जळगाव : प्रतिनिधी
चंदनाच्या लाकडांची चोरी करुन पळून जात असलेल्या एका आरोपीला औरंगाबाद पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक पिकअप गाडी आणि 2 लाख 72 हजाराचे चंदनाचे लाकूड जप्त केले. पोलिसांनी आज (दि. 28) पहाटे ही कारवाई केली.
औरंगाबादकडून चंदनाची चोरी केलेली लाकडे एका पिकअप गाडी करुन भुसावळकडे येत आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे आज (दि. 28) सकाळी 4.30च्या सुमारास पोलिस नाहाटा चौफुली येथे पोहचले. यावेळेस पांढ-या रंगाची पिकअप व्हॅन (एम.एच.20 बी.टी.3924) औरंगाबादकडून वेगाने भुसावळकडे येतांना दिसली. पोलिसांनी गाडी थांबवण्याचा इशारा केला असता त्यातील ड्रायव्हर आणि त्यासोबत असलेल्या एक व्यक्ति गाडी दूर लावून पळ काढण्याचा प्रयत्न करु लागले तेव्हा त्यातील एक व्यक्तीस पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. ड्रायव्हर पळून जाण्यास यशस्वी झाला.
ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव मंजुनाथ सुकुमारन (वय-34) असे असून तो केरळ राज्यातील निल्लीरट्टा येथील रहिवासी असल्याचे उघड झाले. गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये दीड ते अडीच फूट लांबीची 108.935 किलो ग्रँम वजनाची चोरी केलेली चंदनाची लाकडे सापडली. चंदनाच्या लाकडाचे 2 लाख 72 हजार रुपये किमतीचे 32 नग मिळाले. तसेच 3 लाख 75 हजार रुपयांची पिकअप व्हॅन जप्त करण्यात आली आहे. असा एकूण 6 लाख 47 हजाराचा रुपायाचा माल जप्त केला.
या कारवाईत पोलिस निरीक्षक देविदास पवार, पो.उप.नि. मनोज ठाकरे, सहाय्यक फोजदार तस्लीम पठान, पो.हे.काँ छोटु वैदय, पो.काँ कृष्णा देशमुख, प्रशांत चव्हाण, उमाकांत पाटील, राहुल चौधरी, सचिन पोळ, करतारसिंग परदेशी, मंदार महाजन, बापुराव बडगुजर यांनी भाग घेतला.