Wed, Jul 08, 2020 15:58होमपेज › Aurangabad › विद्यापीठात निवडणुकीवरून पुन्हा वादंग

विद्यापीठात निवडणुकीवरून पुन्हा वादंग

Published On: May 27 2018 1:17AM | Last Updated: May 27 2018 12:24AM    
औरंगाबाद : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील (बामू) निवडणुकीविषयी कुलपतींकडे तक्रारी जाण्याचे सत्र सुरूच आहे. अधिसभेद्वारे व्यवस्थापन परिषदेवर पाठविण्यात येणार्‍या सदस्यांची निवडणूकही याला अपवाद ठरू शकली नाही. या निवडणुकीसाठी प्रभारी अधिष्ठाता, अधिकार्‍यांना मतदार केल्यामुळे वाद पेटला आहे. हे अधिकारी प्रभारी/अतिरिक्‍त कार्यभार असलेले आहेत. त्यामुळे त्यांना मतदार करता येत नाही, असे सांगत उत्कर्ष पॅनलच्या तिघांनी या अधिकार्‍यांची नावे मतदार यादीतून वगळण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी विद्यापीठाच्या कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी त्याचप्रमाणे कुलपतींना निवेदन पाठविले आहे. 

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कायद्यानुसार पदसिद्ध सदस्यत्वासाठी संवैधानिक अधिकारी, अधिष्ठाता यांच्या नियमित नियुक्त्या होणे गरजेचे आहे. बामूत नियमित नियुक्त्या झालेल्या नाहीत. काम भागविण्यासाठी अधिष्ठाता, संचालक आणि संवैधानिक अधिकारी यांच्या प्रभारी स्वरूपात नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांना या निवडणुकीत मतदार म्हणून मतदानाचा हक्‍क बजावता येत नाही. इतर विद्यापीठांनी मतदार यादीत प्रभारी अधिकार्‍यांचा समावेश न करता निवडणूक घेतली आहे. प्रशासनाने याची दखल घेत 15 जूनच्या व्यवस्थापन परिषद निवडणुकीच्या मतदार यादीतून प्रभारी अधिकारी/संचालक/अधिष्ठाता यांची नावे वगळावीत, असेही या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर अधिसभा सदस्य डॉ. भारत खैरनार, प्रा. सुनील मगरे आणि विद्या परिषद सदस्य डॉ. विलास खंदारे यांच्या सह्या आहेत. 

या नावांवर आक्षेप
बामूची अधिसभा 76 सदस्यीय आहे. तथापि, काही नियुक्त्या न झाल्यामुळे पाच जागा रिक्‍त आहेत. निवडणूक विभागाने काल सायंकाळी 71 मतदारांची यादी प्रसिद्ध केली. यापैकी 12 नावांना आक्षेप घेण्यात आला आहे. हे 12 जण प्रभारी अधिष्ठाता, संचालक आणि संवैधानिक अधिकारी आहेत. डॉ. संजय साळुंके, डॉ. मझहर फारुकी, डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. संजीवनी मुळे (सर्व अधिष्ठाता). वित्त व लेखा अधिकारी डॉ. नंदकुमार राठी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, अनार साळुंके (उपपरिसर संचालक), डॉ. एम. डी. शिरसाट, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य संचालक, धर्मराज वीर (ज्ञानस्रोेत केंद्र संचालक) मुस्तजीब खान, दयानंद कांबळे, संजय मून. 
दुपारी वर्णी,

सायंकाळी मतदार यादीत 

शासकीय बी.एड. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संजीवनी मुळे यांना दुपारी आंतरविद्याशाखीय विद्याशाखेचे अधिष्ठातापद देण्यात आले आणि सायंकाळी लगेच मतदार यादीत त्यांचे नाव झळकले. त्याचप्रमाणे एम. डी. शिरसाट यांचीही कालच नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली. केवळ मतासाठी ही खेळी खेळण्यात आली असून ही 12 नावे मतदार यादीतू न वगळल्यास आपण न्यायालयाचे दार ठोठावणार आहोत, असे डॉ. खैरनार यांनी सांगितले.