Tue, Aug 11, 2020 21:12होमपेज › Aurangabad › धनंजय मुंडेंना दणका; जमीन गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

धनंजय मुंडेंना दणका; जमीन गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

Published On: Jun 11 2019 1:28PM | Last Updated: Jun 12 2019 1:18AM
औरंगाबाद : प्रतिनिधी 

सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. 

बेलखंडी येथील मठाला इनाम दिलेली सरकारी जमीन धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर करून त्यांच्या जगमित्र साखर कारखान्यासाठी विकत घेतली. कृषी जमीनही अकृषिक केली, असा ठपका धनंजय मुंडेंवर ठेवण्यात आला आहे. तपासी अंमलदारावरही देखील औरंगाबाद खंडपीठाने ताशेरे ओढले आहेत. याप्रकरणी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. राजाभाऊ फड यांनी याप्रकरणी याचिका दाखल केली होती.

नेमकं प्रकरण काय?
धनंजय मुंडे यांनी १९९१ साली जगमित्र शुगर फॅक्टरीसाठी २४ एकर जमीन खरेदी केली होती. या खरेदी व्यवहाराविरोधात बर्दापूर पोलीस ठाण्यात राजाभाऊ फड (रत्नाकर गुटे यांचे जावई) यांनी तक्रार दिली होती. ही जमीन अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील बेलखंडी देवस्थानची आहे.

गिरी, देशमुख व चव्हाण यांच्यात जमिनीवरून वाद होता. जमिनीच्या विक्रीचे अधिकारी  देशमुख व  चव्हाण यांना मिळाले होते. त्यांच्याकडून मुंडे यांनी ही जमीन खरेदी केली होती. पोलिस ठाण्यात तक्रारीची दखल घेतली जात नाही म्हणून फड यांनी औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली होती. ही सरकारी जमीन आहे. त्यामुळे ती ट्रस्ट्र किंवा खासगी व्यक्तीला विकत घेता येत नाही, असा आक्षेप फड यांनी घेतला होता. त्यामुळे मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी विनंती याचिकेत केली होती. ही विनंती कोर्टाने मान्य केली आहे.

राजकीय द्वेषातून आरोप
यावर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे यांनी राजकीय द्वेषातून फड यांनी तक्रार केल्याचे म्हटले आहे. रत्नाकर गुट्टे यांचे बोगस कर्जाचे प्रकरण बाहेर काढल्यामुळे राजकीय सूडबुद्धीने तक्रार करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान १९९१ मध्ये सरकारी दप्तरात या जमिनीची नोंद इनामी जमीन म्हणून नव्हती. या वादाची आम्हाला माहिती नव्हती. विक्री करण्याचा मालकी हक्क देशमुख यांच्याकडे असल्याने त्यांच्याकडून जमीन खरेदी करण्यात आली, असे मुंडे यांचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी सांगितले.