कन्नड : प्रतिनिधी
कन्नड शहरातील बस स्थानकात एक बेवारस पेटी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मात्र बॉंम्ब शोधक पथकाने पेटी ताब्यात घेवून बघितले तर त्यात विद्यार्थ्यांची वह्या पुस्तके मिळून आली आणि पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. परंतु, बॉम्ब शोधक पथकाची रंगीत तालिमच शहरवासीयांना अनुभवण्यास मिळाली.
मंगळवारी सकाळी साडे बारा वाजण्याच्या सुमारास बसस्थनकाच्या एका बाजूला काही प्रवाशांना लोखंडी पेटी आढळली. यावेळी त्यांनी तेथील एका पोलिसाला याबाबत सांगितले. पोलिसाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यास ही बाब कळवली आणि त्यानंतर एकच धावपळ सुरु झाली.
पोलिसांनी तात्काळ बस स्थानकाचा परिसर पाचशे फूटा पर्यंत रिकामा केला. तात्काळ बॉंम्ब शोधक पथक तसेच श्वान पथकास पाचारण करण्यात आले. बॉंम्ब शोधक पथकाने पेटी ताब्यात घेवून तपासणी केली. मात्र त्यात बॉम्ब सापडलाच नाही. तर पेटीत वह्या पुस्तके आढळली.
ही कारवाई साडेबारा ते साडेतीन वाजे पर्यंत सुरु होती. संपूर्ण शहरात बस स्थानकात बॉंम्ब आसल्याची अफवा पसरली. मात्र पेटीत वह्या पुस्तके आढळल्याने धावपळ थांबली. परंतु, बॉंम्ब शोधण्याच्या कारवाईची रंगीत तालीमच सर्वांना अनुभवास मिळाली.