औरंगाबाद : प्रतिनीधी
काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांच्यासाठी अमरावतीची जागा सोडवून घेण्यासाठी औरंगाबादच्या जागेचे घोडे अडले आहे. आज (ता. १६) दिल्लीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत दोन्ही काँग्रेस नेत्यांमध्ये चर्चा झाली असून उद्या (ता.१७) सायंकाळपर्यंत अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे.
अमरावतीची जागा राष्ट्रवादीकडे आहे. नवनीत कौर यांनी गेल्या वेळी निवडणूक लढवली होती. गेल्या दोन टर्मपासून या मतदारसंघातून शिवसेनेचे आनंदराव अडसूळ खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे अमरावतीची जागा राष्ट्रवादीकडून घेऊन त्याबदल्यात राष्ट्रवादीने मागणी केलेली औरंगाबादची जागा देण्यासंदर्भात शनिवारी चर्चा झाली.
जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार, माजी आमदार कल्याण काळे यांच्यासह जिल्ह्यातील स्थानिक नेते दिल्लीत तळ ठोकून आहेत. त्यांनी आज पक्षश्रेष्ठींसमोर जिल्ह्यातील काँग्रेसची बलस्थाने मांडली. तसेच ही जागा काँग्रेसकडेच ठेवावी राष्ट्रवादीला देऊ नये अशी एकमुखी मागणी केली. रविवारी (ता.१६) पुन्हा बैठक होणार असून सायंकाळपर्यंत निर्णय अपेक्षित आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी दिली.
नगरच्या जागेच्या बदल्यात औरंगाबादची जागा देण्याच्या हालचाली काँग्रेसमध्ये सुरू होत्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या जागेची मागणी करत सतीश चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली. दुसरीकडे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांनी नगरची जागा राष्ट्रवादीकडून घेण्यासाठी जोर लावला होता. त्यामुळे औरंगाबादच्या जागेचा प्रश्न सुटला नव्हता. मात्र, काही दिवसांपूर्वी सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने औरंगाबादच्या जागेचा प्रश्न सुटल्याचे बोलले जात होते.