Thu, Aug 13, 2020 16:49होमपेज › Aurangabad › करमाडच्या सहायक निरीक्षकासह जमादार जाळ्यात

करमाडच्या सहायक निरीक्षकासह जमादार जाळ्यात

Published On: Dec 31 2017 1:30AM | Last Updated: Dec 31 2017 1:12AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने औरंगाबादेत ‘एअर एंडर धमाका’च सुरू केला आहे. शनिवारी सलग तिसर्‍या दिवशी लाचलुचपतच्या पथकाने करमाड पोलिस ठाण्याचा सहायक पोलिस निरीक्षक गोरखनाथ विठ्ठल शेळके व जमादार शेख शकील शेख रहीम या दोघांना 25 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. वाळू वाहतूकदाराचे जप्त केलेले वाहन सोडण्यासाठी अन् त्याला परिसरात वाळूचा धंदा करू देण्यासाठी या दोघांनी ही लाच स्वीकारली होती. 

या कारवाईबाबत लाचलुचपतच्या पोलिसांनी सांगितले की, एका वाळू व्यावसायिकाचे वाळू वाहतूक करणारे वाहन काही दिवसांपूर्वी करमाड पोलिसांनी जप्त केले होते. या प्रकरणी करमाड ठाण्यात गुन्हाही नोंदविण्यात आला होता. जप्त केलेले वाहन सोडण्यासाठी व्यावसायिकाने काही दिवसांपूर्वी करमाड ठाण्याचे सहायक निरीक्षक शेळके व जमादार शेख शकीलची भेट घेतली. तेव्हा या दोघांनी जप्त केलेली गाडी सोडण्याबाबतचा रिपोर्ट न्यायालयात देण्यासाठी आणि यापुढे परिसरात वाळू व्यवसाय करू देण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच मागितली. तेव्हा व्यावसायिकाने त्यांना होकार तर दिला; परंतु लाच देण्याची इच्छा नसल्याने तेथून सरळ लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय गाठले. त्यानंतर लाचलुचपतच्या पथकाने या दोघांना रंगेहाथ पकडण्याची योजना आखली. ठरल्याप्रमाणे खात्री करण्यासाठी 22 डिसेंबर रोजी वाळू व्यावसायिकासोबत पंचांना पाठविण्यात आले. तेव्हा लाच मागितल्याची खात्री पटली.

शनिवारी (दि. 30) लाच देण्याचे ठरले होते. ठरल्याप्रमाणे लाचलुचपतच्या पथकाने करमाड ठाण्याच्या आवारात सापळा रचला. वाळू व्यावसायिक लाचेची रक्‍कम घेऊन आल्यानंतर जमादार शेखने ती शेळकेच्या सांगण्यावरून ठाण्यासमोरच स्वीकारली. पैसे स्वीकारताच बाजूला दबा धरून बसलेल्या लाचलुचपतच्या पोलिसांनी झडप मारून जमादाराला रंगेहाथ अटक करण्यात आली. या प्रकरणी एपीआय शेळके व जमादार शेख यांच्याविरुद्ध करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अप्पर पोलिस अधीक्षक एस. आर. जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक रवींद्र निकाळजे, पोलिस निरीक्षक अजिनाथ काशीद, विनोद चव्हाण, संतोष धायडे, संजय उदगीरकर, गंभीर पाटील, महेंद्र सोनवणे, रमेश चव्हाण आदींनी केली.