Wed, Jul 08, 2020 04:51होमपेज › Aurangabad › हातभट्टीच्या अड्ड्यावर धाड

हातभट्टीच्या अड्ड्यावर धाड

Published On: Aug 06 2018 1:51AM | Last Updated: Aug 06 2018 1:51AMजालना : प्रतिनिधी

गेल्या आठवडाभरापासून पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांच्या विरोधात कारवाईला सुरूवात केली आहे. दोन दिवसात केलेल्या कारवाईत 1 लाख 84 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर हजारो लिटर रसायन नष्ट केले. पोलिसाच्या या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

गेल्या आठवड्यात पोलिस अधिक्षक चैतन्य रुजू झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने धाडसत्र सुरू केले. यात दारू अड्ड्यांवर कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात आली. जुन्या जालन्यातील कैकाडी मोहल्यात गावठी दारू मोठ्या प्रमाणात बनविली जाते. याबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी तत्काळ यंत्रणा फिरवत सकाळी 7.50 वाजता छापा टाकून हजारो रूपयांचा साठा उध्दवस्त केला. या छाप्यात पत्र्यांच्या शेडमधील चार हजार रूपये किंमतीची हातभट्टीची दारू 410 लिटर, 40 हजार रूपये किंमतीचे तयार गुळाचे सडलेले रसायन असा 44 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. दरम्यान पोलिसांनी हा सर्व घातक मुद्देमाल नष्ट केला. प्रकाश धन्नुसिंह राजपुत (रा. लोधी मोहल्ला) यांच्याविरूद्द गुन्हा नोंदवला आहे.

कदीम जालना पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या विक्री व निर्मिती अड्डयावर शनिवारी रात्री कैकाडी मोहल्ला हातभट्टी अड्डयावर छापा टाकला. या कारवाईत हातभटी, दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन व अन्य साहित्य मिळून 1 लाख 40 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून तीन जणांना अटक करण्यात आली. मंगल माधू गायकवाड, सोधर गायकवाड व चंद्रकला जाधव अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भिसे,पोलिक कर्मचारी कांबळे, वैराळ, चौधरी, चेके, कोरडे, बनसोडे, गणेश जाधव, आकाश पांढरे, रमेश काळे, मारूती वाटोरे, सोमनाथ लहामगे यांनी केली.