होमपेज › Aurangabad › बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी एकही ठेकेदार मिळेना

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी एकही ठेकेदार मिळेना

Published On: May 10 2019 12:10PM | Last Updated: May 10 2019 11:43AM
औरंगाबाद : पुढारी ऑनलाईन

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबादमधील स्मारकासाठी काढण्यात आलेली निविदा भरण्यासाठी एकही ठेकेदार पुढे येईना अशी अवस्था झाली आहे. औरंगाबाद महापालिकेने बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ४८ कोटींची निविदा काढली आहे. परंतु, ही निविदा आतापर्यंत एकाही ठेकेदाराने भरली नाही. 

औरंगाबाद महापालिकेवर सध्या शिवसेनेची सत्‍ता आहे आणि महापालिकेचेन ही निविदा काढली आहे. परंतु, ही निविदा भरण्यासाठी एकही ठेकेदार पुढे आलेला नाही. त्‍यामुळे महापालिकेने या निविदेसाठी मुदत वाढविली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर औरंगाबाद महापालिकेने १७ एकर जागेत ९३ फूट उंचीचा बाळासाहेबांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला त्यावेळी शिवसेनेचे त्र्यंबक तुपे महापौर होते.

महापालिकेच्या जागेवर एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने स्मृतीवन आणि स्मारक उभारण्याचे ठरवण्यात आले होते. त्यावेळी तत्कालिन पालकमंत्री रामदास कदम यांनी या स्मारकासाठी सरकारकडून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन दिला होता. दरम्‍यान, एवढा निधी उपलब्‍ध असूनही आणि सत्‍ता शिवसेनेची असूनही आतापर्यंत या स्‍मारकाच्या कामात काहीच प्रगती झाली नाही. त्‍यामुळे शहरवासियांमधून आश्चर्य व्यक्‍त होत आहे.