Wed, Jul 08, 2020 15:28होमपेज › Aurangabad › औरंगाबादेत पक्ष्याची विमानाला धडक

औरंगाबादेत पक्ष्याची विमानाला धडक

Published On: Oct 04 2018 1:56AM | Last Updated: Oct 04 2018 1:54AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मुंबईहून बुधवारी (दि. 3) पहाटे पाच वाजता निघालेले जेट एअरवेजचे विमान औरंगाबाद विमानतळावर तासाभरातच पोहोचले. परंतु, लँडिंग करताना एका पक्ष्याची धडक विमानाला बसली. तथापि, वैमानिकाने प्रसंगावधान राखत सुखरूप लँडिंग केले. त्यामुळे विमानात असलेले 80 प्रवासी थोडक्यात बचावले. विमानाने हेलकावे दिले नाहीत, त्यामुळे ते सुखरूप खाली उतरवता आले, अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता होती.

औरंगाबाद विमानतळावर उतरवित असतानाच विमानाला पक्ष्याची धडक बसल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. त्याने त्वरित प्रसंगावधान राखत, विमान विमानतळावर सुखरूप उतरविले. तेच विमान साडेसहा वाजता पुन्हा मुंबईला जात असते. मात्र, त्याचे उड्डाण थांबविण्यात आले. परिणामी, मुंबईला जाणारे शेकडो प्रवासी विमानतळावर ताटकळत होते. पक्ष्याची धडक बसली असल्याने विमानाची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विमानाचे उड्डाण दुपारी 12 वाजता होईल, असे जेट एअरवेजकडून प्रवाशांना सांगण्यात आले.

काही प्रवाशांनी प्रवास रद्द केला, तर काहींनी सायंकाळच्या विमानाने जाण्याचा निर्णय घेतला. तर काही प्रवासी 12 वाजता जाणार्‍या विमानाने जाऊ म्हणून घरी गेले. 12 वाजता पुन्हा प्रवासी विमानतळावर दाखल झाले, परंतु 12 वाजता जाणारे विमानही रद्द करण्यात आले. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्‍त केली. चिखलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार्‍या जेट एअरवेजच्या विमानाला दोन महिन्यांनंतर पुन्हा एकदा पक्ष्याने धडक दिल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

कचर्‍याने वाढले पक्षी

विमानतळ परिसरात टाकल्या जात असलेल्या कचर्‍यामुळे परिसरात पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचा विमानाच्या सुरक्षित वाहतुकीवर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसते. त्यामुळे विमानाजवळून पक्षी उडण्याच्या घटना अधिक होत आहेत. तर एखाद्या दिवशी महाभयंकर घटना घडेल, तेव्हाच कचरा हटविला जाणार का, असा सवाल केला जात आहे.