होमपेज › Aurangabad › मॅनहोलमध्ये दोघांचा मृत्यू, तिघे अत्यवस्थ

मॅनहोलमध्ये दोघांचा मृत्यू, तिघे अत्यवस्थ

Published On: Mar 19 2019 1:29AM | Last Updated: Mar 19 2019 1:29AM
औरंगाबाद : प्रतिनिधी

महापालिकेच्या मुख्य ड्रेनेजलाइनमधील मॅनहोलमध्ये टाकलेले विद्युतपंप सुरू करण्यासाठी आत उतरलेल्या दोन शेतकर्‍यांचा गुदमरून मृत्यू झाला तर, एकजण ड्रेनेजलाइनमध्ये वाहून गेल्याची भीती व्यक्‍त केली जात आहे. तसेच, तिघे अत्यवस्थ असून एकाची प्रकृती स्थिर आहे. ही घटना ब्रिजवाडी पाठीमागे सुखना नदीपात्रात सोमवारी दुपारी 2 च्या सुमारास घडली. ड्रेनेजलाइनचे खोदकाम करून बेपत्ता व्यक्‍तीचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. या घटनेमुळे प्रचंड हळहळ व्यक्‍त केली जात असून मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

दिनेश जगन्नाथ दराखे (37, रा. चिकलठाणा) व जनार्दन साबळे (50) अशी मृतांची नावे आहेत. रामेश्‍वर पेरूबा डांबे (28, रा. कावडे वस्ती, ब्रिजवाडीच्या पाठीमागे) हे बेपत्ता आहेत. तर रामकिसन रंगनाथ माने (47, रा. दगडवाडी, जि. जालना, ह.मु. कावडे वस्ती), उमेश जगन्नाथ कावडे (32), प्रकाश केरूबा वाघमारे (55) हे तिघे अत्यवस्थ आहेत. नवनाथ रंगनाथ कावडे यांची
 प्रकृती स्थिर असल्याचे धूत हॉस्पिटलमधील सूत्रांनी सांगितले. बेपत्ता डांबे हे रामकिसन माने यांचे जावई आहेत. मृत दोघेही बटाईदार आहेत. 

उत्तरानगरीच्या मागील बाजूला ब्रिजवाडीजवळ असलेल्या सुखना नदीच्या पात्रालगत चिकलठाण्यातील शेतकर्‍यांच्या जमिनी आहेत. नदीपात्रात भूमिगत गटार योजनांमधील पाणी वाहून नेण्यासाठी मुख्य ड्रेनेजलाइन आहे. त्यावर सिमेंटचे मॅनहोल बांधण्यात आले आहे. काही शेतकर्‍यांनी हे सांडपाणी शेतीला वापरण्यासाठी त्या मॅनहोलमध्ये विद्युतपंप टाकलेले आहेत. अडीच फुटी होलमधून शेतकरी आत उतरतात आणि विद्युतपंप दुरुस्त करतात. ड्रेनेजलाइनचे पाणी असल्याने एकदिवसाआड विद्युतपंपाच्या फुटबॉलला कचरा अडकतो. तो काढण्यासाठी हे शेतकरी नेहमी आत उतरत असतात. सोमवारी दुपारी दिनेश दराखे आणि जनार्दन साबळे हे दोघे मॅनहोलमध्ये उतरले. गॅसमुळे त्यांना श्‍वसनास त्रास होऊन गुदमरल्याने ते बेशुद्ध पडले. ते बराच वेळ वर आले नाहीत. तसेच, आतून काहीही आवाज येत नसल्यामुळे त्यांना वाचविण्यासाठी रामकिसन माने, प्रकाश वाघमारे, उमेश कवाडे हे उतरले. तेही वर न आल्यामुळे डांबे सर्वात शेवटी आत उतरले. हा प्रकार कळताच नागरिकांनी धाव घेतली. अग्निशमन दल आणि सिडको एमआयडीसी पोलिसांना माहिती देण्यात आली. 

नागरिकांनी प्रयत्न करीत यातील चौघांना बाहेर काढले, मात्र रामेश्‍वर डांबे हा ड्रेनेजच्या पाण्यात वाहून गेल्याने बेपत्ता झाला. अत्यवस्थ असलेल्या रामकिसन माने, उमेश कावडे, प्रकाश वाघमारे आणि नवनाथ कावडे यांना तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. घटनास्थळी महापौर नंदकुमार घोडेले, नगरसेवक राजू शिंदे, पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी भेट दिली. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.