Fri, Jul 10, 2020 17:46होमपेज › Aurangabad › औरंगाबादेत ‘पुढारी’वर शुभेच्छांचा वर्षाव

औरंगाबादेत ‘पुढारी’वर शुभेच्छांचा वर्षाव

Published On: Jan 08 2019 1:41AM | Last Updated: Jan 08 2019 1:41AM
औरंगाबाद : प्रतिनिधी

निःपक्ष, निर्भीड पत्रकारितेचा वसा आणि वारसा जपणार्‍या दैनिक ‘पुढारी’च्या मराठवाडा आवृत्तीचा दुसरा वर्धापनदिन अलोट जनसागराच्या साक्षीने अपूर्व उत्साहात रविवारी (दि. 6) साजरा करण्यात आला. वाचकांशी असलेले अतूट नाते द‍ृढ करीत आपुलकी व कौटुंबिक वातावरणात रंगलेल्या शानदार स्नेहमेळाव्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी ‘पुढारी’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. क्रांती चौकातील हॉटेल मेनॉरच्या लॉन्सवर रंगलेल्या सोहळ्यात ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांनी शुभेच्छांचा स्वीकार केला.

इतिहासाचा भागीदार आणि साक्षीदार असलेल्या ‘पुढारी’ने गेली 80 वर्षे वाचकांशी नाते जपले आहे. मातीशी नाते असलेल्या ‘पुढारी’ने समाजहिताचे व्रत घेऊन पत्रकारितेत नवा मापदंड निर्माण करीत जनमानसांत अढळ स्थान निर्माण केले आहे. वाचकांशी आपुलकीची नाळ जोडलेल्या ‘पुढारी’च्या मराठवाडा आवृत्तीचा दुसरा वर्धापनदिन अपूर्व उत्साहात व थाटात साजरा झाला. सायंकाळी साडेपाचपासून मान्यवर, हितचिंतक, जाहिरातदार, वृत्तपत्र विक्रेते, वाचकांची पावले मेनॉर लॉन्सकडे वळू लागली. 

यानिमित्त मेनॉर लॉन्सवर स्नेहीजनांचा मेळाच भरला होता. ‘पुढारी’चा वर्धापनदिन, दर्पणदिन आणि नववर्षाची सुरुवात, असा तिहेरी योग जुळून आल्याने सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आ. विनायक मेटे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी दै. ‘पुढारी’स शुभेच्छा दिल्या.

‘एसआरपी’ बँडने आणली रंगत

रंगीबेरंगी फुलांनी सजवलेले व्यासपीठ, प्रवेशद्वारावर उभारलेली आकर्षक कमान, मुख्य प्रवेशद्वार ते व्यासपीठापर्यंत रेडकार्पेट, ‘पुढारी’ परिवाराकडून केले जाणारे मनःपूर्वक स्वागत, यामुळे कार्यक्रमाचा थाट न्याराच होता. राज्य राखीव पोलिस दलाच्या (भारत बटालियन) बँडपथकाकडून वाजवल्या जाणार्‍या देशभक्‍तीपर गीतांनी कार्यक्रमात रंगत आणली.