्ष वसंत वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत ग्रामपंचायतींविरुद्ध तक्रारींचा पाढा वाचला. राहुल मोगले, दुष्यंत पाटील, हर्षवर्धन जैन आदींची उपस्थिती होती. 2011 पर्यंत बांधकाम असलेल्या जागेसाठी एक रुपया प्रति चौरस फूट आणि खुल्या जागासाठी तो 20 पैसे एवढा असताना अवघ्या सात वर्षांत हा कर लाखोंच्या घरात कसा जातो असा सवाल किर्दक यांनी केला.

ग्रामपंचायतींशी चर्चा करून तडजोडीने कराची रक्‍कम यापूर्वी निश्‍चित केली जात असे. आता मात्र ग्रामपंचायत कायद्यातील कलम 125 रद्द करण्यात आल्याने ग्रामपंचायतींकडून दामदुप्पट वसुली केली जात आहे. वाळूज परिसरातील पाटोदा ग्रामपंचायतीचा अपवाद वगळता रांजणगाव, जोगेश्‍वरी आदी सात पंचायतींकडून उद्योजकांना वेठीस धरले जात आहे. वसुलीसाठी दारुडे पाठविले जातात. कंपनीतील महत्त्वाचा डेटा असणारे संगणक सर्रासपणे उचलून नेले जातात. किर्दक ऑटोकॉम या कंपनीतील 25 संगणक दारुड्यांनी अशाच प्रकारे ट्रॅक्टरमध्ये भरून घेऊन गेल्याचा प्रकार घडला. 
याच महाभागांनी पुढे इतर सात कंपन्यांतही वसुलीसाठी धुमाकूळ घातल्याचा आरोप किर्दक यांनी केला. कर देण्यास आम्ही तयार असताना आमच्याच कंपनीत येत गळचेपी करणे कुठल्या कायद्यात बसते असा प्रश्‍न वाघमारे यांनी उपस्थित केला. शेतकरी आंदोलनात भाजीपाला रस्त्यावर फेकण्यात आला. आम्हालादेखील नाइलाजाने आमची उत्पादने रस्त्यावर फेकावी लागतील, असा इशारा कोकीळ यांनी दिला.

ग्रामसेवकास निलंबित करा
जोगेश्‍वरीच्या ग्रामसेवकास निलंबित करण्याची मागणी उद्योग संघटनांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांच्याकडे केली आहे. या प्रकरणी सोमवारी (दि.26) विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची भेट घेतली जाणार असल्याचे कोकीळ यांनी सांगितले.