Mon, Jul 13, 2020 22:58होमपेज › Aurangabad › बोंडअळीवर निव्वळ ‘सल्ले’बाजी

बोंडअळीवर निव्वळ ‘सल्ले’बाजी

Published On: Apr 29 2018 2:10AM | Last Updated: Apr 29 2018 12:58AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

कपाशीवरील शेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे 60 टक्क्यांपर्यंत कापसाचे उत्पन्न घटले आणि शेतकर्‍यांचे दिवाळे निघाले. यंदाही बोंडअळीच्या संकटाचे ढग आहेतच. मात्र, तरीही सुधारित वाणाबाबत शासन उदासीन आहे. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा निव्वळ सल्ला दिला जात आहे.  प्रत्यक्षात कृती किंवा उपाययोजना नाही. नुकसानीच्या मदतीचे आश्‍वासनही हवेतच विरले असून कपाशी लागवड करू नये, यासाठीच मदत दिली जात नसल्याची ओरड होऊ लागली आहे.

मराठवाड्यातील प्रमुख नगदी पीक कपाशीवर गेल्या वर्षी शेंदरी बोंडअळीचे संकट ओढावले.  नवीन हंगामातही बोंडअळीचे संकट घोंगावतच आहे. विशेष म्हणजे जगात बोलगार्डचे सातवे वाण स्वीकारण्यात आले असताना भारतात अद्यापही बीजी-2 हेच वाण वापरले जाते. यावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने नवीन वाणास मान्यता देणे अपेक्षित होते. शासन सल्ला देण्यापलीकडे ठोस उपाय योजनाही करताना दिसत नाही. अपवादात्मक ठिकाणी जागृती मोहीम सुरू असली तरी संकटाची व्याप्ती लक्षात घेता पूर्ण ताकदीने मोहीम राबवावी, असे मत तज्ज्ञांनी नोंदवले.

मराठवाड्यातील सरासरी कपाशी लागवडी खालील क्षेत्र चार लाख 37 हजार हेक्टर इतके आहे. पर्यायी पीक उपलब्ध नसल्याने यंदाही 3 लाख 77 हजार हेक्टरवर कपाशीची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. गेल्या वर्षी विभागातील जवळपास 40 लाख क्विंटल कापसाचे नुकसान झाले. शासनाने हेक्टरी 6 हजार 800 रुपयांची मदत जाहीर केली. मात्र, पाच महिने लोटले तरी शेतकर्‍यांच्या पदरात दमडीही पडलेली नाही. त्यामुळे नवीन हंगामात बी-बियाण्यांचा खर्च अनेकांना जड आहे.

शेतकर्‍यांनो, तुम्हीच करा व्यवस्थापन : परिसरातील शेतकर्‍यांची एकाच वेळी कपाशीची लागवड होणे गरजेचे आहे. नॉन बीटी बियाण्यांची आवर्जून लागवड करावी. अल्प मुदतीचे म्हणजे 120 ते 140 दिवसांचे वाण लावावे. अत्याधुनिक कामगंध सापळ्यांचा वापर करावा. योग्य वेळी औषध फवारणी आणि पोळा अमावस्येपासून प्रत्येक अमावस्येला लिंबोळी अर्काची फवारणी उपयुक्त ठरेल. विशेष म्हणजे फरदड न घेणे आणि पर्‍हाट्यांचा नायनाट करणे महत्त्वाचे आहे. एकात्मिक कीड व्यवस्थापन करण्यात यश आल्यास अपेक्षित उत्पादन आणि येत्या दोन वर्षांत बोंडअळीवर नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले.

वीस वषार्र्ंपासून 34 टक्के कपाशी : गेल्या वीस वर्षांपासून म्हणजे जवळपास 1998 पासून मराठवाड्यातील पेरणी क्षेत्रापैकी 34 टक्के क्षेत्रावर कपाशीचे उत्पादन घेतले जाते. कपाशी हेच प्रमुख नगदी पीक असून तुलनेत पर्यायी पीक उपलब्ध झालेले नाही. ही बाब कृषी विभाग आणि शासनाला चांगलीच अवगत आहे. मात्र, तरीही कपाशी आणि उत्पादक शेतकर्‍यांला सुविधा देण्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.  अखेर बोंडअळीचे संकट ओढावलेच.